चला, आपण बोलूयात. किमान कुलगुरूंच्या भल्याबुऱ्या इतिहासाचे मूक साक्षीदार होणे टाळूयात

You are currently viewing चला, आपण बोलूयात. किमान कुलगुरूंच्या भल्याबुऱ्या इतिहासाचे मूक साक्षीदार होणे टाळूयात

मा. सिनेट सदस्य
सप्रेम नमस्कार,

येत्या 30 मार्च 2022 रोजी आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटची शेवटची सभा होणार आहे. बघता बघता 5 वर्षे सरली. विद्यार्थी, पदवीधर, शिक्षक, प्राचार्य, कर्मचारी अशा सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिनेटने कायमच विद्यापीठाच्या हितासाठी महत्त्वाची व आग्रही भूमिका बजावली आहे.

विद्यापीठाच्या निर्णयाचे सर्वाधिक अधिकार असलेली मॅनेजमेंट कौन्सिल अनेकवेळा कुलगुरू आणि प्रशासनाच्या हातातील बाहुले बनल्याचे दिसून आले. पण सिनेटने मात्र वेळोवेळी प्रश्न मांडत, प्रशासनाला धारेवर धरत आपला लौकिक आणि शान वाढवली आहे.

येत्या शेवटच्या सिनेटमध्ये कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आपला 5 वर्षांचा लेखाजोखा मांडतीलच. त्यातल्या त्यांच्या चांगल्या कामांसाठी आपण त्यांचे कौतुक आणि अभिनंदन मोकळ्या मनाने नक्की करूच. पण…

मला या पत्राच्या माध्यमातून सन्माननीय सिनेट सदस्यांचे लक्ष वेधायचे आहे ते याकडे की, जे कुलगुरू मांडणार नाहीत तसेच जाणीवपूर्वक लपवू इच्छित आहेत, त्या गंभीर घटना आणि घडामोडींकडे.

कुलसचिवांवर निनावी पत्राद्वारे आरोप आणि त्यात आढळलेले तथ्य

तीन महिन्यांपूर्वी एक निनावी पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विभागप्रमुखांना पाठवले गेले. त्यामध्ये कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर 23 गंभीर आरोप करण्यात आले होते. या पत्राने विद्यापीठात मोठी खळबळ उडाली. कुलगुरू या सर्व प्रकरणाची चौकशी करतील असे अपेक्षित होते मात्र पत्र निनावी असल्याचे कारण देऊन त्यांनी याची चौकशी करणार नसल्याचे सांगितले.

जागल्याने केली पडताळणी

निनावी पत्रातील आरोप गंभीर असल्याने जागल्या वेब पोर्टलने यातील आरोपांबाबतची कागदपत्रे मिळवून त्याची पडताळणी केली. त्यावेळी यातील बहुतांश आरोपींमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले. त्याबाबतची सविस्तर लेखमालिका जागल्या वेब पोर्टलमध्ये प्रकाशित करण्यात आली.
(पत्रासोबत त्या लेखमालिकेची लिंक पाठवत आहे)

जस्टीस लीग सोसायटीच्यावतीने या लेख मालिकेची दखल घेऊन मा. राज्यपाल, कुलगुरू व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची लेखी तक्रार दाखल केली आहे. आता तरी कुलगुरू सर याची सखोल चौकशी करतील असे अपेक्षित होते. मात्र तीन महिने उलटले तरी कुलगुरूंनी यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

राज्यपालांकडून चौकशीचे निर्देश

राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरूंना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करावी असे निर्देश देण्यात आले. आता तरी कुलगुरू चौकशी करतील असे अपेक्षित होते. त्याबाबत जागल्या वेब पोर्टलकडून त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता आम्ही गोपनीय चौकशी करून राज्यपालांना अहवाल पाठवला असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले आहे.

राज्यपालांनी कुलसचिवांच्या चौकशीबाबत दिलेले निर्देश

गोपनीय चौकशी कशासाठी?
मुळात चौकशीमध्ये ज्या जागल्या वेब पोर्टलने पुराव्यानिशी हे गैरव्यहार उजेडात आणले त्यांच्या प्रतिनिधींना तसेच ज्या जस्टिक लीग सोसायटीने याबाबत लेखी तक्रार केली त्यांना आतापर्यंत त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलावण्यात आलेले नाही.
मुळात ही चौकशी गोपनीय का, उघडपणे पारदर्शक चौकशी करायला कुलगुरू का तयार नाहीत असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

कुलगुरूंकडून लपवा-छपवी

कुलगुरूंकडे जस्टीस लीग सोसायटीच्या तक्रारीवर काय कारवाई केली याची माहिती अधिकारात विचारणा केली असता त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. सिनेट सदस्य शशिकांत तिकोटे यांनी याबाबत प्रश्न विचारला असता कुलगुरूंनी हा प्रश्न आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून वगळला आहे. एकंदरीत याप्रकरणात प्रचंड लपवा-छपवी सुरू आहे.

कुलसचिव ही हिंमत दाखवणार का?

जागल्या वेब पोर्टलकडून याप्रकरणाचा पाठपुरावा केला जाऊ नये यासाठी कुलसचिवांनी आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून धुळे, जळगाव, चाळीसगाव, पुणे आदी ठिकाणांहून जागल्यावर अब्रुनुकसानीचे खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यभरातून खटले दाखल करण्याची खेळी जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी खेळण्यात आली आहे. मात्र या खटल्यांना सामोरे जाऊन न्यायालयात आमच्याकडील पुरावे मांडण्यास आम्ही सज्ज आहोत. पण आता प्रश्न हा उरतो की, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार चौकशीला सामोरे जाण्याची हिंमत दाखवणार का?

कुलगुरूंना कुलसचिवांची इतकी भीती का वाटते?

आपण सगळे जाणतोच विद्यापीठाचे कुलसचिव हे केवळ प्रशासकीय पद आहे. त्यांनी केवळ प्रशासकीय नियमन करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या 3-4 वर्षात विद्यापीठाचा सर्व कारभार कुलगुरूंच्या ऐवजी कुलसचिवच चालवत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. कुलगुरूंकडे काही प्रश्न घेऊन गेल्यास ‘प्रफुल्लला विचारून सांगतो’ असे त्यांनी उत्तर दिल्याचे अनेकदा ऐकायला मिळाले आहे.

कुलगुरू सर खुर्चीवर बसले की खुर्ची त्यांच्यावर बसली’ हेच समजले नाही

मागच्या आठवड्यात विद्यापीठातील एका विभागात गेलो होतो. तिथे एक प्राध्यापिका भेटल्या. सहज विद्यापीठात काय चालले आहे, याचा विषय निघाला. त्यावेळी त्या म्हणाल्या, “दीपक खर सांगू, गेले 5 वर्षे कुलगुरू सर खुर्चीवर बसले की खुर्ची त्यांच्यावर बसली, हेच समजले नाही”

मॅडमचे हे वाक्य ऐकून मी खरंच आवाक झालो कारण एका वाक्यात त्यांनी कुलगुरूंच्या 5 वर्षाच्या कारभाराचा सार मांडला होता.

असो, या मॅडम प्रमाणे विद्यापीठाशी संबंधित प्रत्येकजण कुलगुरूंच्या कामाचा हिशोब आपापल्या पातळीवर करतीलच. तसेच विद्यापीठाचा इतिहास मांडला जाईल तेव्हा कुलगुरूंच्या भल्याबुऱ्या कार्याची नोंद ही त्यात नक्की होईल.

पण, आपण त्या इतिहासाचे मूक साक्षीदार होता कामा नये. सिनेट सदस्य वेळोवेळी कुलगुरूंच्या या कारभारावर आवाज उठवत आले आहेतच. आता ही येणाऱ्या सिनेटमध्ये “कुलसचिवांच्या गैरव्यवहार चौकशीचे काय?” हा प्रश्न आपण नक्की उपस्थित करावा. त्याचे ठोस उत्तर देण्यास कुलगुरूंना भाग पाडावे, ही सर्व सिनेट सदस्यांना नम्र विनंती.

आपला,
दीपक जाधव
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – 9922201192
ई-मेल – deepak.jadhav23@gmail.com

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply