भारतीय संविधान हाच राष्ट्रीय धर्म – प्रा. शरद गायकवाड

You are currently viewing भारतीय संविधान हाच राष्ट्रीय धर्म – प्रा. शरद गायकवाड

सातारा, दि. 28 मार्च 2022

भारतीय संविधान हाच समग्र भारतीयांचा खरा राष्ट्रीय धर्म आहे. त्याचे पालन केले पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक प्रा.डाॅ. शरद गायकवाड यांनी व्यक्त केले.


येथील संबोधी प्रतिष्ठानचे वतीने तेरावा कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रा. शरद गायकवाड यांना ज्येष्ठ साहित्यिक, अनुवादक, संपादक किशोर दिवसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
विचारमंचावर संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह ॲड. हौसेराव धुमाळ, विश्वस्त डॉ.सुवर्णा यादव उपस्थित होते.


प्रा.गायकवाड म्हणाले, सातारच्या पुरोगामी चळवळीने मला घडवले आहे.युक्रेन वरील रशियाच्या आक्रमणावरुन जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे सिद्ध झाले आहे. फुले-आंबेडकर विचार प्रबोधनाचा जागर करणे, आंबेडकरवाद समाजामध्ये रुजवणे हेच आहे माझे ध्येय आहे. बौद्ध व मातंग समाजातील पिढ्यान पिढ्यांची दरी मुजवण्याचे व पंंचशीलाचा झेंडा फडकवण्याचे काम अखेरच्या श्वासापर्यंत करत रहाणार असल्याचा निर्धार प्रा. गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला. आपलं बालपण हलगी वाजविण्यात,पोतराजकीच्याअंधश्रद्धेत गेले. आता मी बुद्धाचा ध्यास घेतला असून ‘हलगी सोडा, माणसं जोडा ‘ मोहीम राबवून समाजा -समाजातील दरी कमी करण्यासाठी काम करत आहे.


प्रमुख पाहुणे किशोर दिवसे म्हणाले, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची नितांत गरज आहे. तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे.


प्रा. सुवर्णा यादव यांनी पीएचडी पदवी प्राप्त केल्या बद्दल त्यांचा प्रमुख पाहुणे किशोर दिवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रा.शरद गायकवाड यांना राजेंद्र गायकवाड यांनी फेटा बांधला. या वेळी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शिक्षक आघाडी, ॲट्रॉसिटी जनजागरण कृती समिती, सातारा आदी विविध संस्था, संघटना व व्यक्तींच्या वतीने सत्कार करण्यात आला.


प्राचार्य भाऊसाहेब खराते यांनी प्रतिष्ठानचे आजीव सभासदत्वाचा पाच हजार रुपयांचा धनादेश यावेळी दिला.त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.


प्रास्ताविक दिनकर झिंब्रे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सुवर्णा यादव यांनी करुन दिला. रमेश इंजे यांनी संस्थेची व कॅप्टन पुरस्काराची माहिती दिली. हौसेराव धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.यशपाल बनसोडे यांनी आभार मानले.
प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष केशवराव कदम,कॅप्टन साहेबराव बनसोडे यांच्या पत्नी यमुनाताई व बनसोडे कुटुंबीय , राजश्री गायकवाड,शाहू गायकवाड, जयवंत सावंत, प्रकाश गायकवाड, नवनाथ लोंढे, पत्रकार अरुण जावळे, अनिल वीर, सुनील रोकडे, विष्णु धावडे,सर्पमित्र जनार्दन घाडगे, प्रकाश खटावकर रघुनाथ बाबर, भालचंद्र माळी,शाहीर श्रीरंग रणदिवे, बळीराम भिसे,अमर गायकवाड, धनसिंग सोनावणे,संदीप जाधव, विजय लोंढे,जय टोणे, अरुण अडागळे , आदित्य लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply