वेबपोर्टल, यू-ट्यूब चॅनल, सोशल मीडिया या डिजिटल माध्यमांमुळे प्रस्थापित वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांना एक सशक्त पर्याय आता उभा राहिला आहे. राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी व हिंदीमध्ये द वायर, प्रिंट, मोजो, लल्लन टॉप अशी अनेक वेब पोर्टल व यू-ट्यूब चॅनल एक चांगली पत्रकारिता करत आहेत.

मराठीमध्ये असे पर्यायी नव-माध्यम उभे राहण्याची गरज जाणून आम्ही 26 जानेवारी 2020 रोजी जागल्या वेब पोर्टलची सुरुवात केली. निर्भिड व स्वतंत्र पत्रकारिता करण्याच्या हेतूने जागल्या सुरू करण्यात आले आहे.

पत्रकारिता, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन हे वेब पोर्टल उभे केले आहे.

सार्वजनिक आरोग्य, उच्च शिक्षण, रोजगार आदी क्षेत्रात जागल्या प्राधान्याने काम करत आहे. या विषयात गेल्या 2 वर्षात जागल्याने अनेक इम्पॅक्ट घडवून आणले आहेत.

खाजगी हॉस्पिटलच्या उपचार सुविधांच्या दरांवर शासनाचे नियंत्रण असले पाहिजे. खाजगी हॉस्पिटलनी दरपत्रक दर्शनी भागात लावले पाहिजे. सरकारी हॉस्पिटलच्या सुविधांचा दर्जा सुधारला पाहिजे. वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळाले पाहिजे. तरुण-तरुणींना रोजगार व करिअरच्या पुरेशा संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत आदींसाठी जागल्या वेब पोर्टल सातत्याने वार्तांकन करत आहे.

त्याचबरोबर भवतालच्या सामाजिक चळवळींनी मांडलेल्या मुलभूत प्रश्नांना बातम्यांच्या माध्यमातून भिडण्याचे काम ही जागल्या करत आहे.

‘जागल्या’ या शब्दाचा अर्थ आहे पहारेकरी. पूर्वीच्या काळी गावामध्ये रात्री गस्त घालणाऱ्यांना जागल्या असं म्हटलं जायचं. या जागल्यांमुळे सर्व गावकरी सुखाची झोप घेऊ शकत होते.

आज समाजात सर्व घटकांना निर्भयपणे व चांगले आयुष्य जगता यावे म्हणून धडपडणाऱ्या असंख्य जागल्यांची गरज आहे.

सामाजिक चळवळी, संघटनांमधील कार्यकर्ते, सजग नागरिक तसेच वृत्तपत्रे, दुरचित्रवाहिन्या, आकाशवाणी आदी प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार असे अनेकजण सातत्याने जागल्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

आम्ही समाजातील या जागल्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा, आमच्या पातळीवर जागल्याची जबाबदारी पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहू.

जागल्या परिवारात सहभागी व्हा

सर्व वाचकांना आम्ही आवाहन करतो की आपण जागल्यासाठी लिखाण करावे. विविध विषयांवर व्यक्त व्हावे, त्याला आम्ही उचित प्रसिद्धी देऊ. आपले लिखाण [email protected] यावर पाठवता येईल.

जागल्या वेब पोर्टल हे लोकवर्गणीतून चालवले जाते. आपण जागल्याचे ऐच्छिक वर्गणीदार (200 रु, 500 रु,1000 रु) होऊन आमच्या पत्रकारितेला आपले पाठबळ द्यावे. ऐच्छिक वार्षिक वर्गणी, देणगी गुगल पे/फोन पे द्वारे 9922201192 या क्रमांकावर भरू शकता.

त्याचबरोबर जागल्याच्या लेखमालिकांसाठी विषय सुचवून त्यासाठी फेलोशिप, देणगी देऊ शकता.

टीम जागल्या
दीपक जाधव,
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – [email protected]