प्रभारी कुलगुरूंपुढे विद्यापीठाची विस्कटलेली घडी सुरळीत करण्याचे आव्हान

You are currently viewing प्रभारी कुलगुरूंपुढे विद्यापीठाची विस्कटलेली घडी सुरळीत करण्याचे आव्हान

पुणे, दि. 18 मे 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया पूर्ण होऊन ते रुजू होण्यास आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉ. कारभारी काळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू काम करण्यासाठी मोठा कालावधी मिळणार आहे. गेल्या 5 वर्षात स्वैरपणे उधळलेल्या प्रशासनाला शिस्त लावण्याचे महत्त्वाचे काम त्यांना या काळात करावे लागणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या 5 वर्षात घेतले गेलेले बेकायदेशीर निर्णय, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेले गैरव्यवहार, 300 कोटींच्या मुदतठेवी तोडून केलेली उधळपट्टी, विविध विभागांच्या शैक्षणिक कामकाजाकडे झालेले दुर्लक्ष आदींमुळे विद्यापीठाची एकूणच घडी विस्कटलेली आहे. त्याचबरोबर कोविड काळात वाढविण्यात करण्यात आलेली तिप्पट शुल्कवाढीचा प्रश्न ही गंभीर बनला असून विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत मोठा रोष आहे.

आत्मविश्वास हरवलेल्या नेतृत्वामुळे गेल्या 5 वर्षात विद्यापीठाच्या प्रशासनाची गती चांगलीच मंदावली आहे. त्याचा गैरफायदा प्रशासकीय कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या तसेच व्यवस्थापन परिषेदेचे प्रतिनिधित्व करत असलेल्या काही लोकांनी घेतला आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार विद्यापीठात झाला आहे. त्याची उच्च शिक्षण विभाग, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अशा विविध स्तरांवर चौकशी सुरू आहे. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी बेकायदेशीरपणे घेतलेली 50 हजारांच्या वेतनवाढ प्रकरणी उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. यापार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या अतिरिक्त कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविण्यात आलेल्या डॉ. कारभारी काळे यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.

माजी आयएएस अधिकारी रत्नाकर गायकवाड यांच्याकडे कुलगुरू पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार असताना त्यांनी आपल्या कामाच्या धडाक्याने विद्यापीठातील अनेक कामे मार्गी लावली होती. त्याची आठवण आज ही विद्यापीठात काढली जाते. तशाच कामाची अपेक्षा डॉ. कारभारी काळे यांच्याकडून केली जात आहे.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply