राज्य सेवा परीक्षेमध्ये उर्दू साहित्य हा वैकल्पिक विषय एमपीएससीने उपलब्ध करावा

You are currently viewing राज्य सेवा परीक्षेमध्ये उर्दू साहित्य हा वैकल्पिक विषय एमपीएससीने उपलब्ध करावा

जव्वाद काझी

नुकताच एमपीएससीने राज्य सेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धती आणि पाठ्यक्रमात बदल केला. हा बदल पुढच्या वर्षीपासून लागू होईल. या बदलावर यूपीएससीच्या पाठ्यक्रमाचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. या बदलानुसार एमपीएससी मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक होणार आहे. यामध्ये यूपीएससीच्या धर्तीवर सामान्य अध्ययनचे चार पेपर्स, निबंधाचा एक पेपर आणि वैकल्पिक विषयाचा एक पेपर असेल ज्यासाठी गुणांची व्यवस्था युपीएससीप्रमाणेच असणार आहे.

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी या दोन्ही परीक्षांची तयारी करणे आता शक्य होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत आहे. इतर काही राज्यांनी या आधीच याप्रकारचे निर्णय घेतले आहेत. वर्णनात्मक परीक्षा पद्धती मुळे उमेदवारांची ज्ञानाची खोली तसेच त्यांची क्षमता तपासता येणार आहे ज्यामुळे प्रशासनाला अधिक चांगले आणि सक्षम अधिकारी मिळू शकतील.

परंतु या परीक्षांमधील मुख्य फरक म्हणजे वैकल्पिक विषयांची यादी. युपीएससी पदवी स्तरावरील विषयांसोबतच संविधनामध्ये नमूद भाषांचे साहित्य यांचा वैकल्पिक विषय म्हणून समावेश करते. एमपीएससीने मात्र केवळ मराठी विषयाच्या साहित्याचा वैकल्पिक विषय (इतर पदवी स्तरावरील विषयांसोबत) म्हणून समावेश केला आहे. मराठी साहित्य विषयाचा वैकल्पिक विषय म्हणून समाविष्ट करणे साहजिक आणि तार्किकच आहे. परंतु उर्दू साहित्य विषयाचा देखील वैकल्पिक विषय म्हणून समावेश व्हावा ही देखील न्याय्य आणि तार्किक मागणी आहे. या मागणीचा समर्थनार्थ काही मुद्दे पाहू.

पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील उर्दू भाषिकांची लोकसंख्या. वायर या वृत्तसंस्थेमध्ये प्रकाशित बातमीनुसार महाराष्ट्रातील उर्दू मातृभाषा असणारी लोकसंख्या ७५.४ लाख इतकी आहे (२०११ची जनगणना). जी की भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. उर्दू ही महाराष्ट्रात बोलली जाणारी तिसरी सर्वात मोठी भाषा आहे (मराठी आणि हिंदी खालोखाल). महाराष्ट्रातील उर्दू भाषिकांची संख्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातील उर्दू भाषिकांच्या एकत्रित संख्येहून अधिक आहे. २०११ च्या जनगणनेनुसार उत्तर भारतातील उर्दू भाषिकांची संख्या कमी होत आहे परंतु महाराष्ट्रातील उर्दू भाषिकांची संख्या वाढत आहे. आपण हे देखील लक्ष्यात घेतले पाहिजे कि उर्दू मातृभाषाअसणारे बरेच लोक हिंदी आमची मातृभाषा आहे असे जनगणनेत नोंदवितात.

२०११ च्या जनगणना नुसार मातृभाषा निहाय लोकसंख्या


मराठी – 77461172
हिंदी – 14481513
उर्दू – 7540324

दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील उर्दू शाळांची संख्या. टाटा समाज विज्ञान संस्थेच्या अब्दुल शबान यांच्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग साठी केलेल्या संशोधनानुसार (२०१४ ) राज्यात प्राथमिक ते उच्च माध्यमिक उर्दू माध्यमातील शाळांची एकूण संख्या देशात सर्वाधिक (४९००) आहे. म्हणजेच राज्यात १३ लाख विद्यार्थ्यांची शालेय माध्यमाची भाषा उर्दू आहे. याचाच अर्थ उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी आहे.

या ठिकाणी हे नमूद करायला हवे की ज्या विद्यार्थ्यांचे माध्यम उर्दू आहे तेच उर्दू साहित्य हा वैकल्पिक विषय निवडतील असे नाही. तसेच तांत्रिक पदवी घेऊन उर्दू साहित्य हा वैकल्पिक विषय घेऊन सनदी सेवा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. उदा. शहादा येथील शकील अन्सारी यांच्याकडे बीएससी ही पदवी आहे परंतु ते २०११ साली उर्दू साहित्य हा वैकल्पिक विषय घेऊन सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. तसेच औरंगाबाद येथील नूह सिद्दीकी यांच्याकडे तांत्रिक पदवी आहे परंतु त्या देखील उर्दू साहित्य हा वैकल्पिक विषय घेऊन आयआरएस अधिकारी झाले. महाराष्ट्रातील याच प्रकारची अनेक उदाहरणे देता येतील.

नजीकच्या काही काळात उर्दु साहित्य हा वैकल्पिक विषय घेऊन सनदी सेवेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. पाठ्यक्रम आणि परिक्षा पद्धती तील नवीन बदलामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि युपीएससी दोन्ही परीक्षांची तयारी एकच वेळी करणे शक्य होणार आहे. परंतु एमपीएससी परीक्षांसाठी उर्दू साहित्य हा वैकल्पिक विषय उपलब्ध नसेल तर त्यांना दुसऱ्या वैकल्पिक विषयांची नव्याने तयारी करावी लागेल.

उर्दू भाषेचे महाराष्ट्राशी खूप गहिरे नाते आहे हे आपण विसरता कामा नाही. या भाषेच्या निर्मितीमध्ये दख्खनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दख्खनी उर्दूवर मराठीचा व इतर प्रादेशिक भाषांचा जसे कि तेलुगू, कन्नड – प्रभाव सर्वज्ञात आहे. कित्येक उर्दू तज्ज्ञ महाराष्ट्राशी संबंधित आहेत तसेच महाराष्ट्राला उर्दू पत्रकारिता आणि साहित्याची उज्ज्वल परंपरा आहे. महाराष्ट्र शासनाने ‘उर्दू घर’ सारखे उपक्रम राबवून उर्दू भाषेचा प्रसारासाठी प्रोत्साहन दिले आहे.

उर्दू वैकल्पिक विषय म्हणून निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील इतरांप्रमाणे अनिवार्य मराठी या पेपरमध्ये उत्तीर्ण होणे बंधनकारक असेलच. तसेच त्यांना अधिवासाची अट पूर्ण करणे देखील बंधनकारक आहे. त्यामुळे उर्दू साहित्य हा वैकल्पिक विषय निवडल्याने इतर विद्यार्थ्यांवर त्याचा काही नकारात्मक परिणाम होणार नाही.

एकंदरीत उर्दू शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसताना या रूपवान मनोहर भाषेची चमक कमी होत आहे. जर एमपीएससीने उर्दू साहित्य हा वैकल्पिक विषय उपलब्ध करून दिला तर या भाषेला थोडी मदत मिळेल. ही भाषा महाराष्ट्राच्या मातीशी जोडली गेली आहे तसेच ती महाराष्ट्राच्या आणि भारताच्या बहुपेडी संस्कृतीचे प्रतीक आहे. या भाषेला तिचे योग्य मान आणि स्थान मिळायला हवे.

जव्वाद काझी

पुणे, भारत

संपर्क – 7264919482

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply