कुलसचिवांवर कॅन्टीनबाबत काय आहे आरोप आणि तपासणीत हे झाले निष्पन्न

You are currently viewing कुलसचिवांवर कॅन्टीनबाबत काय आहे आरोप आणि तपासणीत हे झाले निष्पन्न

जागल्या पडताळणी भाग : 1

दीपक जाधव

पुणे, दि. 23 डिसेंबर 2021

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विभागप्रमुखांना एक निनावी पत्र पाठवून कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर 23 गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांनी मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार केल्याचा दावा करण्यात आला आहे.

यातील सर्व आरोप गंभीर असल्याने शासनाच्या तसेच विद्यापीठाच्या वरिष्ठ स्तरावरून याची सखोल चौकशी व कारवाई होणे आवश्यक होते. मात्र पत्र निनावी असल्याने चौकशी करता येत नसल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे करण्यात येत आहे.

त्यामुळे जागल्या वेब पोर्टलने या आरोपांबाबतच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिथे गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न होईल त्याविरुद्ध पुराव्यानिशी लेखी तक्रार केली जाणार आहे. त्यानुसार कॅन्टीनबाबतच्या आरोपाची तपासणी करण्यात आली आहे.

पत्रात करण्यात आलेला कॅन्टीनबाबतचा आरोप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बांबू हाऊस कॅन्टीन/मेस, मेन गेस्ट हाऊस कॅन्टीन आणि सेट गेस्ट हाऊस कॅन्टीन आहेत. हे तिन्ही कॅन्टीन राहुल डोंगरदिवे या एकाच व्यक्तीला देण्यात आले. बांबू हाऊस कॅन्टीन/मेसला कोणतेही भाडे न आकारता ते देण्यात आले. याबदल्यात कुलसचिव प्रफुल्ल पवार यांना महिना 50 हजार रुपये व व्हेज-नॉनव्हेज जेवण पुरवले जात आहे.

जागल्या वेब पोर्टलची पडताळणी :

जागल्याच्या टीमने बांबू हाऊस कॅन्टीन/मेस, मेन गेस्ट हाऊस कॅन्टीन आणि सेट गेस्ट हाऊस कॅन्टीन यांच्या टेंडर प्रक्रियेची कागदपत्रे तपासली.

विद्यापीठातील तिन्ही कॅन्टीन राहुल डोंगरदिवे या एकाच व्यक्तीला तीन वर्षांसाठी देण्यात आल्याच्या आरोपात तथ्य आढळले.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दोन हजार स्क्वेअर फुटापेक्षा जास्त जागा असलेले बांबू हाऊस कॅन्टीन/मेस कोणतेही भाडे न घेता राहुल डोंगरदिवे याला देण्यात आल्याच्या आरोपात ही पूर्ण तथ्य असल्याचे निष्पन्न झाले.

बांबू गेस्ट हाऊसमधून कुलसचिवांच्या घरी व्हेज-नानव्हेज जेवण पोहचवले जात असल्याबाबत सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

मेन गेस्ट हाऊस व सेट गेस्ट हाऊस या दोन्ही कॅन्टीनला मिळून 45 हजार रुपये भाडे आकारण्यात आले आहे.

हे कॅन्टीन चालवण्यासाठी तीन वर्षांचा अनुभव आवश्यक असल्याची अट होती. मात्र राहुल डोंगरदिवे याने सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्राबाबत संदिग्धता आहे. या प्रमाणपत्राची तपासणी संबंधित परवाना कार्यालयातून केली जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासन, सर्व 52 विभाग येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी राहुल डोंगरदिवे याच्याकडेच जेवणाची ऑर्डर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा त्यांचे बिल वित्त विभागाकडून मंजूर केले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या जेवणावळीवर वर्षभरात किती कोटींचा खर्च होतो याची माहिती संकलित केली जात आहे.

एकंदरीतच 23 आरोपांमधील पहिल्याच आरोपांच्या पडताळणीत खूप काही चुकीचे घडत असल्याचे स्पष्ट होत आहे. तपासणीत आढळलेले सर्व तथ्य आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. आता विद्यार्थी संघटना, आजी-माजी विद्यार्थी व विद्यापीठावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी याचे पुढे काय करायचे ते ठरवायचे आहे.

उत्पन्न नाही म्हणून विद्यापीठात फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून महिना हजार रुपये शुल्क आकारण्यास निघालेले विद्यापीठ प्रशासन, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार राहुल डोंगरदिवेवर इतके मेहरबान का झाले आहेत? कुलसचिव पदावरील व्यक्ती एका कॅन्टीन चालकासोबत इतके घनिष्ठ संबंध का ठेवतोय? व्यवस्थापन परिषद, कुलगुरू, प्र-कुलगुरू यांची याला मूक संमती का आहे? कुलसचिवांना यामध्ये दरमहा 50 हजार रुपये मिळतात का? असे काही प्रश्न अनुत्तरित आहेत. साहजिकच कागदपत्रांमध्ये याची उत्तरे मिळणार नाहीत.त्यामुळे जागल्या वेब पोर्टलच्या तपासणीत सिद्ध झालेली तथ्य व अनुत्तरित राहिलेले प्रश्न याबाबत उच्च शिक्षण मंत्री व कुलगुरूंकडे लेखी तक्रार केली जाणार आहे.

क्रमश:

आवाहन : कुलसचिवांवरील आरोपांबाबत ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निनावी पत्राद्वारे आरोप केले आहेत. त्यांनी याबाबत त्यांच्याकडे काही पुरावे असल्यास ते जागल्या वेब पोर्टलकडे सुपूर्त करावेत.
संपर्क – दीपक जाधव, संपादक, जागल्या वेब पोर्टल, मोबाईल क्रमांक – 9922201192, ई-मेल – deepak.jadhav23@gmail.com

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply