गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सिनेटने धरले धारेवर, प्रशासनाकडून खोटी उत्तरे देत दिशाभूल

You are currently viewing गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सिनेटने धरले धारेवर, प्रशासनाकडून खोटी उत्तरे देत दिशाभूल

पुणे, 30 मार्च 2022

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले असताना ही त्यांची चौकशी न करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला बुधवारी सिनेट सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. मात्र याबाबत जस्टिस लीग सोसायटीने लेखी तक्रार दाखल केली असताना ही विद्यापीठाकडे केवळ निनावी पत्र आले असल्याची खोटी माहिती देत सिनेट सदस्यांची दिशाभूल विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली.

कुलसचिव डॉ. प्रफुल पवार यांच्यावर निनावी पत्राद्वारे 23 गंभीर आरोप करण्यात आले. जागल्या वेब पोर्टलने या आरोपांची पडताळणी करून तसेच यासंबंधीची कागदपत्रे तपासून यातील बहुतांश आरोपांमध्ये तथ्य आढळून येत असल्याचे एका लेखमालिकेद्वारे उजेडात आणले.

निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी

बुधवारी सिनेटमध्ये कुलसचिवांवर झालेल्या आरोपांबाबत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. याप्रकरणी कुलसचिवांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. सिनेट सदस्य नंदू पवार म्हणाले, कुलसचिव यांच्या गैरकारभाराबाबत प्रसारमाध्यमामध्ये अनेक बातम्या आल्या आहेत. त्यामुळे ही सभा तहकुब करावी आणि त्यावर चर्चा करावी. तसेच या गैरव्यवहाराची निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी.

सिनेट सदस्य कान्हू गिरमकर म्हणाले, विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर होत असलेल्या या गैरव्यव्हाराच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल खचले जाते. जर अधिकाऱ्यांनी गैरव्यव्हार केला नसेल तर त्यांना भीती कसली. ‘कर नाही तर डर कशाला’ अशी म्हण आहे त्यामुळे आरोपांची विद्यापीठ प्रशासनाने सखोल चौकशी करावी.

सिनेट सदस्य राजीव साबडे म्हणाले, सिनेट सदस्यांना विश्वासात घेऊन कुलगुरूंनी काय गोपनीय चौकशी केली त्याचा अहवाल सादर केला पाहीजे.

सिनेट सदस्य संजीव सोनवणे म्हणाले, संबंधित आरोपांचे कागदपत्र मागवावेत, त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन याची चौकशी करावी.

गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासह विविध मागण्यांसाठी प्राध्यापक संघटनेच्यावतीने मुख्य इमारतीसमोर आंदोलन करण्यात आले.


स्थगन प्रस्तावाला उत्तर देताना कुलगुरू डॉ . नितीन करमळकर म्हणाले, ” प्रत्येक कुलगुरूंचा कार्यकाल संपत आल्यावर असे आरोप होतात . विद्यापीठाला जे पत्र आले ते निनावी आहे . त्यामुळे ते फक्त दप्तर दाखल होते. निनावी पत्र असतानाही विद्यापीठाने एक तज्ज्ञ लोकांची चौकशी समिती बनवली . या संबंधीचा अहवाल राज्यपालांना पाठविण्यात आला आहे .

जागल्याची भूमिका
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सातत्याने केवळ हे निनावी पत्र आहे असे सांगून सिनेटची पूर्ण दिशाभूल केली. या निनावी पत्राच्या आधारे जागल्या वेब पोर्टलने केलेली पडताळणी, पुराव्यानिशी मांडलेल्या बातम्या आणि त्याआधारे जस्टिक लीग सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विजयसिंह ठोंबरे यांनी 4 जानेवारी 2022 रोजी दाखल केलेली लेखी तक्रार याबाबत त्यांनी सिनेटला अंधारात ठेवले. केवळ अर्धवट माहिती देऊन त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली. सिनेटमध्ये खोटी माहिती देणे हा त्या सभागृहाचा अपमान व कायदेशीर फसवणूक आहे.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply