हा प्रवास किलोमीटरमध्ये मोजता येणारा नाही. कारण त्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात दाखल व्हायला अनेक पिढ्या जाव्या लागल्या आहेत.

You are currently viewing हा प्रवास किलोमीटरमध्ये मोजता येणारा नाही. कारण त्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात दाखल व्हायला अनेक पिढ्या जाव्या लागल्या आहेत.

पुणे, १ एप्रिल २०२२

महाराष्ट्रातील मेळघाटच्या अति दुर्गम भागातील २२ कोरकू आदिवासी विद्यार्थी एका महत्त्वाकांक्षी शिक्षण यात्रेनिमित्त पुण्यात दाखल झाले आहेत. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा हे विद्यार्थी ट्रेनमध्ये चढले आहेत तसेच अनेक जिल्ह्यांचा सीमा ओलांडत पुण्यात आले आहेत. हा प्रवास किलोमीटरमध्ये मोजता येणारा नाही. कारण ही शिकणारी त्यांची पहिलीच पिढी असून त्यांना उच्च शिक्षणात दाखल व्हायला त्यांच्या अनेक पिढ्या उलटाव्या लागल्या आहेत.

या विद्यार्थ्यांना शहरांतील शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणाशी ओळख करून देण्यासाठी एकलव्य फाऊंडेशन यवतमाळ आणि सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ तर्फे ही यात्रा आयोजित केली आहे.

मेळघाटहून 30 मार्चला निघालेले विद्यार्थी 31 मार्चला सकाळी पुण्यात दाखल झाले. पहिल्या दिवशी फुले वाड्यातून यात्रेची सुरुवात झाली. एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश राऊत यांनी फुले वाड्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

त्यानंतर एस. पी. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय आणि कर्वे सामाज सेवा संस्था येथे विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. या भेटी दरम्यान त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी मोकळेपणे गप्पा मारल्या. आदिवासी संस्कृती आणि परंपरा याविषयी शहरातील विद्यार्थ्यांना अवगत केले. सांस्कृतिक देवाणघेवाणीतून या विद्यार्थ्यांना शिकायला मिळतं आहे आणि महत्वाचे म्हणजे यातून शहरातील विद्यार्थी ही समृद्ध होत आहेत.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी १ एप्रिल रोजी शनिवार वाडा, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, रानडे पत्रकारिता आणि जनसंपर्क संस्था आणि पुणे विद्यापीठ परिसर या ठिकाणी ही यात्रा भेट देणार आहे. सायंकाळी ७ वाजता पुणे विद्यापीठ परिसरात संवाद सभा आयोजित केली आहे. या सभेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी यात्रेचे समन्वयक श्री विशाल डोळे यांच्याशी 88882 91079 या क्रमांकावर संपर्क करावा.

तिसऱ्या दिवशी २ एप्रिल रोजी सिंहगड आणि पुणे मेट्रो भेट देऊन सायंकाळी झूंड चित्रपट बघणार आहेत.

चिखलदराच्या विद्यार्थ्यांना एकलव्यचे पाठबळ

हे विद्यार्थी मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील हाथरु या भागातील असून १२ वी पर्यंत जवळच्या आश्रम शाळेत शिकतात. मात्र पुढील शिक्षणासाठी या भागात सोई आणि प्रोत्साहन नसल्यामुळे १२ वी नंतर मोठ्या प्रमाणावर गळती होते. बरेच तरुण अमरावती किंवा बेतुल सारख्या शहरात बांधकाम मजूर म्हणून काम करतात. या भागात पदवीधर तरूण अभावानेच सापडतात.

एकलव्य फाऊंडेशन कोरकू आदिवासी विद्यार्थ्यांसोबत त्यांची महाविद्यालयीन गळती कमी करण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण आणि करिअर घडवण्यासाठी एकलव्य फाऊंडेशन ४ वर्षांहून अधिक काळापासून काम करत आहे. यातून २२ विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. हे विद्यार्थी यवतमाळ येथील सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय येथे पदवीचे शिक्षण घेत आहेत. त्यांना शिक्षणात टिकवून ठेवण्यासाठी एकलव्य सातत्याने काम करत आहे. त्यांना इंग्रजी भाषा आणि इतर आधुनिक कौशल्ये शिकवली जातात.

एकलव्य कडून त्यांना मेंटर (mentor) दिले जाते जे त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मार्गदर्शन करतात. हे विद्यार्थी पदवी नंतर देशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये उच्च घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतात. नुकतेच यातील तीन विद्यार्थी देशातील नामांकित अशा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) आणि अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी च्या पदव्युत्तर अभ्याक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाले असून मुलाखतीत पात्र झाले आहेत.

एकलव्य पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या आदिवासी, ग्रामीण आणि वंचित घटकातील तरूणांना दर्जेदार उच्च आणि करीयरच्या संधी मिळण्यासाठी मदत करते.

या प्रयत्नातून मागील ४ वर्षांत ३५० पेक्षा जास्त विद्यार्थी देशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये ( टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी, आयआयटी, फर्ग्युसन कॉलेज इत्यादी) शिकून आपले अर्थपूर्ण करिअर निश्चित केले आहे. तसे फेलोशिप कार्यक्रमांमध्ये (जसे गांधी फेलोशिप, गुंज फेलोशिप, एस बी आय फाउंडेशन फेलोशिप, टिच फॉर इंडिया फेलोशिप इत्यादी) काम करत आहेत.

जागल्या परिवारात सहभागी व्हा
जागल्या वेब पोर्टल हे लोकवर्गणीतून चालवले जाते. सार्वजनिक आरोग्य, उच्च शिक्षण-रोजगार हे विषय येथे प्राधान्याने मांडले जातात. आपण जागल्याचे ऐच्छिक वर्गणीदार (200 रु, 500 रु,1000 रु) होऊन आमच्या पत्रकारितेला आपले पाठबळ द्यावे. ऐच्छिक वार्षिक वर्गणी, देणगी गुगल पे/फोन पे द्वारे 9922201192 या क्रमांकावर भरू शकता.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply