पडसाद उमटतायत आणि धीम्या गतीने का होईना मात्र बदल घडतायत, त्यामुळेच हे करायला बळ मिळतेय

You are currently viewing पडसाद उमटतायत आणि धीम्या गतीने का होईना मात्र बदल घडतायत, त्यामुळेच हे करायला बळ मिळतेय

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या जे काही आहे त्याविषयी तीव्र नाराजी विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी व्यक्त करत आहेत. काही चुकीच्या गोष्टींविषयी नुकतेच मी लिहल्यानंतर एक खूप मोठ्या असंतोषाला तोंड फुटले आहे. गेले 2 दिवस बरेच लोक फोन करून खूप काही सांगत आहेत.

  1. प्रभारी कुलगुरूंच्या सौंनी 6 लाखांचे पडदे आणि भांडी खरेदी केली असल्याचे काहींनी कळवले आहे. (खर तर कुलगुरूंनी भांडी आपल्या घरून आणायची असतात, त्यांना फक्त बंगला राहायला दिला जाणे अपेक्षित आहे)
  2. व्यवस्थापन परिषद संजय चाकणे यांच्याबाबत तर प्रचंड रोष प्राध्यापकांमध्ये असल्याचा पहायला मिळाले. त्यांच्या विषयी तक्रारी सांगणारे किमान 40 फोन आतापर्यंत आले आहेत. त्यांना इंदापूर कॉलेजच्या प्राचार्य पदावरून सक्तीच्या रजेवर कसे पाठवण्यात आले. तिथली एनओसी न घेता ते खडकीच्या कॉलेजमध्ये कसे जॉईन झाले. एका महिलेला प्रोफेसरशिप मिळू नये म्हणून त्यांनी किती प्रयत्न केले आदी असंख्य फोन आले. अर्थात सध्या विद्यापीठ फंड लूट या विषयावर लक्ष केंद्रित केले असल्याने चाकणे यांच्याबाबतच्या इतर तक्रारी योग्य त्या अधिकार मंडळापुढे मांडण्यास सांगितले आहे. मात्र त्यांनी विद्यापीठ फंडातून बेकायदेशीर उचललेल्या लाखो रुपयांचा भत्यांबाबत आपण निश्चित काम करतो आहोत.

मात्र हे सगळं झालं हिमनगाचे टोक
माझ्यापर्यंत नुकत्याच पोहचलेल्या काही गोष्टी आपण कल्पना करू शकत नाही इतक्या धक्कादायक आहे. (त्यातले एक उदाहरण सांगतो, विद्यापीठाची 5 एकर जमीन 100 रुपयांच्या स्टँप पेपरवर एका संस्थेला भाड्याने देत असल्याचे दाखवून विकली आहे) माजी कुलगुरूंच्या कार्यकाळात बरेच काही घडलं-बिघडलं आहे. यातून एक लक्षात आले आहे की आपल्याला जे माहिती आहे ते केवळ हिमनगाचे टोक होते, त्याखाली बरेच काही दडले आहे.

विद्यापीठातील काही अधिकारी, कर्मचारी पुढे येऊन ही माहिती देत आहेत. त्याबाबतची कागदपत्रे ही गोळा केली जात आहेत. विद्यापीठ फंडाच्या लुटी विरोधात व्हीसल ब्लोअरची (म्हणजे जो चुकीच्या गोष्टी गोपनीयपणे पुढे आणतो तो) मोठी टीम उभी राहत आहे. आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून हे मांडत असलो तरी यामागे व्हीसल ब्लोअरचा मोठा वाटा आहे. ते अधिक धाडसाने पुढे येत असल्यानेच विद्यापीठ फंड लुटीविरोधातील आंदोलन अधिक व्यापक होत चालले आहे.

खरं तर मी सध्या सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या राज्यव्यापी चळवळीत एक पत्रकार म्हणून पूर्णवेळ कार्यरत आहे. महाराष्ट्रातील सर्व सरकारी हॉस्पिटल अत्याधुनिक आणि सुसज्ज झाली पाहिजेत अस स्वप्न बाळगून मी त्या क्षेत्रातल्या लोकांसोबत काम करतोय. हे स्वप्न किती वर्षांनी पूर्ण होईल माहीत नाही, पण दीर्घकाळ या विषयात काम करायचे हे निश्चित केले आहे.

या व्यापात विद्यापीठाकडे लक्ष देणे खर तर शक्य नाही. मात्र विद्यापीठाच्या हितासाठी झटणाऱ्या लोकांच्या आग्रहामुळे आणि खूप काही चुकीचे घडत असल्याने यात लक्ष घालायाचे ठरवले आहे. अर्थात हे तसं अवघड काम आहे, पण मला आणि आमच्या जागल्या वेब पोर्टलच्या टीमला जितके शक्य होईल तितके नक्की करेन.

बाकी दुसरीकडे विद्यापीठ फंडाच्या लुटीला खरी वाचा फुटली ती विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीमुळे. त्याबाबत ही अनेक विद्यार्थी व त्यांच्या संघटना पुढे येत आहेत. काल शुक्रवारी) संध्याकाळी त्यांची बैठक ही झाली. दुसरीकडे विद्यापीठ प्रशासन शुल्क कमी करण्यासाठी पुन्हा एकदा समिती नेमण्याचे नाटक करतय. (त्याचे पुन्हा समिती आणि भत्तेवीर डॉ. संजय चाकणे सदस्य असावेत). असो, विद्यार्थीच त्याचा योग्य तो समाचार घेतील.

जागल्या वेब पोर्टल व सोशल मीडियाच्या माध्यमातून गेली काही वर्षे विद्यापीठातील गैरप्रकारांबाबत जे लिहीत आहोत त्याचे निश्चित जोरदार पडसाद उमटत आहेत. धीम्या गतीने का होईना बदल होत आहेत. विशेषतः आता विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी हे विद्यापीठाचे खरे स्टेक होल्डर जागृत होऊन पुढे येत आहेत. या गोष्टी हे मांडायला आणखी बळ देत आहेत. त्यामुळे याविरोधात आपल्याला शक्य आहे तितके सगळे मिळून झटत राहुयात.

दीपक जाधव,
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – 9922201192
ई-मेल – deepak.jadhav23@gmail.com

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply