विद्यापीठ कॅम्पस बनले चित्रपट स्टुडिओ

You are currently viewing विद्यापीठ कॅम्पस बनले चित्रपट स्टुडिओ

पुणे, दि. 10 मे 2022

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पस गेले काही दिवस चित्रपट स्टुडिओ बनले आहे. विविध वेब सिरीज, चित्रपट, मालिका यांचे शूटिंग सातत्याने विद्यापीठ कॅम्पसमध्ये सुरू आहे. शैक्षणिक कामकाजाच्या दिवशी कोणत्याही चित्रपट शूटिंगला परवानगी देता येणार नाही असा नियम असताना तो डावलून विद्यापीठ प्रशासनाकडून सातत्याने शूटिंगला परवानगी दिली जात आहे. याचा नाहक त्रास विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी यांना सहन करावा लागत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे 12 मे 2022 रोजी विद्यापीठात पदवीदान समारंभ होणार आहे, तरीही त्या दिवशी ही विद्यापीठात शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासन शूटिंगला परवानगी देण्यासाठी इतके मेहरबान का झाले आहे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

व्यवस्थापन परिषदेने शूटिंगला परवानगी देण्यासाठी निश्चित करून दिलेल्या या नियमावलीचा भंग करण्यात आला आहे

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने 29 फेब्रुवारी 2008 रोजी चित्रीकरणाला परवानगी देण्याबाबत नियमावली निश्चित करून दिली आहे. त्यामध्ये शैक्षणिक कामकाजाच्या दिवशी शूटिंगला परवानगी देता येणार नाही असे स्पष्ट नमूद केले आहे. सध्या विद्यापीठात ‘बूट बेटल्स बेटरस’ या वेब सिरीजचे शूटिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सैफ अली खान, ऋतिक रोशन यांच्या चित्रपटांचे शूटिंग झाले. त्यापूर्वी एका ऐतिहासिक मालिकेचे शूटिंग विद्यापीठ कॅपम्समध्ये करण्यात आले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शूटिंगच्या सेटप्रकरणात कुलगुरूंनी भर सिनेटमध्ये दिलगिरी व्यक्त केली होती. तरीही मागचे पाढे पुन्हा सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

मुख्य इमारतीच्या बगीचेमध्ये सुरू असलेले शूटिंग

आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते विद्यानंद नायक यांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या शूटिंगला विरोध दर्शविला आहे. कुलगुरूंकडून विशेषाधिकारात देण्यात येत असलेल्या या परवानगीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची मुदत येत्या 17 मे 2022 रोजी संपणार आहे, तरीही जाता जाता ही नियमबाह्य निर्णय घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल विद्यार्थ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply