कुलगुरू सर व प्र-कुलगुरू सर, ही माझी भाबडी मागणी पूर्ण करता आली तर पहा

You are currently viewing कुलगुरू सर व प्र-कुलगुरू सर, ही माझी भाबडी मागणी पूर्ण करता आली तर पहा

मा. कुलगुरू व प्र-कुलगुरू

सर नमस्कार,

तुम्हा दोघांना ही मी पहिल्यांदाच पत्र लिहतोय.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या कालच्या (27 जून 2022) बैठकीत प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे व प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांना दीड-दीड लाख रुपयांचे ऍपल कंपनीचे मोबाईल देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे मोबाईल कायमस्वरूपी आपल्यालाच दिले जाणार आहेत.

वस्तुतः दोन-चार महिन्यांसाठी प्रभारी म्हणून आपण या पदांवर जॉईन झालो असताना अशी लाखोंची अनावश्यक खरेदी करणे कितपत योग्य आहे.

हे खरंय की तुम्ही म्हणाल, “600 कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या विद्यापीठाचे आम्ही पदाधिकारी आहात. तरीही ही भाबडी मागणी मी का करतोय.”

पण सर, विद्यापीठ आर्थिक अडचणीत आहे म्हणून एकीकडे आपण भरमसाठ शुल्कवाढ करत आहोत. माझ्या अनेक विद्यार्थ्यांचे आई-वडील पै-पै जमा करून विद्यापीठाची फी भरत आहेत. कालच एका महाविद्यालयात शेवटची तारीख असताना ही जेमतेम फी भरू शकत नाही म्हणून एक विद्यार्थिनी रडत होती. अखेर एका निवृत्त प्राध्यापकांनी तिची फी भरली. अशी शेकडो उदाहरणे आहेत. लगेच त्यांची नावे मी तुम्हांला पाठवतो.

अशावेळी या अनावश्यक खरेदी आपण टाळल्या तर बरं होईल. मोबाईल हे एक नाममात्र उदाहरण झाले, असे विद्यापीठात आपण अनावश्यक लाखो रुपयांचा खर्च करतोय. आपण बसूयात त्या अनावश्यक खर्चांची यादी मी तुम्हांला देतो. ते खर्च टाळून या एक-एक गरजू विद्यार्थ्यांची फी आपण भरूयात.

काही करता आले तर नक्की पहा सर, तुमचे खूप उपकार होतील.

फोन वगैरे तर काय सर तुम्हांला इतका भरभक्कम पगार मिळतो, त्यातून तुम्ही हवा तो मोबाईल घेऊ शकाल. पण फी अभावी माझे अनेक विद्यार्थी शिक्षण सोडतायत, ते आपण थांबवू शकू. एकाही विद्यार्थाचे फी अभावी शिक्षण थांबण्याचे आपण वाचवू शकलो तर, तो तुम्हांला आयुष्यभर लक्षात ठेवेल.

बघा सर, मी खूपच भाबडी मागणी करतो, पण त्यामागची तळमळ समजून घेऊन काही करता आले तर नक्की पहा.

आपलाच,
दीपक जाधव
संपादक, जागल्या वेब पोर्टल

ताजा कलम

प्रभारी कुलगुरू व प्रभारी प्र-कुलगुरू यांनी हे आयफोन घेण्याचे रद्द करत असल्याचे कळवले आहे.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply