सर, आमच्या विडी घरकुलमधला सरकारी दवाखाना चांगला करण्यासाठी बायकांना एकत्र करून प्रयत्न करणार बघा

You are currently viewing सर, आमच्या विडी घरकुलमधला सरकारी दवाखाना चांगला करण्यासाठी बायकांना एकत्र करून प्रयत्न करणार बघा

दीपक जाधव

सोलापूरात गुरुवारी झालेल्या आरोग्य हक्क कार्यशाळेचा समारोपाचा कार्यक्रम सुरू होता. शेवटी कार्यशाळेत सहभागी झालेल्यांपैकी कुणाला काही बोलायचे आहे का असे आयोजकांनी विचारले. त्यावेळी एक ताई पुढे आल्या आणि म्हणाल्या, “सर, आमच्या विडी घरकुलमधला सरकारी दवाखाना चांगला करण्यासाठी आता बायकांना एकत्र करणार बघा”

त्या ताईंनी उच्चारलेले हे वाक्य खूप उमेद आणि उत्साह वाढवणारे असे होते तसेच आरोग्य हक्क कार्यशाळेचा उपक्रम योग्य दिशेने चालल्याची ही पावती होती.

साथी संस्थेच्यावतीने राज्यभरात आरोग्य हक्क कार्यशाळा घेतल्या जात आहेत. कोल्हापूर, इचलकरंजी, नाशिक पाठोपाठ गुरुवारी सोलापुरात आरोग्य हक्क कार्यशाळा पार पडली. यावेळी अस्तित्व संस्थेचे शहाजी गडहिरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोकाशी, व्ही. बी. गायकवाड उपस्थित होते.

सोलापूर येथील आरोग्य हक्क कार्यशाळा

आरोग्य हक्क कार्यशाळा संपल्यानंतर सहभागी झालेल्या लोकांचे चेहरे चमकू लागतात. आज आपल्याला आपल्या हक्कांबद्दल खूप काही नवं गवसले असल्याची भावना त्यांचा चेहऱ्यावर झळकू लागते. या कार्यशाळा झाल्यानंतर त्या त्या शहरात आरोग्य हक्क समित्या तयार होऊ लागल्या असून तिथले सरकारी दवाखाने सक्षम करण्यासाठी ते पावले उचलू लागले आहेत. कोल्हापूरात रवी देसाई, इचलकरंजीत शाहीन शेख, नाशिकमध्ये संतोष जाधव तर सोलापूरात शहाजी गडदरे यांच्या पुढाकारातून आरोग्य हक्काची चळवळ उभी राहत आहे.

सामान्य माणसाला आरोग्याचे कोणते हक्क मिळालेले आहेत, सरकारी व खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना उपचार सुविधा कशाप्रकारे मिळणे आवश्यक आहे, महात्मा फुले योजना, आयुष्यमान भारत योजना, धर्मादाय योजनेची सवलत कशी मिळवायची, आपल्या भागातील सरकारी दवाखाने सक्षमपणे चालावेत यासाठी आपण काय करू शकतो, खाजगी हॉस्पिटलला दरपत्रक लावणे कसे बंधनकारक आहे, खाजगी हॉस्पिटल विरोधात कुठे तक्रार करता येते आदींची सविस्तर माहिती या कार्यशाळेत दिली जाते. शेवटी त्या त्या गावातील नागरिकांना एकत्र येऊन आरोग्याच्या प्रश्नांवर समिती स्थापन करावी, त्यांचा कृती कार्यक्रम निश्चित करावा याचे आवाहन केले जाते.

साथी संस्थेचे कार्यकर्ते डॉ. अभय शुक्ला, शकुंतला भालेराव, भाऊसाहेब आहेर, विनोद शेंडे ही कार्यशाळा घेत आहेत. मला देखील या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

इचलकरंजी येथे आरोग्य हक्काची सनद प्रकाशित करण्यात आली

कोविडच्या साथीमध्ये लोकांना विदारक अनुभवांना सामोरे जावे लागले. कोविडनंतर आता लोकांकडून आरोग्याबाबत मागण्या मोठ्या प्रमाणात पुढे येतील. त्याचबरोबर राज्य व केंद्र सरकारडून आता आरोग्याच्या प्रश्नांवर गंभीर पावले उचलली जातील असे अपेक्षित होते. मात्र तसे फारसे काही होताना दिसून येत नाही. यापार्श्वभूमीवर लोकांना त्यांच्या आरोग्य हक्कांबाबत जागे करणे खूप आवश्यक बनले आहे. तेच महत्त्वाचे काम सध्या साथी संस्था, जन आरोग्य अभियान यांच्याकडून केले जात आहे.

कोल्हापुरातील आरोग्य हक्क कार्यशाळा

देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. उपचाराआभावी कोणाला ही आपला जीव गमवावा लागता कामा नये. त्यासाठी चांगल्या दर्जाच्या उपचार सुविधा सरकारी दवाखान्यात उपलब्ध करून देणे सहज शक्य आहे. मात्र त्याऐवजी सरकार विमा योजना लागू करून, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करते आहे, त्याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे.

लोक एकत्र आले आणि ते आपापल्या भागात सर्व प्रकारच्या उपचारांवर चांगल्या सरकारी सुविधा मिळाव्यात, सर्व तपासण्या माफक दरात व्हाव्यात आणि खाजगी हॉस्पिटलवर सरकारी नियंत्रण असावे अशा मागण्या करू लागले. त्याचबरोबर आपल्या भागातही सरकारी आरोग्य यंत्रणेवर देखरेख ठेऊ लागले तर निश्चित मोठे बदल घडून येऊ शकतील.

दीपक जाधव
संपर्क – 9922201192
ई-मेल – deepak.jadhav23@gmail.com

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply