राज्यातील आरोग्य विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आरोग्य मंत्री, वरिष्ठ अधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा टास्क फोर्स तयार करणार

You are currently viewing राज्यातील आरोग्य विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आरोग्य मंत्री, वरिष्ठ अधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा टास्क फोर्स तयार करणार

आरोग्य परिषद भाग 1

मुंबई, दि. 12 मे 2022

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषद शुक्रवारी पार पडली. यावेळी या परिषदेत झालेल्या मागण्या व एकूणच राज्यासमोरील आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्यासाठी येत्या 8 दिवसात एक टास्क फोर्स तयार करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथील सभागृहात खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्णवेळ परिषदेला उपस्थित राहून सर्व चर्चा ऐकली.

त्याचबरोबर यावेळी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एका सत्राला उपस्थिती लावली. त्याचबरोबर विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भास्कर जाधव, महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, संचालक डॉ. साधना तायडे,  डॉ. समीर दलवाई आदी उपस्थित होते.

आरोग्य परिषदेमध्ये राज्यभरातून आलेल्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, डॉक्टर यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेबाबतचे अनुभव मांडले.

साथी संस्थेचे डॉ. अभय शुक्ला यांनी परिषदेमध्ये विचार मांडले.


साथी संस्थेचे डॉ. अभय शुक्ला यांनी ही योजना अधिकाधिक जनतेच्या हिताची बनली पाहिजे, यामध्ये लोकसहभाग वाढला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर रुग्ण हक्क समित्यांचा विस्तार होण्याची गरज ही त्यांनी व्यक्त केली.

याला सकारात्मक प्रतिसाद देत परिषदेमध्ये मांडण्यात आलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलली जातील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. यासाठी एक टास्क फोर्स तयार करून त्याची दर महिन्याला बैठक बैठक घेतली जाईल. राज्याची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी हे टास्क फोर्स कार्यरत राहील असे टोपे यांनी जाहीर केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्याची आवश्यकता आहे. ही बळकटी आणण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल.

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. अलीकडेच पाच ते सहा जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply