मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने निसर्ग सहल

You are currently viewing मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने निसर्ग सहल

पुणे, दि. 15 ऑक्टोबर 2022

पुण्यातील वस्ती पातळीवरील तरुण मुले-मुली निर्व्यसनी रहावीत यासाठी संस्थेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. वस्तीतली मुले-मुली व्यसनी होऊ नयेत यासाठी मुलांना व्यस्त ठेवणे खूप महत्वाचे ठरते. त्यासाठी मुलांसोबत विविध सत्र घेणे, खेळ खेळणे, गमतीदारपणे पुस्तक वाचन करणे, एकत्र मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहणे, वेगळी दृष्टी देणाऱ्या कार्यशाळा घेणे, असे बरेच उपक्रम घेतले जातात. त्याचाच भाग म्हणून, नियमितपणे “गड- किल्यांची सफर” हा उपक्रम प्रत्येक वर्षी घेतला जातो.

लोहगड किल्याला “मनोदय”च्या युवकांनी भेट दिली. ऑक्टोबर असल्यामुळे, उन्ह-पाऊस असा सुंदर संगम मुलांनी अनुभवला. गडावर पोहचल्यावर, मुलांनी शिवाजी महाराजांचे पोवाडे नाट्य स्वरुपात गायिले, देश भक्तीपर गीते गायिले, दफ वाजवला, आरोळ्या दिल्या. काही मुलांनी गडाची ऐतिहासिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या माहिती सादर केली. ह्यातून मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला; त्यांना नवीन अनुभव मिळाला; त्यांना त्यांचा रोजच्या जीवनापेक्षा थोडा वेगळा आनंद घेता आला.


मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार, एखाद्या व्यक्तीला जर विशिष्ठ चौकटीतून, प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर, त्या व्यक्तीच्या आजूबाजूची परिस्थिती, स्थळ बदलणे हा उत्तम पर्याय ठरतो. सहल नेण्यामागे हाच उद्देश होता की युवकांना थोड वेळासाठी तरी वस्तीमधील व्यसनाधीनता, गरिबी, नकारात्मकता, त्यांचे नेहमीचे जीवनमरण्याचे प्रश्न आणि समस्या या सगळ्यापासून थोड लांब नेता येईल. वेगळ्या पद्धतीने मनमोकळा विचार करता येईल.

निसर्गाची किमया समजून ती अनुभवता येईल; आणि हे सगळे करताना त्यांना स्वतःचा शोध घेता येईल. मानसशास्त्रात विचार, भावना आणि कृती याचा प्रवास समजून घेताना मूळ विचारमध्ये आणि विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल केल्यास भावना आणि कृतीमध्ये देखील बदल होतात असे सीबीटी (Cognitive Behavioral Therapy) थेरपीमध्ये सांगितले जाते. त्याच पद्धतीने मुलांच्या विचारात बदल करताना नेचर थेरपी उपयोगाची ठरते. गडावरून संध्याकाळी परत जाताना अनेक मुलांनी आज दिवसभर वाईट विचार डोक्यात आले नाही, दिवसभर मोबाईल पासून लांब राहिलो, भविष्य आणि भूतकाळात नेहमी रमणारे आम्ही आज दिवसभर वर्तमानात रमलो, असे दिवस परत परत यायला पाहिजे असे अनुभव मुलांनी सांगितले. यावरून हे लक्षात येते की वस्ती पातळीवरील युवकांचे असे निसर्ग सहली नियमित आयोजित केल्या पाहिजेत. पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आणि व्यसनापासून लांब राहण्याच्या दृष्टीने या सहलींचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा: कार्यकारी संचालक, डॉ. विष्णू श्रीमंगले, ९७६५५५३५२६

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply