नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित जीवनशाळांवरील आरोपांचा खोटेपणा उघड करणारा वस्तुस्थिती अहवाल प्रकाशित

You are currently viewing नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित जीवनशाळांवरील आरोपांचा खोटेपणा उघड करणारा वस्तुस्थिती अहवाल प्रकाशित

पुणे, दि. 20 ऑक्टोबर 2022

नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित जीवनशाळांवर काही आरोप करण्यात आले. त्याबाबतची पडताळणी करण्यासाठी समाजवादी शिक्षण हक्क सभेच्यावतीने शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांची एक टीम प्रत्यक्ष नर्मदा खोऱ्यात पाठवण्यात आली. त्यांनी या जीवनशाळांना भेटी देऊन वस्तुस्थिती अहवाल तयार केला आहे. शिक्षण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. शरद जावडेकर, प्राचार्य रमेश पाटील, राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत एकबोटे, माजी उपसंचालक वर्षा शेडगे, पत्रकार दीपक जाधव यांनी यामध्ये सहभाग घेतला.

पत्रकार भवन येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. यावेळी नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या विश्वस्त व सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र., सुहास कोल्हेकर जीवनशाळेचे शिक्षक मांगु पावरा, पुन्या वसावे यावेळी उपस्थित होते.

नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित जीवनशाळा व निर्माण शाळा वस्तुस्थिती अहवाल”

नर्मदा नव निर्माण अभियान कडून नर्मदा खोऱ्यातील महाराष्ट्राच्या भागात 6 तर मध्यप्रदेशात 1 अशा एकूण 7 जीवनशाळा चालवल्या जातात. या शाळांवर काही आरोप करणारी एफआयआर १० जून २०२२ रोजी अ.भा.वि.प.चा मध्यप्रदेशातील कार्यकर्ता प्रितम राज बडोले याने बडवानी पोलिस ठाण्यात दाखल केल्याचे राष्ट्रीय व स्थानिक प्रादेशिक वृत्तपत्रांत प्रसिध्द झाले आहे. जीवनशाळांकडे ‘आदिवासींच्या शिक्षण पध्दतीचे’ नाविन्यपूर्ण प्रारूप म्हणून पाहिल्या जाते.. त्यामुळे या आरोपांची सत्यता पडताळणे आम्हाला गरजेचे वाटले.  

मेधा पाटकरांशी बोलतांना आरोपाबद्दल त्या म्हणाल्या की, प्रमुख आरोप जीवनशाळेशी संबंधित आहेत . 

१. जीवनशाळा अस्तित्वात नाहीत 

२.  नर्मदा नव निर्माण न्यासाने कोविडच्या काळात सुरू केलेल्या ‘ निर्माण शाळा ‘ अस्तीत्वातच नव्हत्या . 

३. जीवनशाळा , निर्माण शाळासाठी जमा झालेले रु . १३.५ कोटी याचा गैरवापर केला गेला . राष्ट्र विरोधी कारवायांसाठी व विकासाला खिळ घालण्यासाठी निधीचा वापर केला गेला . 

नर्मदा नव निर्माण अभियानाच्या  विश्वस्तांच्या सांगण्यानुसार मध्य प्रदेश पोलिस व एस . आय . टी . चौकशी करत आहे. आरोप क्र.तीनच्या संदर्भात नर्मदा नव निर्माण अभियानाचे विश्वस्त लेखापरिक्षण अहवाल चौकशी अधिकाऱ्यांना सादर करतील व त्यातून सत्य बाहेर येईल पण; पहिले दोन आरोप आदिवासी शिक्षण कार्याशी संबंधीत आहेत म्हणून आमच्या पाच जणांच्या अभ्यास गटाने त्याबाबतचे वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेथील प्रत्यक्ष परिस्थिती डोळ्यांनी पाहिली. या संवाद यात्रेत  ‘ नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या व  ‘ नर्मदा नव निर्माण अभियान न्यास ‘ च्या विश्वस्त मेधा पाटकर , सुनिती सु.र. ,  व समर्थक सुहास कोल्हेकर, साधना दधिच यांच्या बरोबर वेळोवेळी चर्चा झाली.

शहादा तालुक्यातील येथील जीवननगरच्या जीवन शाळेतील विद्यार्थी

आम्ही १५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर २०२२ या काळात महाराष्ट्रातील  शहादा जवळील काही वसाहती व धडगाव ,तसेंच मध्यप्रदेशातील खाऱ्या भादल व बडवानी अशा विविध ठिकाणी विद्यार्थी , पालक , शिक्षक , ग्रामस्थ , माजी विद्यार्थी , कार्यकर्ते यांच्याशी  मुक्त संवाद साधला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले . 

जीवन शाळेच्या संदर्भात सर्वांच्या बोलण्यात शाळेबद्दल कृतज्ञतेची भावना होती . त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ” जीवनशाळेने गेली ३० वर्षे केवळ आदिवासी मुलांना नुसतं लिहायला , वाचायला शिकवलं नाही तर आम्हाला माणूस असल्याची , आपण भारतीय नागरिक असल्याची व आपल्या हक्काची जाणीव करून दिली आहे . ” इथे मुल शिकली , शिक्षणासाठी बाहेर कॉलेजमध्ये गेली पण त्यांचा आपल्या समाजाशी संबंध तुटला नाही. 

नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित जीवनशाळा हे खरे तर ‘आदिवासींच्या साठीच्या शिक्षण पध्दतीचे’ नाविन्यपूर्ण प्रारूप विकसित झाले आहे. सरकारमान्य औपचारिक अभ्यासक्रम आणि आदिवासी संस्कृती व जीवनपद्धती याचा उत्कृष्ट मेळ या प्रारुपात घातला गेला आहे. गेले ३० वर्षे नर्मदेच्या दुर्गम खोऱ्यात घट्ट पाय रोवून हे काम उभे राहिले आहे. दुर्गम भागातील आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे  काम शासनाने करायला हवे, नव्हे तर शिक्षण हक्क कायद्याने त्यांची ती जबाबदारी आणि कर्तव्य आहे. मात्र प्रत्यक्षात इथे हे काम नर्मदा नव निर्माण अभियानाच्या जीवनशाळा करत आहेत. त्यामुळे पहिल्यांदा त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करणे आवश्यक आहे, असे आम्हांला वाटते.

कोविड काळात लहानग्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून निर्माणशाळा चालवणाऱ्या मित्रांशी शिक्षण हक्क सभेच्या टीमने संवाद साधला

जीवनशाळा अस्तित्वातच नव्हत्या, हा आरोप खोटा व खोडसाळपणाचा असल्याचे आम्हांला भेटलेल्या प्रत्येकाने सांगितले. कोविडच्या काळात शासनाने शाळा बंद करून, ऑनलाईन शिकवावे असे आदेश काढले होते, पण वीज नाही व नेटवर्क नाही अशा आदिवासी पाड्यावर ऑनलाईन शिकवायचे कसे असा प्रश्न समोर उभा राहीला ! आदिवासी भागात कोविडचा संसर्ग नव्हता . त्यामुळे मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून ‘ निर्माण शाळेची ‘ अभिनव योजना आकाराला आली. कोविडच्या साथीमळे महाविद्यालयात , शहरात शिकणारे जीवनशाळेचे माजी विद्यार्थी गावात परत आले होते. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या लहान भावंडांना शिकविण्याची जबाबदारी घेतली व ‘ निर्माणशाळा ‘ सुरु झाल्या. शाळा सुरु व्हाव्यात म्हणून ग्रामपंचायतींनी सभेत ठराव केले आहेत. 

शाळा सुरु करावयाला परवानगी मिळावी म्हणून रितसर अर्ज संबंधित अधिकारी व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आला . त्यानुसार कोव्हीड साथीच्या नियमांचे योग्य ते पालन करुन अशा शाळा सुरु कराव्यात म्हणून जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी लेखी परवानगी दिली आहे . ( दि . २०/१०/२०२० ) . कोविडच्या साथीच्या काळात ४७० मुलांचे शिक्षण सुरुच राहिले. खरे तर शिक्षण खात्याने ‘ नर्मदा नव निर्माण अभियान  न्यास’चे अभिनंदनच करायला पाहिजे . त्यामुळे कोविडच्या काळात ‘ निर्माणशाळा ‘ अस्तित्वात नव्हत्या हा आरोप तथ्यहीन असल्याचे दिसले.

आरोपात काहीही तथ्य आढळले नाही

जीवनशाळांवर केलेले आरोप खोटे खोडसाळपणाचे व बदनामी करण्यासाठी , त्रास देण्यासाठी भितीचा माहोल तयार करण्यासाठी केले असावेत. या आरोपात काहीही तथ्य असल्याचे दिसले नाही. या जीवन शाळांनी नर्मदा खोऱ्यात ‘ शांततापूर्ण व अहिंसक शैक्षणिक क्रांती ‘ घडवून आणली आहे .

 ” It takes a village to raise a child ‘ याचे प्रत्यंतर आम्हाला या जीवनशाळेत दिसले. 

संपूर्ण पाहणी तसेच गावकरी, विद्यार्थी यांच्या मुलाखती, औपचारिक व अनौपचारिक चर्चा यामधून खालील गोष्टी आमच्या लक्षात आल्या.

एक, जीवनशाळेने आदिवासी भागात समाजाला माणूसपणाचे भान दिले आहे . म . गांधी व विनोबा म्हणतात तसा , ‘ बुनियादी तालीम’चा प्रयोग येथे यशस्वीपणे राबवला गेला आहे. नर्मदा  जीवनशाळा या  ‘ रचनात्मक संघर्षाचे ‘ उत्तम उदाहरण आहेत . पुरेशी साधन संपत्ती नसताना , अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक बांधीलकी व करुणा या भावनेतून शिक्षण चळवळ कशी उभी राहते व यशस्वी होते याचे नर्मदा जीवनशाळा हे उदाहरण आहे . त्यामुळे ग्रामस्थ , विद्यार्थी , शिक्षक , पालक , माजी विद्यार्थी हे कृतज्ञतापूर्वक जीवन शाळेबदल बोलतात हे जाणवते . शाळेतून शिक्षणातून , शहरी भागासारखा , आत्मकेंद्रित व पैसा केंद्रित विद्यार्थी, इथे दिसत नाहीत तर पुढे शिकून मुले नोकरीला लागली , त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली पण समाजापासून मुले अलग झाली नाहीत. हेच जीवन शाळेचे यश आहे. त्यामुळे जीवनशाळेवर केले गेलेले आरोप खोटे व खोडसाळपणाचे आहेत. 

दोन, कोविडच्या काळात औपचारिक शाळा बंद असूनही , तेथे केलेला निर्माण शाळेचा प्रयोग ‘ नाविन्यपूर्ण होता . शाळा चालू करायला आवश्यक मान्यता नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली होती . उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेल्या व कोविड लाँकडाऊनमुळे गावात परतलेल्या कॉलेजच्या मुलांमुलींनी आपल्या लहान भावंडाची शिक्षणाची जबाबदारी घेणं, हे  कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये तर याच प्रकारच्या लोकसहभागाची चर्चा केली गेली आहे . कोव्हीडकाळात शाळा सुरू नव्हत्या हा आरोप खोटा असल्याचे मुलांशी बोलताना लक्षात आले. 

तीन, मान्यताप्राप्त शाळेच्या संदर्भात काही तक्रार करायची असेल तर जिल्हा शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक हे योग्य शासकीय अधिकारी आहेत . चौकशीचे योग्य अधिकार त्यांच्याकडे आहेत या शासकीय अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून व बाजूला सारून पोलिसांकडे एफ.आय.आर. करणे, यात तक्रारदाराचा हेतू हा जीवनशाळा व नर्मदा आंदोलनाची बदनामी करणे, भिती निर्माण करणे हा असावा असे आम्हाला वाटते. कायदेशीर चौकशीच्या प्रक्रियेत सत्य समोर येईल. परंतु चौकशी प्रक्रियेसाठी होणारा विलंब व चौकशी प्रक्रियेचा त्रास व त्यामुळे जनतेत जीवनशाळा व नर्मदा आंदोलन याबद्दल संभ्रम निर्माण करणे हेच या आरोपामागील प्रमुख उद्दिष्ट आहे असे आम्हाला वाटते. 

थोडक्यात ‘Process is the punishment’ असा हा प्रकार आहे

जीवनशाळेच्या रुपाने आपल्याला आदिवासी शिक्षणाचे विकसित प्रारूप उपलब्ध झाले आहे. या प्रारुपाची अंमलबजावणी इतर आदिवासी भागात करणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते . खरे तर नर्मदा नव निर्माण अभियानाने व जीवन शाळांनी शिक्षणशास्त्रात  भरीव व मोलाची भर घातली आहे . त्यासाठी सर्व समाजाने नर्मदा नवनिर्माण अभियानाला धन्यवाद दिले पाहिजेत . 

  1. डॉ . शरद जावडेकर 
    संपर्क – 9823759568
  2. प्राचार्य रमेश पाटील – 8652016789
  3. श्री . वसंत एकबोटे 
  4. श्री . दीपक जाधव ( पत्रकार ) –
  5. 9922201192
  6. श्रीमती वर्षा शेंडगे 

अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply