माहिती घेऊन विसरून जाऊ नका, त्या माहितीलाच आपली ताकद बनवा

You are currently viewing माहिती घेऊन विसरून जाऊ नका, त्या माहितीलाच आपली ताकद बनवा

सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांची डायरी: भाग 4

दीपक जाधव

आठवड्यातून किमान एकदा तरी सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांवर डायरी लिहली जाईल याचा प्रयत्न करतो आहे. या डायरी लिखाणामुळे आरोग्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच हे प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेल्या कामाचे डॉक्युमेंटेशन ही होत आहे, यामुळे यामध्ये सातत्य राहणे मला आवश्यक वाटते आहे.

मागचे 10-15 दिवस बरेच धावपळीचे राहिले. क्रांती सप्ताहानिमित्त आरोग्य, शिक्षण-रोजगाराच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी सेंट्रल बिल्डिंग येथे निदर्शने केली. अशा निदर्शनांनी काय निष्पन्न होणार असे काहीजणांना वाटते. मात्र एकत्र येऊन आपापल्या पातळीवर अशी कृती करणे अत्यंत महत्त्वपूर्ण असते, त्यातून बरच काही घडत राहते. या निदर्शनांच्या निमित्ताने आरोग्य, शिक्षण-रोजगारावर काम अनेक कार्यकर्ते एकत्र आले. याविषयांवर विविध संस्था-संघटनांकडून सुरू असलेल्या कामांची देवाण-घेवाण झाली, हे ही नसे थोडके.

साथी संस्थेच्यावतीने शहरी आरोग्याच्या प्रश्नांवर दोन दिवसांची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय कार्यशाळा 24-25 ऑगस्ट रोजी पार पडली. या कार्यशाळेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊन कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. कुठल्या ही विषयावर किंवा प्रश्नावर काम करायचे असेल तर त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असते. हा अभ्यास होण्यासाठी या कार्यशाळा खूपच महत्त्वाच्या ठरतात.

महाराष्ट्रातील सर्व लहान-मोठी सरकारी रुग्णालये सुसज्ज, अत्याधुनिक झाली पाहिजेत. तिथे किमान दरात लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा भेटल्या पाहिजेत हे स्वप्न उराशी बाळगून आम्ही काम करतो आहोत. त्यानुसार वैयक्तिक पातळीवर शक्य तिथे सरकारी वैद्यकीय सुविधा वापरण्याचे ठरवले आहे.

चार दिवसांपूर्वी सर्दी, थोडासा ताप व अंगदुखी असा त्रास सुरू झाल्यानंतर ठरवून महापालिकेच्या औंध कुटी रुग्णालयात गेलो. दहा रुपये भरून केस पेपर काढले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून केस पेपरवर औषधे लिहून दिली. ती सर्व औषधे तिथेच मोफत मिळाली. या औषधांचे तीन दिवसांचे डोस घेतल्यानंतर आता बरे देखील वाटते आहे.

महापालिकेचे डॉक्टर येथे ओपीडीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असे पूर्ण 8 तास उपस्थित असतात. त्यामुळे फारशी गर्दी नव्हती, रांगेत न थांबावे लागता लगेच डॉक्टर भेटले. त्याचबरोबर त्यांनी तपासल्यानंतर लिहून दिलेली औषधे देखील लगेच भेटली.

माझ्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या महापालिकेच्या औंध कुटी दवाखान्यात इतकी चांगली सुविधा उपलब्ध असल्याची माहिती मला नव्हती. त्यामुळे यापूर्वी मी किरकोळ आजारपणासाठी शिवाजीनगरच्या एका फिजिशन डॉक्टरांकडे जायचो. तिथे दीड-दोन तास रांगेत थांबल्यावर माझा नंबर यायचा. तपासणीचे 300 तसेच औषधांचे 300-400 असे 700 रुपये खर्च यायचा.

माझ्याप्रमाणे अनेक पुणेकर अशाच प्रकारे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये चांगली सुविधा असताना त्याचा वापर करत नाहीत. पुणे शहरात महापालिकेचे 57 दवाखाने, 19 प्रसूती रुग्णालये व 2 मोठी हॉस्पिटल आहेत. (या दवाखान्यांची सविस्तर यादी सोबत जोडली आहे). या दवाखान्यांमध्ये लोकांचे जाणे कमी होत चालल्याने ती दुर्लक्षित होत चालली आहेत. या दवाखान्यांमध्ये जाणे लोकांनी फक्त सुरू केले तरी पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत अनेक बदल घडू लागतील.

अर्थात काही वेळेस याठिकाणी आपल्याला असुविधेचा ही सामना करावा लागू शकेल. मात्र इथल्या या असुविधा दूर करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. त्यासाठी आपण नगरसेवकांना निवडून देऊन आपले प्रतिनिधी म्हणून महापालिकेत पाठवतो आहोत. त्यांच्याकडे हे दवाखाने सुसज्ज झाली पाहिजेत यासाठी पाठपुरावा करणे हे आपलेच काम आहे.

काही सुधारणा आवश्यक
औंध कुटी रुग्णालयातील सुविधा आणखी चांगल्या व्हाव्यात यासाठी काही सूचना ही कराव्या वाटत आहेत. या सूचना बहुदा महापालिकेच्या इतर रुग्णालयांसाठी ही लागू होतील. महापालिका दवाखान्यातील ओपीडीमध्ये डॉक्टर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित असतात, इथे केस पेपर शुल्क 10 रुपये आहे तसेच पॅथोलॉजी तपासणी, एक्सरे यांचे शुल्क आदी माहितीचे बोर्ड दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इथल्या ओपीडीची माहिती लोकांना व्हावी यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.

मला महापालिकेच्या दवाखान्यात चांगली उपचार सुविधा मिळाली, याचा छोटासा अनुभव मी शेअर करतो आहे. तिथल्या डॉक्टरांनी सुविधा देणे हा त्यांच्या कर्तव्याचा एक भाग आहे. भले हा अनुभव अगदी कॉमन ही असेल. मात्र हे अनुभव, माहिती घेऊन शांत बसून चालणार नाही. याविषयी लिहून, गप्पांमध्ये लोकांना सांगून, सोशल मीडियामध्ये शेअर करून, अधिकाधिक सरकारी रुग्णालयांचा वापर करून या माहितीलाच ताकद बनवावे लागणार आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था भक्कम करण्यासाठी या छोट्या-छोट्या कृती करणे तितकेच आवश्यक आहे.

माहितीचा प्रचंड मारा आपल्यावर सातत्याने होत आहे हे खरे आहे. म्हणून सरसकट मिळविलेली सर्वच माहिती फेकून देऊन चालणार नाही. त्या माहितीच्या ढिगाऱ्यातून आपल्या जगण्यावर प्रभाव पाडू शकणारी माहिती वेगळी काढणे. त्याआधारे कृती करणे हे ही तितकेच आवश्यक आहे.

दीपक जाधव
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – 9922201192
ई-मेल- deepak.jadhav23@gmail.com

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply