व्हॅटिकनचे पोप आणि पोर्तुगालच्या मंत्री मार्था तर्मिडो यांचा वैश्विक आदर्श मानवतेला अनुकरणीय

You are currently viewing व्हॅटिकनचे पोप आणि पोर्तुगालच्या मंत्री मार्था तर्मिडो यांचा वैश्विक आदर्श मानवतेला अनुकरणीय

आर. एस. खनके

आज संपूर्ण जगातील वेगवेगळ्या खंडात वांशिक विद्वेष आणि धार्मिक, सांप्रदायिक उन्मादात अनेक देश आणि समुदाय गती घेत असताना तसेच राजकीय पटलावर देखील अनेक देशात आक्रमक आणि सत्ता पिपासू वृत्ती वाढीला लागली असताना मनाला उभारी देणाऱ्या दोन घटना घडल्या. संपूर्ण जगभरात त्या मानवी स्वारस्याच्या दृष्टीने शुभ वार्ता (good news) ठरल्यात. त्या दोन्ही वार्ता ख्रिस्ती जगतात मोठा प्राचीन इतिहास असलेल्या इटलीतील रोम आणि पोर्तुगाल देशातून आल्या. जणू मानवतेचा संदेश देणाऱ्या.

१) व्हॅटिकन सिटी भारतापासून ७००० किमी दूर आहे. तिथे बसलेल्या सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरूंनी अर्थातच पोप यांनी डॉक्टर अँथनी पूला या भारतीय दलित गृहस्थांना कार्डिनल बनवले आहे. पोपनंतर ख्रिस्ती धर्माचे हे सर्वोच्च पद आहे. जगभरात फक्त 132 कार्डिनल आहेत. तेच पुढचे पोप निवडतात. आपल्या देशात बहुसंख्यांक असलेल्या आणि जातींची उतरंड जोपासणाऱ्या आपल्या जाती आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील धर्मात आपण धर्माने हिंदूच असलेल्या एखादया एससी एसटी यां संवर्गातील पहिला दलित-वंचित शंकराचार्य, महामंडलेश्वर किंवा मठाधिश निवडण्याचे धैर्य कधी दाखवणार आहोत का ?? तूर्तास अशी शक्यता दिसत नाही. कारण तामिळनाडू मध्ये विविध जातीतून मंदिरातले पुजारी स्टॅलिन सरकारने नेमले त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर न्यायालयाने स्टॅलिन यांच्या धोरणाला तातडीने नुकतीच स्थगिती दिली आहे. स्टॅलिनच्या समतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या धोरणाला पुढे घेउन जाण्यात हा एक वैधानिक अडथळा असल्याने भारतात तूर्तास पोप यांचा कित्ता गिरवला जाणार नाही या पार्श्भूमीवर वरील मत साधार आहे.

२) दूसरी बाब पोर्तुगाल मध्ये घडलेली. पोर्तुगाल म्हणजे आपल्या गोव्यावर ज्यांनी राज्य केले होते तो देश. त्या देशात घडलेली मानवतेला आणि राजकारणाला नैतिक जबाबदारीच्या उंचीवर घेउन जाणारी घटना.

त्याचे झाले असे की पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री मार्था तर्मिडो यांनी पदाचा राजीनामा दिला कारण काय तर एक 31 वर्षांची गरोदर भारतीय पर्यटक पोर्तुगालच्या एका सरकारी हॉस्पिटलमधून NICU मध्ये जागा नाही म्हणून दुसऱ्या सरकारी हॉस्पिटलला शिफ्ट करत असताना रस्त्यात Cardiac arrest मुळे दगावली. त्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड, डॉक्टर आणि सोयी कमी आहेत म्हणून लोकांनी आणि मीडियाने गहजब केला. सबब आरोग्यमंत्र्यांनी लगेच जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला.

आजच्या वर्तमानात युरोपात धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात दिसून आलेली ही संवेदनशीलता मानवतेला उंचीवर घेउन जाणारी आहे. त्यांच्या सामाजिक न्यायाच्या आणि सुशासन (Good Governance) भूमिकेला सादर प्रणाम. या वैश्विक मानवी मूल्यांना अधिक बळ मिळो हीच सदिच्छा.

आर. एस. खनके
(आंतरराष्ट्रीय घटनांचे अभ्यासक)
संपर्क – 9527757577

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply