डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या लिखाणातून मानवतेची मूल्ये रेखांकित : डॉ. दामोदर खडसे

You are currently viewing डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या लिखाणातून मानवतेची मूल्ये रेखांकित : डॉ. दामोदर खडसे

सनातन’च्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन


पुणे, 27 मार्च, 2023 : सामाजिक प्रवाहाच्या विरुद्ध लेखन करताना डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी प्रचलित व्यवस्थेविरुद्ध करडा संघर्ष करून लिहिलेल्या साहित्यकृतीत मानवतेची मूल्ये रेखांकित केली आहेत. मानवतेला केंद्रस्थानी ठेवत असामाजिक तत्वांवर कोरडे ओढताना ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या जातीविरहित समानता, बंधुता आणि एकतेच्या समाजाची स्थापना करण्याऱ्यांना ती प्रेरणा देते, हे त्यांच्या लेखनीचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन हिंदी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. दामोदर खडसे यांनी तळेगाव दाभाडे येथे केले.

सरस्वती सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे लिखित ‘सनातन’ कादंबरीच्या चतुर्थ आवृत्तीचे प्रकाशन शनिवारी(25 मार्च) येथील इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात उत्साहात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, हिंदी साहित्यिक व समीक्षक दामोदर खडसे, पद्मश्री डॉ. लक्ष्मण गायकवाड, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे आणि दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन’ आणि इंद्रायणी महाविद्यालय मराठी विभागातर्फे आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन डॉ. विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले. चर्चासत्र आयोजना मागील भूमिका मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे यांनी विशद केली. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी स्वागत केले.

‘मराठी कादंबरी आणि डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या कादंबऱ्या’ या विषयावरील तीन सत्रात साहित्यिक, अभ्यासक आणि संशोधन करणारे विद्यार्थी यांनी त्यांचे विचार व्यक्त केले.

दरम्यान, इंद्रायणी महाविद्यालयातर्फे डॉ. लिंबाळे यांचा जाहीर सत्कार यावेळी करण्यात आला. त्यावेळी उपस्थित ज्येष्ठ साहित्यिकांनी डॉ. लिंबाळे यांच्या लेखनप्रवासातील संघर्ष, तळमळ आणि वैशिष्ट्ये यावर मनोगते व्यक्त केली.

धर्म महत्वाचा की मानवता? : डॉ. विद्यासागर

डॉ. विद्यासागर म्हणाले की, वैश्विक व्यापकता असलेली ‘सनातन’ कादंबरी सनातन हिंदू धर्माकडे एक बोट दाखवत असली तरी चार बोटे आपल्याकडे असल्याचे निर्देशित, करणारी सर्वांना अंतर्मुख करणारी साहित्यकृती आहे. धर्माच्या नावावर एकवटलेले भेदभावरंजित स्तर मोडीत काढून सर्व समाजांनी एकत्र येत सामाजिक न्याय सापेक्ष समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कादंबरी विचार करायला लावते. धर्म महत्वाचा की मानवता?, धर्म महत्वाचा की समता, बंधुता, माणुसकी? असा रोखठोक सवाल डॉ. विद्यासागर यांनी यावेळी केला.

राजीव बर्वे यांनी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या समृद्ध साहित्याची दखल मराठी साहित्यजगताने म्हणावी तशी न घेतल्याबाबत खंत व्यक्त केली.

तळेगाव दाभाडे परिसरातील संत भूमीत राष्ट्रीय चर्चासत्र आणि प्रकाशन सोहळा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून डॉ. लक्ष्मण गायकवाड म्हणाले, की उपेक्षित वर्गाला न्याय देणारे वैश्विक साहित्य निर्माण करणाऱ्या डॉ. लिंबाळे यांनी स्थिर पावलेल्या मराठी भाषेला प्रवाहित केले आहे.

प्रा. दामोदर खडसे यांनी हिंदी भाषेतील अनुवादाचे महत्त्व अधोरेखित करताना लिंबाळे यांच्या सर्व कादंबऱ्या आणि त्याचा प्रभाव याची वैशिष्ट्ये सांगितली.

माजी प्राचार्य डॉ. अश्विनी धोंगडे ‘सनातन’ कादंबरीचा आकृतिबंध, भाषा शैली आणि साहित्यिक सौंदर्यशास्त्र यावर विश्लेषण केले. त्या म्हणाल्या की, “आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षे केलेल्या शोषणाची नुकसान भरपाई आरक्षणाने भरून निघणार नाही, तर घटनेतील समता आणि बंधुभावही त्यासाठी आवश्यक आहे. अत्यंत अस्वस्थ करणारे हे साहित्य वाचून आपल्या वर्तमानातील भेदभावांच्या वृत्तीमध्ये बदल करण्याचे आवाहन डॉ. धोंगडे यांनी केले.”

प्रकट मुलाखतीत अश्रूंना दिली वाट

दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे कबूल करताना डॉ. लिंबाळे यांना अश्रू अनावर झाले. उपस्थितांनी देखील अश्रूंना वाट करून दिली.
राजकारणात न जाण्याचे ठामपणे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रेरणेची ही चळवळ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार असल्याचा निर्धार अरुण खोरे यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी व्यक्त केला.

प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे, डॉ. संदीप कांबळे, प्रा. सत्यजित खांडगे आणि संयोजकांनी डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अखेरच्या इच्छेचा मान राखून एका विद्रोही साहित्यकाराच्या उपस्थितीत त्यांचा कादंबऱ्यावर राष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा. सत्यजित खांडगे यांनी मानले.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply