औंध जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्राला दिशादर्शक ठरू शकेल अशा उपक्रमाची सुरुवात

You are currently viewing औंध जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्राला दिशादर्शक ठरू शकेल अशा उपक्रमाची सुरुवात

दीपक जाधव

कोविडच्या जागतिक साथीमध्ये सरकारी आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे. यापार्श्वभूमीवर सरकारी हॉस्पिटल आपल्या हक्काची आहेत त्यांना जपले पाहिजे ही भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. औंध जिल्हा रुग्णालयात या लोकभावनेला तिथल्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी ही उचलून धरले आहे. त्यातून औंध जिल्हा रुग्णालय नागरिक व कर्मचारी यांची मिळून संवाद समिती रविवारी स्थापन झाली आहे. सरकारी हॉस्पिटलच्या भल्यासाठी नागरिक व कर्मचारी यांनी एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रयोग होत असून तो येणाऱ्या काळात महाराष्ट्राला दिशादर्शक ठरू शकतो.

लोकसहभागाच्या देखरेख व संवाद प्रक्रियेतून सरकारी हॉस्पिटल चांगली होऊ शकतील, त्यादिशेने प्रयत्न झाले पाहिजेत असे सार्वजनिक आरोग्याच्या चळवळीतील तज्ज्ञ सातत्याने मांडत आहेत. डॉ. अभय शुक्ला हे नेहमी म्हणतात की “की आजारी पडलेल्या सरकारी दवाखान्यांवर उपचार व त्यांना बरे करण्याचे काम लोकच करू शकतात”.

त्याचभावनेतून पुणे शहरात सरकारी हॉस्पिटलसाठी असा लोकसहभागाचा प्रयोग करायचे आम्ही ठरवले. त्यासाठी पहिले हॉस्पिटल म्हणून औंध जिल्हा रुग्णालय निवडले. नेमकं काय काम करायचे याचा एक कच्चा आराखडा तयार केला. त्यानंतर गेले दोन महिने औंध जिल्हा रुग्णालयाच्या आसपासच्या वस्त्यांमध्ये फिरून तिथल्या कार्यकर्त्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी भेटत होतो. अनेकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्याची तयारी दर्शवित सकारात्मक प्रतिसाद दिला.

त्याचदरम्यान महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत रिकामे व माहिती अधिकार कार्यकर्ते शरथ शेट्टी यांची भेट झाली. त्यांनी ही संकल्पना केवळ उचलूनच धरली नाही तर यामागे मोठे बळ उभे केले. औंध जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व नागरिक असे आपण सगळे मिळून हा उपक्रम पुढे नेऊयात असा विश्वास त्यांनी दिला.

औंध हॉस्पिटलमध्ये रविवार, दि. 12 मार्च 2023 रोजी दुपारी नागरिक व कर्मचारी यांची संयुक्त बैठक पार पडली. यामध्ये औंध जिल्हा रुग्णालय संवाद समितीची स्थापना करण्यात आली आहे.

रविवारी झालेल्या बैठकीमध्ये औंध जिल्हा रुग्णालयाचे अनेक प्रश्न चर्चेला आले. लोकांनी त्यांचे अनुभव मांडले तर कर्मचाऱ्यांनी त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये काम करावे लागत आहे ते सांगितले. त्यानंतर औंध हॉस्पिटलच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एक कृतिकार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांनी दिले. त्याचबरोबर रुग्णालयाच्या व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्याचे आरोग्य मंत्र, आरोग्य संचालक यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

नागरिक व सरकारी कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून औंध जिल्हा रुग्णालय अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. या प्रयोगातून सरकारी हॉस्पिटलच्या बदलाचे मॉडेल उभे रहावे अशी अपेक्षा आहे. या प्रयोगातून नेमके काय बदल घडतील याचे उत्तर येणारा काळच देईल. मात्र सरकारी हॉस्पिटलसाठी अशा प्रयोगांची सुरुवात होते आहे, हे देखील खूप आश्वासक आहे.

दीपक जाधव
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – 9922201192
ई-मेल – deepak.jadhav23@gmail.com

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply