एकलव्यने पुण्यात यावे यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश

You are currently viewing एकलव्यने पुण्यात यावे यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश

कोविडची साथ सुरू होण्यापूर्वीच्या एक-दोन महिने अगोदरची ही गोष्ट असेल. रोजगाराच्या प्रश्नांवर आम्ही जागल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून दीर्घ लेखमालिका करत होतो. त्यासाठी वेगवेगळे विषय निवडले होते, अधिकची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना भेटत होतो.

पुण्यात दरवर्षी लाखोंच्या संख्येने केवळ झापडबंद पद्धतीने स्पर्धा परीक्षा करण्यासाठी विद्यार्थी येतात. त्यांना शिक्षण, करिअरचे काही वेगळे मार्ग, वाटा शोधून दिल्या पाहिजेत. तिथे त्यांना पोहचता यावे यासाठी मार्गदर्शन उपलब्ध झाले पाहिजे अशा स्वरूपाच्या आमच्या चर्चा सतत सुरू होत्या. त्यावेळी शुभम गुरव Shubham Gurav या विद्यार्थी मित्राकडून मला एकलव्य संस्थेविषयी माहिती मिळाली.

त्याने सांगितले, “दीपक दादा, स्पर्धा परीक्षेला सक्षम पर्याय देण्याचे काम यवतमाळमध्ये एकलव्य नावाची संस्था करते आहे. त्यांनी आतापर्यंत विदर्भ व मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांना देशभरातील नामांकित विद्यापीठात प्रवेश व फेलोशिप मिळवून दिल्या आहेत.”

शुभमने सांगितलेल्या माहितीमुळे मी चांगलाच उत्साहित झालो. मी त्याला एकलव्य विषयी आणखी माहिती विचारण्यास सुरुवात केली.

यामुळे वंचित घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळतो पण मग तिथला राहण्याचा, शिक्षणाचा खर्च ते विद्यार्थी कसा करतात, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध होतात असे अनेक प्रश्न मला पडले होते.

त्याची उत्तरे मी शोधू लागलो. शुभमकडून एकलव्यमध्ये काम करणाऱ्या मित्रांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतले. यू-ट्यूब जाऊन एकलव्य संस्थेचे व्हिडीओ पाहिले, त्यांचे फेसबुक पेज धुंडाळले.

अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी(APU), टाटा इन्स्टिट्यूट (TISS), केंद्रीय विद्यापीठे (Central Universities), आयआयटी IITs) इथल्या प्रवेश परीक्षा आणि महत्त्वाच्या फेलोशिप (Gandhi Fellowship, Goonj Fellowship इत्यादी) मिळवण्यासाठीची तयारी एकलव्य संस्थेकडून करून घेण्यात येते.

आयआयटीमध्ये सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम आहेत हे अजूनही पुण्यातल्या अनेक प्राध्यापकांना ही माहीत नाही.

एकलव्य तर थेट विदर्भ, मराठावाड्यातल्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश मिळवून देत होती.

त्यासाठी एकलव्य विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेत नाही. तीन-तीन महिन्यांच्या निवासी तसेच अ-निवासी कार्यशाळा त्यांच्याकडून घेतल्या जातात. ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग घेतले जातात.

मेंटरची बहुमोल मदत

दर 5-10 विद्यार्थ्यांमागे एक मेंटर दिला जातो. तो मेंटर संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरण्यापासून ते प्रवेश मिळाल्यानंतर अगदी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्कात राहून मदत करतो.

नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर स्कॉलरशिप, फेलोशिपच्या माध्यमातून शिक्षणाचा खर्च कसा उभारता येईल याबाबत ही येथे माहिती दिली जाते. एकदा याठिकाणी प्रवेश मिळाल्यानंतर पैशांअभावी शिक्षण थांबण्याची शक्यतो वेळ येत नाही.

इथे शेवटच्या वर्षाला शिकत असताना कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे अनेक विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात. एकलव्यच्या माध्यमातून या मोठ्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेले तसेच नोकऱ्यांना लागलेले बरेचजण आता इथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे मेंटर म्हणून काम करू लागले आहेत. त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

एकलव्यची यवतमाळमधून सुरुवात

यवतमाळ येथे राजू केंद्रे Raju Kendre , प्रशांत चव्हाण Prashant Chavhan व त्यांच्या मित्रांनी 5 वर्षांपूर्वी एकत्र येऊन एकलव्यची सुरुवात केली होती. स्पर्धा परिक्षे व्यतिरिक्त उच्च शिक्षणात असंख्य संधी उपलब्ध आहेत. मात्र मार्गदर्शनाअभावी पहिल्या पिढीत शिक्षण घेणारे विद्यार्थी तिथे पोहचू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्यासाठी एकलव्य सुरू झाली.

एकलव्यने पुण्यात काम सुरू करावे यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. इथे राज्यातील खेड्यापाड्यातून विद्यार्थी पदवी शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात. त्यामुळे पुण्यात एकलव्य सुरू झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल. त्यांना शिक्षणाच्या इतर वाटा समजतील, असे वाटत होते.

दरम्याच्या काळात एकलव्यची सुरुवात करणाऱ्या संस्थापकापैकी एक असलेल्या राजू केंद्रे यास युके सरकारची चेवेनिंग स्कॉलरशिप मिळाली. जगभरातील 160 देशांच्या 63 हजार विद्यार्थ्यांमधून राजूची या स्कॉलरशिपसाठी निवड झाली.
त्यांनतर राजूच्या या यशावर आम्ही जागल्यामध्ये एक सविस्तर लेख लिहला.

त्यानंतर काही दिवसांनी राजू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आला असताना आमची भेट ही झाली. त्याचवेळी पुण्यामध्ये ही एकलव्यचे काम सुरू झाले पाहिजे याबाबत प्राथमिक बोलणे झाले.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply