महापालिका निवडणुकांमध्ये सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न प्राधान्याचा बनावा यासाठीची धडपड

You are currently viewing महापालिका निवडणुकांमध्ये सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न प्राधान्याचा बनावा यासाठीची धडपड

आरोग्य प्रश्नांची डायरी : भाग 1

दीपक जाधव

महापालिका निवडणुकांसाठी आज ओबीसी आरक्षण जाहीर झाले. राज्यातील विविध शहरांच्या महापालिका ताब्यात घेण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष, नेते, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आदी सगळ्यांचीच धांदल उडणार आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांवर लिखाण करणाऱ्या माझ्या सारख्या पत्रकाराला ही निवडणूक खूप महत्त्वाची वाटते आहे. कारण कोविडच्या महाभयानक साथीनंतर पहिल्यांदा आपण महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये सार्वजनिक आरोग्य हा विषय ऐरणीवर यावा यासाठी आम्ही पत्रकार, जन आरोग्य अभियान, विविध संस्था, संघटना चळवळीतील कार्यकर्ते आमच्या परीने प्रयत्न करणार आहोत.

सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न पत्रकार म्हणून लिखाणातून मांडताना तसेच एक कार्यकर्ता म्हणून त्याबाबत भांडताना अनेक अनुभव, गोष्टी, घटना, किस्से निसटून जात आहेत. ते सगळंच बातमीमध्ये बांधण्यात तोच तोचपणा येतोय. त्यामुळे डायरी लिखाणातून एका वेगळ्या प्रकारे ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न महापालिका निवडणुका संपेपर्यंत करणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व सरकारी हॉस्पिटल अधिक सक्षम, सुसज्ज आणि अत्याधुनिक झाली पाहिजेत, हे आमचं स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी राज्य. शासनाबरोबरच सर्वच महापालिका मोठी भूमिका बजावू शकणार आहे. नागरिकांनी आता त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

महाराष्ट्रातल्या शहरी जनतेला कोव्हिड महामारीचा सर्वात जास्त फटका बसला आहे. त्या काळात आरोग्यसेवेची तीव्र गरज असताना खाजगी आरोग्य व्यवस्थेने बेदकारपणा दाखवला. राज्यातील बहुतांश खाजगी रुग्णांलयांनी कोविड साथ ही संधी मानून रुग्णांकडून लाखोंची बिले लाटली. याकाळात खरी मदतीला आली ती सरकारी रुग्णालये. महापालिका दवाखान्यांनी कोविड ओपीडी, विलगीकरण, लसीकरण आदी जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडून त्यांचे टिकून राहणे किती गरजेचे आहे ते लक्षात आणून दिले आहे.

जन आरोग्य अभियानाने आरोग्य दिनाच्या दिवशी (7 एप्रिल 2022) शहरी आरोग्य सेवेच्या स्थितीचा सविस्तर लेखाजोखा प्रसिद्ध केला आहे. तो राज्य सरकार, महापालिका यांना झोपेतून जागे करण्यास पुरेसा आहे.

महाराष्ट्रात कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांपैकी जवळजवळ अर्धे मृत्यू, हे महानगरपालिका असलेल्या शहरात झाले. देशातील सगळ्यात जास्त कोविड मृत्यू झालेल्या पहिल्या ५ शहरांपैकी ४ महाराष्ट्रातील आहेत!

२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्र राज्यातील 45% म्हणजे 5 कोटीपेक्षा जास्त लोक शहरी भागात रहात होते, आता ती संख्या आणखी वाढली आहे. दाटीवाटीमुळे लोकसंख्येची घनताही जास्त आहे. निम्यापेक्षा जास्त लोकांच्या वस्त्यांमध्ये पिण्यायोग्य पाणीपुरवठा, सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था, हवेचे प्रदूषण इत्यादींबद्दल तीव्र प्रश्न आहेत. या सगळ्याच्या परिणामी रोगराईचे प्रमाणही जास्त दिसते. कोविड महासाथीचा सगळ्यात जास्त फटका शहरी भागांमध्ये बसला.

शहरी भागाच्या लोकसंख्येनुसार सरकारच्या स्वतःच्या निकषानुसार एकूण १,१६५ प्राथमिक आरोग्य केंद्रे असायला हवीत. पण सध्या फक्त ५३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, म्हणजेच ५४ टक्के किंवा ६२७ तातडीने उभारायला हवीत. सरकारच्या स्वतःच्या मापदंडानुसार दर १००० लोकांमागे २-३ हॉस्पिटल खाटांची गरज असते. पण महाराष्ट्रात शहरी भागातील सरकारी रूग्णालयांमध्ये एकूण फक्त ३९,०४८ हॉस्पिटल-खाटा आहेत; म्हणजेच दर १००० लोकसंख्येमागे फक्त ०.७८ खाटा आहेत. खाजगी रुग्णालयांची संख्या मात्र प्रचंड वाढली आहे.

तज्ज्ञांच्या मते शहरी सार्वजनिक आरोग्यावर दरवर्षी दरडोई ३ हजार रुपये खर्च  करायला हवे. प्रत्येक महानगरपालिकेने स्वतःच्या एकूण बजेटचा किमान २० टक्के सार्वजनिक आरोग्यावर खर्च करायला हवे आणि उरलेला आवश्यक खर्च राज्य सरकारने करायला हवा.

असे अनेक प्रश्न आहेत, त्याबाबतचे वेगवेगळे मुद्दे आहेत. मी स्वतः तसेच जागल्या टीम त्यांचा दररोज धांडोळा घेणार आहे. जन आरोग्य अभियान देखील ते घेऊन राज्यभर मोहीम राबविणार आहे. जन आरोग्य अभियांचे कार्यकर्ते लोकांमध्ये जाणार आहेत. मोहल्ला सभा, बैठका घेणार आहेत. राजकीय नेत्यांना भेटणार आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यात आरोग्याला प्राधान्य मिळावे यासाठी झटणार आहेत. इच्छुक उमेदवारांचे आरोग्य प्रश्नांवर प्रशिक्षण ही घेण्याचा विचार आहे.आणखी बरंच काही करण्याचा मानस आहे.

या घटना घडामोडींचे वृत्तांकन जागल्या वेब पोर्टलकडून बातम्यांच्या माध्यमातून तर होईलच. पण सगळंच बातमीमध्ये नीटस मांडता येत नाही. त्यातून खूप काही निसटतं. या निस्टणाऱ्या गोष्टी, किस्से, अनुभव त्या त्या वेळी या डायरी लेखनातून मुक्तपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. महापालिका निवडणुका होऊन त्यांचे निकाल लागेपर्यंत हे डायरी लेखन करण्याचा विचार आहे.

आपले देखील याबाबतचे अनुभव, सूचना तुम्ही ई-मेल, व्हाट्सआपद्वारे आमच्यापर्यंत पोहचवू शकता.

नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांची सोबत या उपक्रमात मिळेलच यात शंका नाही. तर भेटत राहू ‘आरोग्य प्रश्नांची डायरी’ या सदरातून.

दीपक जाधव
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – 9922201192
ई-मेल – deepak.jadhav23@gmail.com

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply