हॅकिंगचे हल्ले परतवून जागल्या वेब पोर्टल पूर्ववत सुरू

You are currently viewing हॅकिंगचे हल्ले परतवून जागल्या वेब पोर्टल पूर्ववत सुरू

दि. 15 मार्च 2022, मंगळवार

जागल्या वेब पोर्टलला मागील 15 दिवस हॅकिंगच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागले. जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा वेब साईट हॅक करण्याचे प्रयत्न केले जात होते. अखेर या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेऊन जागल्या वेब पोर्टल पूर्ववत करण्यात यश आले आहे. सार्वजनिक आरोग्य, उच्च शिक्षण, रोजगार आदींसह विविध क्षेत्रातील प्रश्न, समस्या, अडचणी आणि त्यावरचे पर्याय आम्ही आणखी नव्या जोमाने मांडत राहू.

मागील दोन आठवडे बातम्या व लेख वाचकांपर्यंत पोहचू शकलो नाही, याबद्दल आम्ही सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो.

आपले वेब पोर्टल हे नेमके कुणाकडून आणि कोणत्या कारणांसाठी हॅक केले गेले होते याचा शोध सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक गैरव्यवहार जागल्या वेब पोर्टलने उजेडात आणले आहेत. त्या गैरव्यवहारात सहभागी असलेल्यांपैकी व्यक्तींकडून हा हॅकिंगचा प्रकार केला गेला असल्याचा संशय आहे. त्यामुळे याचा छडा लावण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.

जागल्या वेब पोर्टलवरचे बातम्या, लेख क्लिक केल्यावर उघडत नसल्याने चौकशी करण्यासाठी सातत्याने फोन येत होते. त्याचबरोबर पोर्टल हॅक झाल्याचे समजल्यावर दुरुस्तीच्या मदतीसाठी ही अनेकजण पुढे आले. वेब पोर्टलवरील काही मजकुराचे नुकसान झाले आहे, त्यातील काही बातम्या आणि लेख पुन्हा अपलोड करण्यात आले आहेत. उर्वरित मजकूर ही अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

नव-माध्यमांना त्रास देण्याचा प्रयत्न

भारतात इंग्रजी, हिंदी तसेच प्रादेशिक भाषांमधून अनेक वेब पोर्टल, यु-ट्यूब चॅनल एक चांगली पत्रकारिता करत आहेत. अल्पावधीतच या पर्यायी नव माध्यमांनी आपला ठसा उमटवला आहे. मात्र त्यांना विविध प्रकारे त्रास देण्याचे प्रयत्न दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळीकडे सुरू आहेत.

मॅक्स महाराष्ट्र, साधना साप्ताहिकाचे कर्तव्य साधना तसेच इतर ही अनेक वेब पोर्टलना यापूर्वी हॅकिंगच्या या प्रकारांना सामोरे जावे लागले आहे. तंत्रज्ञान प्रगत झाल्याने त्याच्या आधारेच आज कमी खर्चात लोकांपर्यंत पोहचणे वेब पोर्टलला शक्य झाले आहे. त्याचवेळी याच तंत्रज्ञानाचा गैरवापर वाईट प्रवृत्तींकडून ही केला जाऊ शकत असल्याने त्याला सामोरे जाण्याची पूर्ण जबाबदारी या नव-माध्यमांना ठेवावी लागेल.

अब्रुनुकसानीचे खटले दाखल करणे

वेब पोर्टल, यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वतंत्र व निर्भिडपणे काम करणाऱ्या पत्रकारांवर अब्रुनुकसानीचे खटले दाखल करून त्यांना जेरीस आणण्याचे प्रकार देशभर सुरू आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर एकट्या द वायर वेब पोर्टलवर 1.3 अब्ज डॉलर रुपयांचे अब्रुनुकसानीचे खटले दाखल आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लिखाणाविरुद्ध सनातनी प्रवृत्तींनी अब्रुनुकसानीचे 12 खटले दाखल केले होते.

जागल्या वेब पोर्टलवर ही अब्रुनुकसानीचे खटले दाखल करून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यापीठात गैरव्यवहार करणाऱ्यांनी आतापर्यंत नातेवाईकांच्या माध्यमातून जागल्याला धुळे, जळगाव, चाळीसगाव, पुणे आदी ठिकाणांहून 4 नोटिसा पाठवल्या असून दोन खटले दाखल केले आहेत.

अर्थात, अशा धमकावण्यांना जागल्या भीक घालत नाही. जागल्यामधून आतापर्यंत जे काही गैरव्यवहार उजेडात आणले आहेत, त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. संबंधित न्यायालयापुढे ते मांडून गैरव्यवहार करणाऱ्यांना निश्चित उघडे पाडले जाईल. त्याचबरोबर या सर्व गैरव्यवहाराचा पाठपुरावा जागल्याकडून करण्यात येत आहे. संबंधितांची चौकशी पूर्ण होऊन शिक्षा होईपर्यंत हा पाठपुरावा सुरू राहील, हे निश्चित.

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सरकारी हॉस्पिटलच्या आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारला पाहिजे यासाठी जागल्याकडून एक अभिनव प्रयोग लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याविषयी लवकरक स्वातंत्रपणे लिहू. उच्च शिक्षण, रोजगार आदी विषयांवर ही पूर्ववत लिहीत राहू. बाकी आता नेहमी भेटत राहूच.

दीपक जाधव
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – 9922201192
ई-मेल – deepak.jadhav23@gmail.com

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply