हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आणि समाजातील अंतर कमी करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू

You are currently viewing हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आणि समाजातील अंतर कमी करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू

जांबुवंत मनोहर

कश्मिर फाईल या चित्रपटाचा विषय खूप गाजत होता किंवा गाजवला जात होता. या विषयावर सोशल मीडिया वर खूप लिहिलं गेलं. समाजामध्ये खूप बोललं गेलं आणि खूप व्हिडीओ प्रसारीत झाले. काही प्रमाणात का होईना दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा किंवा एका विशिष्ट समाजा बद्दल अविश्वास निर्माण करण्याचा जो प्रयत्न विशिष्ट परिवारातील घटक आणि पक्ष करत आहे त्या अविश्वासाच्या आगीत तेल टाकण्याचे काम या चित्रपटामुळे झाले.

या वातावरणाचा राजकीय फायदा घेऊन समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली. शेतकरी जसा पावसाळ्याच्या पूर्वी जमिनीची मशागत करून जमीन लावणी योग्य करतो अगदी तसंच निवडणूकी पुर्वी असे वातावरण तापवून विषवल्ली पेरण्याचे काम केले जाते.

बुरखा, हिजाब, मटण, हलाल, झटका, अजान, भोंगा हे सगळे विषय त्यांच्या फायद्याचे आणि राजकीय जमिनीच्या मशागतीस उपयुक्त असे आहेत. कुठेही हे विषय निघाले तर त्या विषयाची धग वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. हे या चित्रपटाच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखित झाले.

काश्मीर फाईल हे पूर्ण सत्य नाही. पूर्ण सत्य हे कधीच हिंसक असू शकत नाही. महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आपण पाहिला आहे. हिंसक प्रवृत्तीचा राग येतो पण एका विशिष्ट समुदायाचा राग येत नाही. सत्या, कंपनी, वास्तव हे अत्यंत हिंसक चित्रपट होते पण पिक्चर संपल्यावर माणूस हिंसा डोक्यात ठेवून बाहेर पडत नव्हता. आर्टिकल १५ मध्ये अन्यायाविरुद्ध चिड निर्माण होते, जयभीम अन्यायाविरुद्ध लढणाऱ्याला सलाम करतानाच लढण्याची जिद्द निर्माण करतो. हे सगळे थोड्या उदाहरणासह हे स्पष्ट व्हायला सोपं म्हणून सांगितले आहे.

आता कश्मिर फाईलवर येऊ. कश्मिर फाईल हा चित्रपट रिलीज झाला. त्याबरोबरच चित्रपट गृहामध्ये चित्रपट संपल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून प्रकट होऊ लागल्या त्यातून मुख्यत्वेकरून मुस्लीम समाजावर राग प्रकट होताना दिसत होता. मुस्लिम समाजाबद्दल अविश्वासाचे वातावरण तयार व्हावे यासाठी एका विशिष्ट परिवारातील संघटना आणि राजकीय पक्ष जे काम संथगतीने करत होत्या त्या गतीला चालना देण्याचे काम कश्मिर फाईल या चित्रपटामुळे झाले.

एका विशिष्ट राजकीय हेतूने प्रेरित होउन समाजामध्ये विष कालवण्याचा धंदा आधीपासूनच सुरू होता त्याला चालना मिळाली किंबहुना चित्रपट त्याच उद्देशाने काढला आहे असंच वाटतं. कारण त्या काळातील विशिष्ट घटना दाखवून. एकाच समाजावर रोष निर्माण व्हायला हा चित्रपट कारणीभूत ठरतो. खोटं म्हणावं तर खोटं नाही पण खरं म्हणावं तर पूर्णतः सत्य नाही अशी या चित्रपटाची संपूर्ण मांडणी आहे. विद्वेष पसरवून गल्ला भरता भरता द्वेषाचे राजकारण करण्याचा या मंडळींचा प्रयत्न काहीसा यशस्वी झाला हे नाकारता येत नाही.

हे सगळं एकाबाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला हे पूर्ण सत्य नाही हे जाणनारा एक वर्ग होता, आहे त्या वर्गाला सुद्धा या विषयावर बोलायचं होतं चित्रपट पुर्णपणे सत्य नाही हे देखील ओरडून सांगायचं होतं अनेक जणं मार्ग शोधत होते त्यात आम्हीही होतो. अशातच भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे संस्थापक दत्ता पोळ यांचा फोन आला आणि त्यांनी या विषयावर अभ्यासपूर्ण भाष्य करणाऱ्या मान्यवरांच्या संदर्भात विचारणा केली. सुरवातीला आम्ही अशोक कुमार पाण्डेय, जावेद अख्तर आणि डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नावाचा विचार करत होतो. म्हणजे मी सुचवत होतो. पुढे जावेद अख्तर हे नाव गळाले आणि तिस्ता सेटलवाड यांच्या नावाचा विचार सुरू केला. तशी पनिमंत्रणे दत्ता पोळ यांनी तयार केली या प्रत्येक नावाच्या मागे काहीना काही कारण होते.

कार्यक्रमाला झालेली तुडुंब गर्दी

अशोक कुमार पाण्डेय हे कश्मिर विषयाचे अभ्यासक इतिहास संशोधक होते. त्यांची ‘कश्मिरी पंडित और कश्मिर’, ‘कश्मिर नामा’ हि पुस्तके गाजली होती. कश्मिर फाईल हा चित्रपट आल्यानंतर त्यांनी समकालीन इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचे दिसून येतं होते.

जावेद अख्तर हे चित्रपट क्षेत्रातील दिग्गज आहेत. अनेक गाजलेल्या चित्रपटांचे कथा, पटकथा, संवाद त्यांनी लिहिले होते ते चित्रपट क्षेत्रातील मातब्बर आहेत हे मी सांगण्याची गरज नाही पण त्यांनी समाजात शोले भडकवण्याचे काम केले नाही.

तिस्ता सेटलवाड यांचे नाव नंतर पुढे आले पण त्यांचे ही नाव पुढे यायला देखील असेच कारण होते. २००२ साली शासन पुरस्कृत दंगली जगासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या मुळेच अनेकांना न्याय मिळाला किंवा न्याय मिळेल अशी आशा जिवंत राहिली.

डॉ. कुमार सप्तर्षी हे कश्मिरचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा दिल्लीतील सत्तेत असणाऱ्या आणि कश्मिर परिस्थितीवर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखत होते. त्याचबरोबर त्यांचे सध्या कश्मिरमध्ये वास्तव्यास असलेल्या कश्मिरी पंडित लोकांशी सुद्धा चांगले संबंध असल्यामुळे त्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष करण्याचा सल्ला मी दिलेला होता.

युवक क्रांती दलाचा पदाधिकारी म्हणून समविचारी संघटना आणि साथींना मदत करणे या पाहुण्यांशी ओळख काढून संपर्क करणे एवढेच माझे काम होते. युवक क्रांती दल या कार्यक्रमात विशेष सहकार्य म्हणजे खरंतर सल्लागाराची भूमिका बजावत होते. बाकी सर्व भीम आर्मी बहुजन एकता मंच करणार होते. पण पुढे घडलेल्या घडामोडी मुळे भूमिका पाहुणे आणि परिस्थिती बदलत गेली. अनेक अडचणी आल्या किंवा निर्माण केल्या गेल्या.

पोलिसांची नोटीस

कार्यक्रम घ्यायचा आणि तो यशस्वी करायचा यासाठी दुसरी योजना तयार होती फक्त ती कार्यान्वित कधी करायची हे पहिली योजना रद्द झाल्यानंतर ठरणारं होते. समोरच्या मंडळींना कदाचित हे माहीत असावे म्हणून ते देखील शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला ताणून मग तोंडावर पाडणार होते त्यापद्धतीने त्यांचे वागणे सुरू होते. दत्ता पोळ आणि मी चर्चा करून अंतिम मुदत ठरवून घेतली ठरलेल्या वेळी दुसरी योजना कार्यान्वित केली. दुसरी योजना यशस्वी होण्यासाठी युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या एका होकारात अनेक नकार चारीमुंड्या चीत झाले.

कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे तिस्ता सेटलवाड येऊ शकल्या नाहीत. तसा निरोप त्यांनी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन यांना दिला.जावेद अख्तर यांच्या पर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करणं सोडून दिले. शेवटी प्रमुख वक्ते अशोक कुमार पाण्डेय आणि डॉ. कुमार सप्तर्षी एवढेच दोघे कार्यक्रम पत्रिकेवर राहिले.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी अशोक कुमार पाण्डेय यांनी कार्यक्रमाची जी पत्रिका त्यांच्या ट्विटरवरून पोस्ट केली होती ती पोस्ट रिट्विट करून तिथे गोडीत धमकी देण्याचे काम कश्मिर फाईल चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले. आता कार्यक्रम संवेदनशील झाला. युवक क्रांती दलाची भूमिका स्पष्ट होती एका घडलेल्या घटनेवर एक चित्रपट प्रदर्शित होतो. तो अर्धवट सत्य दाखवून लोकांची माथी भडकवून स्व:ताचा गल्ला भरून घेतो. त्या चित्रपटावर चर्चा करायला मात्र अनेकांचा विरोध असतो. तर ती चर्चा घडलीच पाहिजे सत्य समोर आलंच पाहिजे. माझे सहकारी संदिप बर्वे, अप्पा अनारसे, सचिन पांडुळे यांच्याशी चर्चा करून ही भूमिका घेण्यात आली होती आणि आम्ही त्या विषयावर ठाम होतो. विवेक अग्निहोत्री यांच्या भूमिकेनंतर आम्ही ठाम बरोबरच सतर्क सुद्धा झालो.

कार्यक्रमाच्या दिवशी ब्राह्मण महासभा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गांधी भवन मधील डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या समोर अध्यक्षीय दालनात अशोक कुमार पाण्डेय यांची भेट घेतली. नेमका कशामुळे त्यांचा कार्यक्रमाला विरोध आहे हे समजू शकले नाही पण त्यांचा विरोध फार कडवा आणि भक्कम आहे असेही जाणवले नाही. पुढे कार्यक्रम सुरळीत पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी काही मंडळींनी गोंधळ घालण्याचा तीन लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण तोही प्रयत्न असफल ठरला युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते हात जोडून उभे होते. तीनशे लोकांच्या विवेकापुढे तीन लोकांच्या गोंधळाने हात टेकले.

कश्मिरी पंडिंतावर झालेल्या अन्यायाचा निषेध केला गेला त्यावेळी इतरांवरही झालेल्या अन्यायाचा निषेध केला गेला. त्याचबरोबरीने अर्धसत्य मांडून संभ्रम निर्माण करणाऱ्या, द्वेष पसरविणाऱ्या गल्लेभरू प्रवृत्तीचा देखील निषेध करण्यात आला. कुणाचा विरोध असण्याचे कारणच नाही, सत्याला असत्या शिवाय कुणाचाही विरोध असू शकत नाही. म्हणून सामान्य जनतेला सत्य समजू नये यासाठीचा सारा खटाटोप असफल ठरला. आदित्य आरेकर, अजय नेमाने, विजय बोडेकर, निलम पंडित, रोहन गायकवाड, प्रसाद झावरे, रेश्मा सांबरे, सुदर्शन चखाले, कमलाकर शेटे, शाम तोडकर यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोख पूर्ण केल्या. कार्यकर्त्यांच्या मधला समन्वय, आत्मविश्वास, भूमिकेशी तडजोड न करणं या गुणांमुळे युवक क्रांती दलाच्या सर्व पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

पण पुढचा अध्याय आहे. कश्मिर फाईल एक अर्धसत्य या कार्यक्रमाला कोणी कश्मिरी पंडित विरोध करत आहे हे आम्हाला तरी कळलेच नाही. त्या व्यक्तीला कार्यक्रम होण्याआधीच आम्ही त्यांच्या भावना दुखावण्याचा संभव आहे असे कळल्याने त्यांनी कार्यक्रमाला विरोध केला होता पण तो आम्हाला कळलाच नाही.योग्य पद्धतीने होणाऱ्या विरोधाचे सुद्धा स्वागत आम्ही केले आहे आणि यापुढेही करू पण अट आहे तो आम्हाला समजायला हवा.

हा विरोध कार्यक्रम झाल्यावर आम्हाला कळाला. तेही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर वरून, त्यांनी कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या व्यक्तीला अटक किंवा डिटेन करण्याच्या विरोधात ते ट्विट केले होते. त्यांच्या मते ठाकरे सरकारच्या राजवटीत हिंदूंवर अन्याय सुरू आहे आणि तो दूर करण्यासाठी म्हणून त्यांनी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोथरूड पोलिस ठाण्यात पाठवले आणि त्या व्यक्तीची सोडवणूक केली. त्या व्यक्तीने देखील या लोकांचे आणि भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त करणारे ट्विट केले.

आम्हाला कल्पना नसलेल्या या ट्विटर युद्धात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे मावळते महापौर मुरलीधर मोहोळ,दिल्लीचे तेजेंद्रपाल सिंह बग्गा हे सहभागी झाले होते. पण आम्हाला त्याची कल्पना नंतर आली.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना आम्हांला ३५ वेळा अटक करण्यात आली होती त्या खटल्याच्या निमित्ताने वर्षांपेक्षा जास्त काळ कोर्टात उपस्थित राहावं लागलं पण तेव्हा ना कोणी विरोधी पक्ष नेत्यांनी ट्विट केले ना आम्ही त्याचा बाऊ केला. पण यावेळी मात्र त्यांना भरपूर वेळ मिळाला.

आमचं तर आम्ही सोडून दिले आम्हा सत्याग्रही मंडळींची हे सर्व सहन करण्याची तयारी असतेच पण हेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना धुळे दौऱ्यावर गेल्यावर धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला अटक करून ठेवण्यात आली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करण्याचे धाडसही केले नाही आणि त्याकडे लक्ष देण्याची त्यांना गरजही वाटली नाही. असे दुटप्पी वागणे आधीच सिद्ध झालेले असताना त्यांच्या छाती बडवण्याकडे आम्ही फक्त पुन्हा येईन साठीचा प्रयत्न म्हणूनच पाहिले.

हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आणि समाज-समाजातील अंतर कमी करण्यासाठी तसेच या देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी युवक क्रांती दल प्रयत्नशील होते आणि आहे तसेच पुढे राहील. हाच संदेश आम्हांला द्यायचा होता. आणि ज्यांच्या पर्यंत तो पोहचण्याची आवश्यकता होती तिथे तो पोहचला. हिच आमची भूमिका आहे. पुणेकर जनतेनं दिलेल्या प्रतिसादामुळे नव्या संघर्षासाठी प्रेरणा मिळाली या निमित्ताने त्यांचेही आभार.

जांबुवंत मनोहर
(राज्य संघटक, युवक क्रांती दल)
संपर्क – 9028633720

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply