कुलसचिवांनी बंगल्याचे नूतनीकरण आणि सुरक्षा व्यवस्थेवर केली 80 लाखांची उधळपट्टी

You are currently viewing कुलसचिवांनी बंगल्याचे नूतनीकरण आणि सुरक्षा व्यवस्थेवर केली 80 लाखांची उधळपट्टी

जागल्या पडताळणी : भाग 2

पुणे, दि. 26 डिसेंबर 2021

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून नुकतेच विद्यापीठातील सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांचे शुल्क तिप्पटीने वाढवण्यात आले आहे. त्याचबरोबर महाविद्यालयांच्या केंद्रामध्ये पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद करण्यात आहे. कमवा व शिका योजनेवरचा खर्च कसा कमी करता येईल यावर व्यवस्थापन परिषदेत घनघोर चर्चा होतात. यामध्ये कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार सर्वात आघाडीवर असतात. आणि तेच दुसरीकडे आपल्या स्वतःवर कशी उधळपट्टी करत आहेत, त्याचा हा पडताळणी रिपोर्ट.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर निनावी पत्राद्वारे करण्यात आलेल्या 23 गंभीर आरोपांची पडताळणी जागल्या वेब पोर्टल करत आहे. आरोप क्रमांक 2, 3 व 4 चा पडताळणी अहवाल आम्ही आज मांडत आहोत.

कुलसचिवांचे या आरोपांबाबत काय म्हणणे आहे, त्यांची बाजू काय आहे ते सविस्तर लिखित स्वरूपात देण्याबाबत कळवले आहे, मात्र अद्याप पर्यंत त्यांनी यास प्रतिसाद दिलेला नाही.

पत्रात करण्यात आलेले आरोप

2) कुलसचिवांनी त्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च केला. त्यासाठी मॅनेजमेंट कौन्सिल, महापालिका यांची परवानगी घेण्यात आली नाही.

3) कुलसचिवांनी त्यांच्या बंगल्याच्या आवारात लावलेली महागडी फुलझाडे, शोभिवंत रोपे यांचा खर्च गार्डन विभागाच्या दुसऱ्या खर्चात दाखवला गेला.

4) कुलसचिवांनी विद्यापीठ फंडातून बेकायदेशीरपणे 50 हजार रुपयांची पगारवाढ घेतली. त्याची उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांकडून चौकशी सुरू आहे.

जागल्याने केलेल्या पडताळणीमध्ये आढळलेले तथ्य

1) कुलसचिवांनी त्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी केलेला खर्च हा विद्यापीठात मोठा चर्चेचा विषय ठरला. याबाबत माहिती अधिकारात अनेक अर्ज टाकण्यात आले. मात्र तांत्रिक कारणे देऊन ते फेटाळले गेले, माहिती दिली गेली नाही.

2) सिनेट सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी ही याबाबत सिनेटमध्ये प्रश्न विचारला होता. मात्र त्यांचा अर्ज कुलगुरूंनी आपला विशेषाधिकार वापरून रद्द ठरवला व त्याबाबत माहिती दिली नाही.

3) प्रशासनाकडून जागल्या वेब पोर्टलच्या टीमला याबाबत खर्चाची एकत्रित माहिती देणे शक्य नसून त्याबाबतच्या कागदपत्रांची तपासणी करण्यास सांगण्यात आले. यासाठी विद्यापीठातील बांधकाम खर्चाचे सर्व रजिस्टर, असंख्य कागदपत्रे समोर ठेवण्यात आली. मात्र जागल्या टीमने चिकाटीने त्याची तपासणी केली. कुलसचिवांनी मूळ बंगल्यात बरेच बदल केले आहेत. नवीन रूम, प्रत्येक रूमला स्वतंत्र टॉयलेट, बाथरूम, झुंबर व इतर आकर्षक सजावट आदींसाठी किमान 50 लाख रुपयांपर्यंतचा खर्च झाल्याचे आमच्या निदर्शनास आले.

4) विद्यपीठाच्या परिनियमानुसार केवळ कुलगुरूंच्या बंगल्याला सुरक्षा रक्षक देता येतात. मात्र कुलसचिवांनी आपल्या बंगल्याच्या सुरक्षेसाठी 24 तासांसाठी एकूण 3 शिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक ठेऊन घेतले. या सुरक्षा व्यवस्थेवर गेल्या 3 वर्षात साधारणतः 30 लाख रुपये खर्च झाला आहे.
त्यामुळे आमच्या कागदपत्रे तपासणीत किमान 80 लाख रुपये कुलसचिवांनी आतापर्यंत आपल्या बंगल्याचे नूतनीकरण व सुरक्षा व्यवस्थेसाठी खर्च केल्याचे दिसून येते आहे. याव्यतिरिक्त आणखी खर्च झाला असू शकतो मात्र त्यासाठी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून कागदपत्रांची व प्रत्यक्ष बंगल्याची तपासणी करावी लागेल.

5) विद्यापीठाच्या इतिहासात आतापर्यंत एकाही कुलसचिवांनी आपल्या बंगल्याला सुरक्षा व्यवस्था वापरलेली नाही

6) कुलसचिव हे केवळ प्रशासकीय पद आहे, त्यास अकॅडमिक अधिकार नाहीत. त्या पदाचा ग्रेड पे हा प्राध्यापकांपेक्षा कमी आहे. जर विद्यापीठ प्रशासनास कुलसचिवांच्या घराला सुरक्षा व्यवस्था द्यायची असेल तर पहिल्यांदा त्यांच्यापेक्षा जास्त ग्रेड पे असलेल्या सर्व प्राध्यापकांना ती द्यावी लागेल.

7) कुलसचिवांनी विद्यापीठ फंडातून 50 हजारांची बेकायदेशीर वाढ करून घेतली, या आरोपात पूर्ण तथ्य आहे. या वेतनवाढीला राज्य शासनाची परवानगी घेणे आवश्यक होते. ती परवानगी न घेता वाढ घेतल्याने कुलसचिवांना उच्च शिक्षण विभागाकडून 6 वेळा नोटीसा बजावण्यात आल्या. तसेच सहसंचालकांमार्फत याची चौकशी होऊन त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

क्रमशः


आवाहन : कुलसचिवांवरील आरोपांबाबत ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निनावी पत्राद्वारे आरोप केले आहेत. त्यांनी याबाबत त्यांच्याकडे काही पुरावे असल्यास ते जागल्या वेब पोर्टलकडे सुपूर्त करावेत. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

संपर्क – दीपक जाधव, संपादक, जागल्या वेब पोर्टल, मोबाईल क्रमांक – 9922201192, ई-मेल –deepak.jadhav23@gmail.com

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply