समाजबंध आयोजित ‘सत्याचे प्रयोग’ शिबिर : का, काय आहे, कधी व कुठे ?

You are currently viewing समाजबंध आयोजित ‘सत्याचे प्रयोग’ शिबिर : का, काय आहे, कधी व कुठे ?

पुणे, दि. 21 मार्च 2022

सत्याचे प्रयोग शिबिर का ?-

गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगडच्या सीमेलगत भामरागड हा निसर्गसंपन्न, आदिवासीबहुल तालुका आहे. येथील गोंड व आदिम आदिवासी असलेल्या माडीया जमातीसोबत समाजबंध २०१८ पासून वेळ-संधी मिळेल तसं मासिक पाळी या विषयावर काम करत आहे. या विषयी शास्त्रशुद्ध माहितीचा अभाव, पाळीत वापरायच्या संसाधनांचा अभाव तसेच पाळीविषयक परंपरागत चालत आलेल्या काही प्रथांमुळे येथील महिलांच्या आरोग्याच्या समस्या गंभीर आहेत.

भामरागड व काही तालुक्यांमध्ये मासिक पाळीच्या काळात ४-५ दिवस महिलांना घरापासून लांब असलेल्या स्वतंत्र झोपडीत रहावे लागते जिला माडिया भाषेत ‘कुर्माघर’ असे म्हणतात. त्या छोट्याशा झोपडीत वीज, पाणी, स्वच्छता, फरशी, पुरेशी जागा, व्यवस्थित छप्पर, आरामासाठी नीटनेटके अंथरूण असं काहीच नसल्याने महिलांची बरीच गैरसोय होते, आवश्यक स्वच्छता राखली जाऊ शकत नाही पर्यायाने बरेच आजार होतात. या दरम्यान पुरुषांना स्पर्श केलेला, घरात आलेलं चालत नाही.

कुर्माघर

आधी पुरुषांना दिसलेलं, हमरस्त्यावरून गेलेलं ही चालत नसे. आता हे काही प्रमाणात शिथिल झालं असलं तरी बऱ्याच दैनंदिन व्यवहारात अस्पृश्यता शिल्लक आहे. त्याचसोबत पावसाळ्यात अनेकदा कुर्माघरात साप, विंचू चावल्याने आणि चावल्यानंतरही केवळ कुर्म्यात आहे म्हणून पुरुषांनी दवाखान्यात न नेल्याने बऱ्याच महिला, मुलींना जीव गमवावा लागला आहे. असं घडूनही कुर्मा ही समाजमान्य प्रथा असल्याने ती आजही पाळली जात आहे.

मुळात निसर्गपूजक व मातृसत्ताक असलेल्या आदिवासी समुदायाचे याविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. मात्र हे न करता काही संस्था व सरकारी यंत्रणाही पक्की, सर्व सोयींनी सुसज्ज अशी कुर्माघरं बांधून देत आहेत. महिलांना किमान स्वच्छता व सुरक्षितता मिळणे आवश्यक आहेच पण त्यासाठी तात्पुरता मार्ग अवलंबण्यापेक्षा प्रबोधनाच्या माध्यमातून समाज प्रथेतच उत्स्फूर्तपणे बदल करेल यासाठी प्रयत्न होणे समाजबंधला आवश्यक वाटते आणि त्यासाठीच हे ‘सत्याचे प्रयोग’.

शिबिरात काय असेल ?

एकूण ५० शिबिरार्थी निवडले जातील. जे गटाने ६ दिवस एका टोल्यात (आदिवासी वस्तीत) राहतील. तेथील प्रत्येक पुरुष व महिलेला या विषयी बोलणे, त्यांचं आकलन व मतं समजून घेणे, समूहात ‘प-पाळीचा’ संवाद सत्र घेऊन या मागील शरीरविज्ञान समजावून सांगणे, पाळीविषयी इत्थंभूत माहिती देणे, महिलांना कापडी पॅड वापरायला देऊन ते बनवायला शिकवणे, माडिया भाषेतील काही चित्रीफिती दाखवणे, डॉक्टरांकडून महिला आरोग्याची तपासणी करणे, नाटक-पथनाट्य बसवणे-सादर करणे, कुर्माघरांची स्वच्छता करणे व स्वच्छतेचे महत्व पटवणे अशी विविध कामं हे कार्यकर्त्यांचे गट त्या गावात राहून करतील व या माध्यमातून पाळीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसीत करण्याचा प्रयत्न करतील. शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रशिक्षणासाठी व शेवटच्या दिवशी अनुभवकथनासाठी सर्व गटांचे कार्यकर्ते एकत्र असतील. यासाठीचे सर्व साहित्य, व्यवस्था समाजबंध जमवेल, पुरवेल.

कधी ? –

शिबिर १५ ते २२ एप्रिल या कालावधीत आहे. १४ च्या रात्री पोहोचणे व २३ च्या सकाळी परत निघणे अपेक्षित आहे.

कुठे ? –

भामरागड तालुक्यातील विविध गावं. नागपूरपासून भामरागड ३५० तर गडचिरोलीवरून १८० किलोमीटरवर आहे.

सूचना :
१. वर्धा/नागपूर ते भामरागड व परत या प्रवासाची सोय समाजबंध करेल.
२. प्रवास, निवास व जेवणाची व्यवस्था समाजबंध करेल. मात्र आपल्या ठिकाणापासून उपलब्ध रेल्वेस्टेशन पर्यंतचे व परतीचे रेल्वे/बसचे तिकीट आधी आपल्याला काढावे लागेल. शिबिरानंतर त्याचेही पैसे परत मिळतील. ऐनवेळी येणे रद्द करणाऱ्या लोकांमुळे संस्थेचे पैसे वाया जाऊ नये म्हणून असे ठरवले आहे.
३. शिबिरार्थी संख्या- ५०. वयोमर्यादा- १८ ते ५०. महिलांना प्राधान्य. मराठी भाषा आवश्यक.
४. सोबतच्या Google Form द्वारे नोंदणी करावी लागेल, त्यानंतर फोनवर मुलाखत व त्यात पात्र झाल्यास Video Call द्वारे मुलाखत घेऊन Final Selection केले जाईल. नोंदणीची शेवटची तारीख २५ मार्च.
५. शिबिराच्या आयोजनात, देणगी देण्यास, देणगी जमवण्यात कोणी मदत करू इच्छित असेल तर स्वागत आहे.

Link: https://cutt.ly/GA34GmW

अधिक माहितीसाठी:

सचिन 7709488286
सुरज 9423395097
contactsamajbandh@gmail.com

समाजबंधच्या उपक्रमाला साथ द्या


साथी,
सत्याचे प्रयोग शिबिरासाठी २० दिवस शिल्लक आहेत आणि आपल्याला १४ लाख रुपये जमवायचे आहेत. मी यासाठी वेगवेगळ्या लोकांना व्यक्तिशः भेटत आहे, बोलत आहे पण एकट्याने इतका निधी जमा करणे शक्य नाही असे दिसतेय.
आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या Fund Raising साठी आपल्या काही कल्पना असतील किंवा आपण काही करू शकत असाल तर कळवा. प्रत्येकाने आपल्या संपर्कातील किमान १० संवेदनशील आणि आर्थिक सक्षम व्यक्तींना व्यक्तिशः फोन करून याविषयी अधिक माहिती दिली तर लोक नक्कीच पैसे देतील. १४ लाख ही मोठी रक्कम असली तरी अशक्य नक्कीच नाही.
या कामात कुणाला सहभागी व्हायचे आहे ते कळवा. सर्वजण मिळून प्रयत्न करू.

आपला

सचिन, समाजबंध

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply