कुलसचिवांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल

You are currently viewing कुलसचिवांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाकडे तक्रार दाखल

जागल्या पडताळणी : भाग 3

पुणे, 31 डिसेंबर 2021

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर निनावी पत्राद्वारे करण्यात आलेले आरोप खूपच गंभीर आहेत. जागल्या वेब पोर्टलच्या पडताळणीमध्ये त्यातील काही आरोपांमध्ये सकृतदर्शनी तथ्य आढळून आले आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी पवार यांच्या विरोधात शुक्रवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागकडे जागल्याच्या पडताळणीमध्ये उपलब्ध झालेले सर्व पुरावे सोपवले जाणार आहेत. जागल्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यापीठातील काही अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर काही पुरावे दिले आहेत. त्याचबरोबर आता आणखी कुणाला याबाबत पुरावे द्यायचे असतील त्यांनी थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे (सेंट्रल बिल्डिंग, सी बराक, संपर्क 020-2612 2134) यांच्याशी संपर्क साधावा.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी तातडीने याची खातेनिहाय विभागीय चौकशी करणे अपेक्षित होते. मात्र अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही लेखी तक्रार करणार असल्याचे ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले.

निनावी पत्रातील उर्वरित आरोप

निनावी पत्रामध्ये प्रफुल्ल पवार यांना एका ठेकेदाराकडून मारुती सुझुकी बलेनो गाडी भेट देण्यात आली, दिवाळीमध्ये कुलसचिवांनी ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात गिफ्ट स्वीकारले, सीमा भिंत बांधण्याच्या कामात तसेच स्पीड ब्रेकरच्या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला, कुलसचिवांच्या बंगल्यावर रात्री उशीरापर्यंत दारूच्या पार्ट्या रंगातत, त्यांच्याकडून कुलगुरूंच्या कार्यालयात हेरगिरी केली जाते असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर महिलांविषयक काही आरोप करण्यात आले आहेत

जागल्या पडताळणी

पत्रातील उर्वरित गैरव्यवहरांचे हे आरोप मात्र जास्त गंभीर आहेत. जिथे कागपत्रे उपलब्ध झाली तिथे जागल्याकडून त्यातले तथ्य समोर आले गेले. आता उर्वरित आरोपांची शहानिशा ही एखाद्या तपास यंत्रणेकडूनच योग्य प्रकारे होऊ शकणार आहे. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कुलसचिवांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास दिला किंवा त्यांचे शोषण केले अशी कोणाची ही काही तक्रार आल्यास त्यांनी न घाबरता पुढे यावे. विद्यापीठातील विशाखा समिती किंवा पोलिसांकडे तक्रार दाखल करावी.

बदल घडत आहेत

कुलसचिवांवरील लेखमालिकेचे मोठे पडसाद विद्यापीठ वर्तुळात उमटत आहेत. विद्यापीठात इतके काही चुकीचे घडू शकते यावर अजून ही अनेकांचा विश्वास बसत नाही. एकूणच विद्यापीठ फंडाचा दुरुपयोग करणाऱ्या सर्वांवरच या लेख मालिकेमुळे एक दबाव निर्माण झाला आहे. याचा शेवटपर्यंत पाठपुरावा जागल्या करत राहील.

जागल्या वेब पोर्टलने गेल्या दोन वर्षात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक गैरव्यवहार उजेडात आणले. विद्यापीठात कॅपम्समध्ये प्रवेश करण्यासाठी मासिक हजार रुपये शुल्क लागू करणे, मुख्य इमारत बंदिस्त करणे आदी चुकीचे निर्णय जागल्याने हाणून पाडले. स्वायत्ततेच्या नावाखाली प्रचंड मनमानी कारभार इथे सुरू होता. त्याला काही प्रमाणात तरी अटकाव करता आला आहे.

सदैव लक्ष राहणार

कुलगुरूंचा कार्यकाळ संपताना काही व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या हितासाठी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जाणार असल्याची माहिती जागल्या वेब पोर्टलला मिळाली आहे. त्याचबरोबर विद्यापीठाने स्थापन केलेल्या कंपन्यांकडून बेकायदेशीर काम केले जात आहे, त्याची ही माहिती गोळा केली जात आहे.

टेंडर प्रक्रिया, विद्यार्थी हिता विरोधात घेतले जाणारे निर्णय, व्यवस्थापन परिषदेचे निर्णय यावर जागल्याचे बारीक लक्ष यावर असणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठ हितासाठी कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विद्यापीठात काही चुकीचे घडत असल्यास तातडीने आमच्या निदर्शनास आणून द्यावे.

क्रमशः

दीपक जाधव
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – 9922201192
ई-मेल – deepak.jadhav23@gmail.com

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply