मानवी भाव-भावना, सृजनशील संवेदना व सहजीवनाचे मूल्य वृद्धिंगत करणारा असा कवितासंग्रह

You are currently viewing मानवी भाव-भावना, सृजनशील संवेदना व सहजीवनाचे मूल्य वृद्धिंगत करणारा असा कवितासंग्रह

डॉ. राहुल पुंगलिया लिखित “गावाबाहेर ” या कविता संग्रहाच्या निमित्ताने…

प्रा. विनोद सुर्यवंशी

मराठी साहित्याचा विचार केला तर 1950 ते 1980 च्या दशकातील लिखाण हे वैश्विक व मूलभूत मानवी भावना व्यक्त करणारे दिसून येते. या काळातील साहित्य हे सृजनशील, कलात्मक व मानवतावादी मूल्यांची मानवी जगाला देण म्हणले तरी वावगे ठरणार नाही. ते जात, धर्म, लिंग, प्रदेश, वंश अश्या अस्मिता दर्शक भेदभावार मात करून मानवी संवेदनाचा समर्थपणे वेध घेते म्हणुन ते कालातीत आहे.

कवितेचा विचार केला तर यामध्ये रेगे, मर्ढेकर ते मनोहर ओक,दिलीप कुलकर्णी, दि.पु. चित्रे, चारुदत्त भागवत तसेच अण्णा भाऊ साठे आणि नामदेव ढसाळ यांच्या कवीता या अभिजात दर्जाच्या आहेत.

सध्याच्या साहित्याचा विचार केला की त्याला जात, धर्म व व्यवसाय ह्याची साथीच्या रोगासारखी लागण झालेली दिसते. सध्या साहित्य हे भूमिका घेणारे प्रचारकी झाल्याचे दिसून येते. म्हणून आजच्या भांडवली, स्पर्धात्मक, शहरी, आभासी आणि आधुनिक काळात मानवी भावना व संवेदना बोथट होताना दिसत आहे

मानवी भाव-भावना, सृजनशील संवेदना व सहजीवनाचे मूल्य वृद्धिंगत करण्यासाठी अस्सल साहित्याची गरज आहे. या गरजा डॉ. राहुल पुंगलिया यांच्या “गावाबाहेर ” कवितासंग्रह पूर्ण करणार यात तिळमात्र शंका नाही.

कवितासंग्रहातील “अशी ही पिवळी फुलपाखर ” आणि “मधली अंतर” या दोन कविता मोठा आशय व्यक्त करतात
“अशी ही पिवळी फुलपाखरं “: पिवळी फुलपाखरे ही सर्वत्र आढळतात. ती नाजूक, कोमल, आकाराने लहान व रंगाने फक्त पिवळी असतात म्हणजेच ती रंगी बेरंगी नाहीत. म्हणुन त्यांच्याबद्दल कोणाला मोह किंवा आकर्षण वाटत नाही. ती सर्वांना आवडतील असे नाही. ती संख्येने जास्त असली तरीही कवी त्यांना घरी आणण्यासाठी शेत, नदी-नाले, पूल आणि डोंगर एवढ्या ठिकाणी त्यांचा पाठलाग करतोय. ते सुद्धा कवीचा पाठलाग करतात, परंतु ती कवीच्या घरी येत नाहीत. कारण ती माणसाळलेल्या वातावरणात वावर करण्यास घाबरत आहेत. कारण ती कोमल, नाजूक, आकाराने लहान, शाकाहारी आणि सम्यक आहेत. हा खऱ्या अर्थाने शिर्षकातील विरोधाभास आहे.

कारण ही फुलपाखरे सर्वांना आवडतीलच असे नाही. दुसरीकडे लाल, काळी,निळ्या आणि जांभळ्या रंगाची फुलपाखरे आहेत. ही आकर्षक असून पर्यायाने पिवळ्या फुलपाखरांच्या तुलनेत मोठी, राकट आणि सुरवंटासारखे आक्रमक व हिंस्र आहेत. ती दारात आणि खिडक्यांत उपलब्ध आहेत. ती सर्वांना आकर्षक आणि हवीहवीशी वाटतात. परंतु कवीला या फुलपाखराबद्दल कसलेही आकर्षण वाटत नाही. कारण कवी पिवळी फुलपाखरे पाहून अंतर्मुख होऊन आपले स्वत्व त्यांच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो.

कवीला वाटते की पिवळ्या फुलपाखरानी रहदारीच्या आणि शहरी ठिकाणी वास्तव्य केले पाहिजे. त्याच वेळी कवीला असेही वाटते की ही फुलपाखरे रिक्षाच्या, ट्रकच्या आणि रेल्वेच्या आवाजाने दचकतील व घाबरून जातील, म्हणून त्यांना असे वास्तव्य नकोसे वाटेल.

कारण अशी फुलपाखरे ही आधुनिक, भांडवली, स्पर्धात्मक व शहरी जीवनात वास्तव्यास अपात्र आहेत. जर त्यांनी बळेच वास्तव्य म्हणून गावाबाहेर वस्ती केली तर ती निराश्रित ठरतील, तशी ती ओळखली जातील. त्यांचे खरे वास्तव्य हे निसर्गातील शेती, नदी व डोंगर यांच्या सानिध्यात आहे. हा विरोधाभास कवी पुन्हा पुन्हा व्यक्त करत आहे.

मुळात अशी फुलपाखरे घरी येण्यास उत्सुक नाहीत. तरीही कवीला वाटते की दोन-तीन फुलपाखरे फोनच्या रिसिव्हवरवर बसावेत. फोन हा आधुनिकतेचे प्रतीक आहे म्हणून कवीचा हा आशावादसुद्धा फोल ठरला आहे. तरीही ती कवीला घरी येऊन कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर बसावी आणि ती स्क्रीन प्रकाशमान होण्याची आतुरतेने वाट बघावी असे वाटणे देखील एक खुळचट कल्पना आहे. शेवटी कवी म्हणतो की अशा या फुलपाखराना हे घर बहाल करून निघून जावं. परंतु ह्या दोन्ही संभावना अशक्य आहेत.

ही फुलपाखरे पिवळी असल्यामुळेच गौतम बुद्ध यांच्याप्रमाणे विरक्तीप्रदान भावात विलीन होतात. कवी हा पिवळ्या फुलपाखरात अंतर्मुख होऊन स्वत:चे भावविश्व त्यांच्यात शोधताना दिसतोय.

“मधली अंतर” ही कविता आकृती या प्रतिमेने सुरू होते. आकृती ही प्रतिमा आधुनिक, वैज्ञानिक, गणितीय आणि भूमितीय परिपेक्षात वापरली जाते. त्यामुळे त्यात वस्तुनिष्ठता आणि कृत्रिमपणा पाहावयास मिळते. त्या ठिकाणी वैयक्तिक, आत्मनिष्ठ भाव-भावना व संवेदना यास वाव नाही. या कवितेत कवीने दोन विवाहित व्यक्तिमधील नातेसंबंध आकृतीच्या माध्यमातून उलगडून दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

आकृतीचा नेहमी अर्थ लावणे गरजेचे असते. हीच बाब आधुनिक नातेसंबंध यास लागू पडते. ह्या कवितेत गणेश हा कथनकार आहे. तो फोटोग्राफिमधल्या दोन आकृतीच्या नातेसंबंध यावर भाष्य करीत आहे. त्यामध्ये भयानक अंतर व दुरावा आहे. त्या दोघांमध्ये काय संबंध किंवा नाते आहे का नाही हा अर्थ लावणे कठिण आहे. कोणाचेही संभाषण नाही. सुसंवाद साधण्यास दोघेही असमर्थ आहेत. फोटोग्राफिमधले अंतर स्पष्टपणे जाणवते आणि ते बदलता सुद्धा येत नाही. हेच आधुनिक नातेसंबंधाला लागू पडते.

उत्पादन प्रक्रियेतील,जीवनाच्या कार्यपद्धतीतील परात्मभाव नातेसंबंध ह्यातसुद्धा दिसून येतो. ही अंतर विसाव्याच्या वेळेला देखील जाणीव किंवा जाणिवेच्या अभावामुळे जाणवतात .त्यांना जाग आली तेव्हासुद्धा ती कायम दिसतात. ती कमी होण्याची संभाव्यता नसल्याने ते निपचितपणे व निमुटपणे डोळे मिटून पडून राहतात. कवीने पुढे शहरी दैनंदिन जीवनाची वहिवाट अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

बसमधून प्रवास करताना, खिडकीतून सावधपणे निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी धडपड अश्या धावपळीच्या जीवनाचा परिपाठ उभा केला आहे. दैनंदिन कामकाज सावधपणे करतानादेखील आधुनिक व्यक्ती त्यात एकरूप होत नाही. त्यामधे परावलंबीकरण आल्यामुळे त्याला गाफील किंवा बेसावध झाला तर पुन्हा तो अवकाश व अवधी वाढेल. पुन्हा तो भरून काढण्यासाठी आणि पुन्हा सापडण्यासाठी पुन्हा नव्याने तयारी करावी लागेल. म्हणून मानवी जीवन यंत्रवत झाले आहे, असे कवीला वाटते.

कवीने समग्र कविता संग्रहात प्रतिमा व प्रतीक यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. त्यामुळे विशिष्ट अस्मिता यावर भाष्य न करता समग्र मानवी जीवनाचे भावविश्व उलगडण्यास ते समर्थ ठरत आहेत.

प्रा. विनोद वसंतराव सुर्यवंशी
सहाय्यक प्राध्यापक, पुणे
संपर्क – 9766183483

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply