हा देश म्हणजे हाताची घडी घातलेले पुतळे बनवण्याची फॅक्टरी नाही

You are currently viewing हा देश म्हणजे हाताची घडी घातलेले पुतळे बनवण्याची फॅक्टरी नाही

युवक क्रांती दलाच्या संविधान प्रचार या एका महत्त्वाच्या उपक्रमात ‘भारतीय संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर युक्रांदचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर यांनी मांडलेले विचार.

भाग 2

आम्ही सुद्धा अहिंसक पद्धतीने रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो, पोलीस आम्हाला अटक करतात, खटले चालवतात, त्यातूनही आम्ही निर्दोष मुक्त होतो, हे सगळं भारतीय संविधान आणि संविधानाने दिलेल्या चौकटीत आम्ही करत असतो. बरं हे करताना आमची प्रेरणा काय असते ? तर भारतीय संविधान व्यक्त होण्याचा जो अधिकार आम्हाला देत, त्या अधिकाराचा वापर भारतातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही करत असतो. ज्यांच्यासाठी हे संविधान बनलेलं आहे त्यांच्यासाठीच हे सारे काही करत असतो. आणि तीच या आंदोलनाची प्रेरणा असते. म्हणून आजतागायत युवक क्रांती दलाचे कोणतेही आंदोलन अयशस्वी झाले नाही. किंवा त्यात हिंसा देखील झाली नाही. हे सांगताना आम्हाला आनंदही वाटतो आणि अभिमानही.

चित्र काढणं, गाणं म्हणणं, चित्रपट काढणं, भाषण करणं,नाटक करणं, लिखाण, आंदोलन, कविता, पुस्तकं, हे सारच अभिव्यक्तीच्या अंगांनी पाहिलं जातं. “मत हा अभिव्यक्तीचा सर्वोच्च आविष्कार आहे”  असं मला वाटतं. कारण ते देताना जी प्रेरणा होते त्याचा परिणाम किंवा छटा या बाकीच्या सगळ्यांचं अभिव्यक्तीच्या साधनांवर होतो.

म्हणजे असं बघा, मतांवर सरकार आलं आणि तेही पाशवी बहुमतात आलं. पुढे त्यांचा प्रचार करणारे पिक्चर निघाले. त्यात एखाद्याची चांदी झाली की पुढच्या मंडळींची रांगच लागली. आता तर तळवे चाटण्याची स्पर्धेत सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत मग मुद्दाम राजपूत उदयभान ला  मुसलमान दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. तसा गेटअप केला जातो. हा द्वेष पसरवण्याचाच एक भाग आहे. सर्जिकल स्ट्राइक वर पिक्चर येतो यापूर्वीही असे पिक्चर निघाले होते पण यामध्ये सुप्तपणे का होईना सरकारचा गुणगौरव केला जातो. कश्मीर फाईल सारखा सुद्धा पिक्चर येतो आणि देशाला थेट दोन हिश्श्यामध्ये विभागून टाकतो. “एक कश्मीर फाईल ची बाजू घेणारे” आणि “दुसरे बाजू न घेणारे” त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दरम्यान देशाचे वातावरण कसे होते हे आपल्या सर्वांना माहित आहेच.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रामनवमीच्या ज्या मिरवणुका निघाल्या त्यांचे प्रमाण यावेळी वाढले होते. ते प्रमाण वाढले याबद्दल कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही आम्हालाही नाही. ते घोषणा देत होते “जय श्रीराम” त्याला कोणाची हरकत असण्याचे काय कारण ? ते नाचत होते त्यांच्या नाचावर तरी कोणाचा आक्षेप असण्याचे कारण काय ? ते झुंडीने हा शब्द वापरण्यापेक्षा समूहाने हे सगळं करत होते. पण त्याच वेळी त्या समूहाकडे शस्त्र होती. तो समूह हातात शस्त्र घेऊन हे सगळं जोशपूर्ण नव्हे तर द्वेष पूर्ण होऊन परधर्मीयांच्या मोहल्ल्यात करत होता. हे भारतीय संविधानाला अभिप्रेत नाही. असलं दुसऱ्याच्या प्रतिष्ठेवर, संपत्तीवर, धर्मावर, शांततेवर हिंसक पद्धतीने हल्ला करण्याचा अधिकार कलम 19 मधले अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत नाही.

आम्ही संजय काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात सत्याग्रह केला होता. अजूनही ते आंदोलन वेगळ्या पातळीवर सुरू आहे. त्या आंदोलनात एकदाही आम्ही मुर्दाबाद ची घोषणा दिली नाही. एकदा ही हिंसक रूप घेतलं नाही. एकदा ही पोलिसांशी आमचं वैर आलं नाही. त्यात आम्हाला पोलिसांनी अटकही केलं आणि खटलेही भरले. न्यायालयात जाऊन आम्ही आमचा खटला स्वतः चालवला युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांनी सर्व आंदोलकांची बाजू मांडली.

  अंतिमतः न्यायालयाला हे म्हणावं लागलं की “सत्याग्रह करणे कायदेभंग असू शकत नाही तो भारतीय घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे” आता इथं तुम्हाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याच्या  प्रेरणेचा मुद्दा लक्षात येईल. न्याय न मिळालेल्या, न्यायापासून वंचित राहिलेल्या, भारतीय नागरिकांना न्यायाच्या जवळ नेण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणं वेगळं. आणि द्वेष पसरवण्यासाठी अभिव्यक्तीचा वापर करणं वेगळं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य पद्धतीने वापर करणाऱ्यांना त्याचा लाभही होतो आणि त्यामुळे देशात लोकशाही प्रस्थापित होण्याची प्रक्रिया कणाकणाने का होईना पण पुढे जाते.

आत्ताच आपण दिल्लीचे किसान आंदोलन पाहिले आहे. त्यांनी भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अगदी योग्य वापर करून सरकारला कायदे परत घ्यायला लावले. भारताच्या संसदेत कोणतीही चर्चा न होता, शेतकऱ्यांच्या पक्षाला विचारात न घेता, विरोधी पक्षांना विचारात न घेता, हा कायदा करण्यात आला होता. गांभीर्याने आणि चिकाटीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केल्यामुळेच सरकारला हे कायदे मागे घ्यायला भाग पाडलं. त्याच वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आमचेही आंदोलन सुरू होते.

किसान आंदोलनाने स्वातंत्र्यलढ्यातून प्रेरणा घेतली आणि आम्ही पुणे विद्यापीठातील आंदोलन करण्याची प्रेरणा किसान आंदोलनाकडून घेतली. स्वयंपाकाचे सगळे सामान, गॅस, शेगडी, ब्लॅंकेट, सतरंज्या, सुरी, तांदूळ, कांदा, बटाटा, मसाले हे सगळं घेऊनच आंदोलन सुरु केलं. चार दिवस आणि पाच रात्री आम्ही तिथे ठाण मांडून बसलो होतो. आधी त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. मग आमची हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बोलायला सुरुवात केली की युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते चुकीची मागणी करत आहेत. पुढे ते असं म्हणाले की यांना विद्यार्थ्यांचा पाठिंबा नाही. तशा स्वरूपाच्या बातम्या त्यांनी काही माध्यमांना हाताशी धरून पेरण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही हटलो नाही. एका रात्री पोलीस आले आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. बरं त्या पोलिसांची अवस्था अशी होती एक तर घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही त्यांना माहीत नव्हतं. आणि दुसरं विद्यापीठाच्या अनुषंगाने विद्यार्थी हितासाठी केलेले कायदे हि माहीत नव्हते. आम्ही व्हिडिओ शूटिंग सुरू केल्यानंतर पोलिसांना निघून जावं लागलं.पोलीस आमचे बंधू आहेत ते व्यवस्थेतील अगदी खालच्या तळाला असतात म्हणून त्यांच्यावर आमचा राग नसतो. पण कधी कधी आश्चर्य वाटतं की त्यांना हे सगळं कसं माहित नसतं.  विद्यापीठ प्रशासन नमले आमच्या मागण्या रास्त आहेत हे मान्य करून 18000 विद्यार्थ्यांचे निकाल बदलून दिले. हा “भारतीय संविधान” आणि “भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय होता”. पुन्हा त्याच्या योग्य वापराचा मुद्दा लक्षात येतो.

नाशिक वरून मुंबईकडे अनवाणी पायाने निघालेल्या शेतकऱ्यांचे रक्ताळलेले पाय तुम्हाला आठवत असतील. तेसुद्धा या काळातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या योग्य वापराचे एक उत्तम उदाहरण आहे. शांततेच्या मार्गाने आणि कायद्याच्या मार्गाने जाऊन यश संपादन होते. याचा आम्ही वारंवार अनुभव घेत आहोत. त्यामुळे अहिंसेवर आणि संविधानावर त्यायोगे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकार वर श्रद्धा बळकट होते आहे.

त्याच बाजूला आत्ता आत्ताच भोंग यांच्या विरोधातील आंदोलन आपण पाहिलं, त्यापूर्वी मराठी विरुद्ध अमराठी आंदोलन पाहिलं, त्यापूर्वीही अनेक आंदोलनं पाहिली, पण सध्याच्या काळात विकृत अभिव्यक्तीचे  आंदोलन म्हणजे आम्ही तुमच्या घरासमोर येऊन चालीसा म्हणणार, काय प्रकार आहे हा ? अभिव्यक्तीच्या नावाखाली दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारावर अतिक्रमण, हे घटनेला आणि घटनाकारांना मान्य नाही. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची अर्धवट माहिती असली की मग असं होतं. असं करणाऱ्यांना तुरुंगात जावं लागतं, हे आपण पाहिलं आहे तुरुंगात जाणे आम्ही वाईट मानत नाही पण कारण काय आहे हे महत्वाचं हे मुद्दाम नमूद करतो.

अभिव्यक्त होण्याची प्रक्रिया किंवा जागृती होण्याची ठिकाण कोणती ? तर मनुष्याला शिक्षणामुळे जागृती येते. त्याला अभिव्यक्त होण्याच्या माध्यमांचा शोध लागतो. आपापल्या परीने त्याचा वापर करण्याची कलाही अवगत होते. म्हणजे कॉलेज, महाविद्यालयं, विद्यापीठं ही सगळी अभिव्यक्त होण्याची प्रक्रिया समजून घेण्याची आगार आहेत असं म्हणता येईल.
लय बोलू नको गप खा, लय बोलू नको झोप, लय बोलू नको तुझं काम कर, लय बोलू नका गप शिका, हे सगळं एकाच साच्यातल्या आहे. आणि कशा पद्धतीने काय विचार करायचा ? कुठे करायचा ? कुठे करायचा नाही ? यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते आहे. जे प्रशिक्षित होतात ते व्यवस्थेच्या कामाचे आणि जे प्रशिक्षण नाकारतात त्यांना संपवण्याचे काम व्यवस्था मोठ्या शिताफीने करते आहे.

या अनुषंगाने तुम्हाला एक किस्सा सांगतो डिप्लोमा फिल्म पहायला गेलो होतो. FTII च्या भाषेत त्या फिल्मला “लॉन्ग टेक” असं म्हणतात. F.T.I.I च्या मेन थिएटरमध्ये हा शो होता. एक पुतळे बनवण्याची फॅक्टरी असते. हाताची घडी घातलेले पुतळे बनवण्याची ती फॅक्टरी असते. त्यातले सगळे पुतळे हाताची घडी घालून असतात. त्यातला एकच पुतळा बोट समोर करून उभा असतो. सुरुवातीला थोड्याशा प्रयत्नाने त्याला नीट करता येते का ? हे फॅक्टरी तले लोक पहात असतात. तसं होत नाही म्हणून नंतर काही इंजिनियर तो पुतळा नीट करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचाही तो प्रयत्न अयशस्वी होतो. तेव्हा जोर लावून बाळाने त्या पुतळ्याला हाताची घडी घालायला लावण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करतात. पण तेही प्रयत्न निष्फळ होतात, ते प्रयत्न झाल्यावर त्या पुतळ्याचा हात तोडून शेवटी त्याला बाद म्हणून गोडाउन मध्ये फेकलं जातं.

काय होता त्या पुतळ्याचा दोष. त्याचा हात समोर होता हाच ना, पण हा दोष नाही म्हणता येऊ शकत, कदाचित वेगळेपणही असेल. पण त्या फॅक्टरीतल्या लोकांना त्याचे ते वेगळेपण नको होते.  तो पिक्चर पाहत असताना मला असं वाटलं की सगळ्याच पुतळ्यांनी जर समोर हात केले असते तर, कदाचित या पुतळ्याचा हात तुटायचा वाचला असता आणि तो गोडाउन मध्ये जाऊन पडायचा देखील वाचला असता किंवा कदाचित सगळ्यांचे हात तुटले असते. काहीही होऊ शकलं असतं पण तो पिक्चर होता. किंवा एक लॉन्ग शॉट डिप्लोमा होता. त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं हा देश म्हणजे हाताची घडी घातलेले पुतळे बनवण्याची फॅक्टरी नाही. आणि आपण हाताची घडी घातलेले पुतळे नाही. कारण पुन्हा एकदा भारतीय संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य.

आधी मनुस्मृतीने मग इंग्रजांनी लावलेली बंधन मुक्त करण्यासाठी भगतसिंग फासावर गेले. गांधी-नेहरू-मौलाना- पटेल यांनी आयुष्य  घातलं. देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काही आपल्याला शिंग फुटणार नव्हती. अभिव्यक्तीचा अधिकार मिळणार होता. आपल्याला हेच अधिकार मिळावे म्हणूनच आपल्या देशातल्या महापुरुषांनी त्याग करून स्वातंत्र्य मिळवले. संविधानात अभिव्यक्तीचा अधिकार दिला. त्या अधिकारावर गदा आल्यावर खरं तर आपण प्राणपणाने विरोध करायला हवा, कारण हा अधिकार मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलं आहे.

जांबुवंत मनोहर
(राज्य संघटक, युवक क्रांती दल)
संपर्क – 9028633720

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply