गणेशोत्सवात महागाईच्या प्रश्नाला लोकायतने पथनाट्याद्वारे फोडली वाचा

You are currently viewing गणेशोत्सवात महागाईच्या प्रश्नाला लोकायतने पथनाट्याद्वारे फोडली  वाचा

जागल्या, पुणे : 9 सप्टेंबर 2022

प्रश्न प्रश्न प्रश्नांमध्ये अडकून गेले सारे,
मोबाईल टिव्हीच्या राज्यातून बाहेर थोडे या रे

असे लोकांना आवाहन करत, लोकायत नागरी समितीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध मंडळांमध्ये ‘महागाई रं महागाई‘ सडक नाटक सादर केले.

दरवर्षी लोकायत नागरी समितीतर्फे गणेशोत्सवात विविध सामाजिक प्रश्नांवर कार्यक्रम सादर केले जातात. या वर्षी खडकीतील संविधान प्रबोधन मंच, गोखलेनगर मधील लाल बहादुर शास्त्री तरुण मित्र मंडळ व आराधना स्पोर्ट्स क्लब मित्र मंडळ, बोपोडीतील फ्रेंड्स युथ क्लब अशा अनेक मंडळांमध्ये सलग 4 दिवस नाटक सादर केले गेले.

महागाईने सगळीच जनतेसाठी बुरे दिन आणलेत. जनतेला जी.एस.टी. लावून, पेट्रोल-डिझेल चे दर वाढवून, गॅसच्या किंमती वाढवून लुटलं जातय. मात्र अंबानी, अदानी सारख्या काही मूठभर श्रीमंतांसाठी मात्र अच्छे दिन आणलेत. आणि दुसरीकडे दर वर्षी अंबानी, अदानीचे लाखों कोटी रुपयांचे कर व कर्ज सरकारकडून माफ केले जाते. तसेच सरकारी संस्थांचे खाजगीकरण करून देशाची संपत्ती त्यांच्याकडे सोपवली जात आहे. हे अगदी सोप्या पद्धतीने सडक नाटकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले.

लोकायतच्या पथनाट्यातील एक प्रसंग

सामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर बोलणाऱ्या या सडक नाटकाला चांगला प्रतिसाद होता. सडक नाटकामध्ये लोक सक्रिय प्रतिसाद देत होती. बोपोडीमध्ये तर सडक नाटकादरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली पण त्यातही लोक जागची हलली नाहीत. भर पावसात लोकं नाटक पाहण्याचा लोकांचा उत्साह पाहून कार्यकर्त्यांनीही भर पावसात नाटकाचा प्रयोग सुरुच ठेवला.

खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन आणि सर्व समाजाने एकत्रित येऊन गणेशोत्सव साजरा करण्याचा उद्देश पूर्ण करताना लोकायतच्या नवतरूण कार्यकर्त्यांमध्येदेखील प्रचंड उत्साह आणि कुतूहल होते. महागाईमध्ये होरपळलेल्या लोकांचा संताप सगळीकडे प्रकर्षाने दिसत होता. एकजूटीने या महागाईच्या विरोधात संघटित होऊयात हे लोकही बोलत होती.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply