रवीभाऊ, तुम्ही खूप मोठ्या सत्तेला हादरा देऊन एका बदलाची सुरुवात केलीय

You are currently viewing रवीभाऊ, तुम्ही खूप मोठ्या सत्तेला हादरा देऊन एका बदलाची सुरुवात केलीय

प्रिय रविभाऊ सस्नेह नमस्कार,

मोठ्या झोकात कसबा जिंकल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमचे नाव आज देशभर गेले आहे. तुमच्या तसेच संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्या कष्टाचे अक्षरशः चीज झाले आहे. लोकांनी पैसे, गुंडगिरी, जात-पात सारे झुगारून तुम्हांला विजयी केले आहे. हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याचा डाव ही लोकांनी यशस्वी होऊ दिला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संपूर्ण भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तुम्ही पुरुन उरला आहात.

सध्याची राजकीय परिस्थिती खूप विदारक आहे. भाजप ज्या पद्धतीचे राजकारण करतो आहे. घटनात्मक संस्था, विरोधी पक्ष संपवले जात आहेत. विरोधात बोलणारे पत्रकार, सामान्य नागरिक या सगळ्यांना टार्गेट केले जात आहे. अशावेळी माझ्या सारख्या पत्रकाराला तुमचा विजय खूप आशादायक वाटतो आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अघोषित आणीबाणी लागू केली आहे. त्याविरोधात ठाम राजकीय भूमिका घेऊन सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते देशभर उभे राहत आहेत. आजच्या कसब्याच्या विजयाने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील चळवळीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे.

महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या खालच्या स्तराला जाऊन राजकारण करत आहेत त्यामुळे आम्ही सगळे व्यथित झालो आहोत. ठाकरे कुटुंबाकडून पक्ष व चिन्ह काढून घेणे, अनेकांना ईडीच्या धमक्या देऊन भाजपात यायला लावणे, राजकीय नेत्यांना कौटुंबिक पातळीवर त्रास देणे आदी कृत्ये फडणवीस राजरोसपणे करत आहेत. मात्र केंद्रात सत्ता आहे म्हणून तुम्ही वाटेल त्या पद्धतीने वागू शकत नाही असा मेसेज आज कसब्याच्या जनतेने त्यांना दिला आहे.

असो, रविभाऊ गेली 15 वर्षे मी तुम्हांला जवळून पाहतोय. ऑफिसला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम करण्यासाठी तुम्ही करत असलेली धडपड मी पहिली आहे. त्यासाठी काही वेळा मला ही हक्काने फोन करून तुम्ही पळवले आहे. तुमच्या या साऱ्या कामाचे चीज झाले आहे. तुम्हांला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुमचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply