दीपक जाधव
रवीश कुमार यांनी काल रात्री एनडीटीव्हीतील संपादक पदाचा राजीनामा दिला. अर्थात अदानी यांच्या कंपनीने ते चॅनल ताब्यात घेतल्याने हे अटळ होते. मात्र या राजीनाम्यानंतर देशभरातील विविध माध्यमांवर रवीश यांच्याविषयी भरभरून लिहलं जात आहे. असं प्रेम आजपर्यंत कुठल्या संपादक, पत्रकाराला मिळालेले अजून तरी पाहण्यात वा ऐकिवात नाही. रवीशने त्याच्या 26 वर्षांच्या पत्रकारितेमध्ये जे काम केलंय त्याचीच पावती त्याला आज मिळते आहे.
हे खरंय की, केवळ एका पत्रकाराचा आवाज दाबण्यासाठी त्याचे अख्ये न्यूज चॅनल विकत घेतले गेले आहे. मात्र तरीही त्याने फार काही बिघडणार नाही. कारण रवीशला फक्त नोकरीच सोडावी लागली आहे, त्याने काही पत्रकारिता सोडलेली नाही.
रवीशने आज सकाळी आठ वाजता त्याच्या यू-ट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ प्रकाशित करून प्रेक्षकांशी संवाद साधला आहे. त्यामध्ये तो म्हणतोय की, “आज की शाम एक ऐसी शाम है , जहां चिड़िया को उसका घोंसला नज़र नहीं आ रहा , क्योंकि उसका घोंसला कोई और ले गया है . मगर उसके थक जाने तक एक खुला आसमान नज़र आ रहा है.”
रवीशचे हे शब्द खूप उमेद वाढवणारे आहेत. तो कुठेही खचलेला नाही किंवा निराश ही झालेला नाही. तो म्हणतोय, “माझे घरटे जरूर ताब्यात घेतले आहे, मात्र मला त्याबाहेर खूप मोठे आकाश दिसते आहे.”

रवीशच्या हातात आज चॅनल नाही, तरी त्याने राजीनामा दिल्यानंतर व्यक्त केलेली भावना लाखो लोकांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे प्रश्न मांडण्यासाठी, लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्ही मेनस्ट्रीम मीडियातच असले पाहिजे याची गरज आता उरलेली नाही. रवीश हा सध्याचा देशातील ख्यातनाम पत्रकार आहे. त्याच्यासोबत लाखो लोक आहेत. त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या उरावर उभे राहून तो त्याची पत्रकारिता पुढे नेईल यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे रवीशच्या राजीनाम्यावर फार दु:ख करत बसण्याची गरज नाही असं मला वाटते.
मात्र प्रश्न एकट्या रवीश कुमारचा नाही. देशभरात वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या भाषेतील वर्तमानपत्र, न्यूज चॅनलमध्ये काम करणारे अनेक पत्रकार बाहेर पडत आहेत. त्यांना शक्य त्या पद्धतीने स्वतंत्र पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेब पोर्टल, यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते अनेक चांगले विषय हाताळत आहेत. त्यांच्यासोबत समाजाने आज ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.
मेनस्ट्रीम मीडिया तुमचे प्रश्न मांडत नाही, तो गोदी मीडिया बनला आहे अशी तुमची तक्रार आहे ना. मग त्याला पर्यायी, स्वतंत्र पत्रकारिता करणारा सक्षम मीडिया उभा राहतो आहे. द वायर, द प्रिंट, पारी, मोझो, न्यूज लॉंड्रि असे असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. दिल्लीत झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन असो वा सध्या चाललेली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा. त्यांना मेनस्ट्रीम मीडियाने फारशी प्रसिद्धी दिली नाही तरीही ती सर्व भारतीयांपर्यंत पोहचली. वेब पोर्टल, यू-ट्यूब चॅनल या पर्यायी माध्यमांनी ती लोकांपर्यंत पोहचवली.
स्वतंत्र पर्यायी माध्यमांपुढे अनेक आव्हाने आहेत. ती चालवणे, वाढवणे, तग धरून राहणे यासाठीची आर्थिक तरतूद करणे, अपुरी साधने, पुरेसे मनुष्यबळ नसणे, सत्य मांडताना येणाऱ्या धमक्या, खोट्या केसेस, पोलीस कारवाई याला सामोरे जाणे अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. मात्र याला तोंड देत, यातून तावून सुलाखून निघत हे पर्यायी माध्यम येणाऱ्या काळात अधिक भक्कम होत जाईल यात शंका नाही.
त्यामुळे पैशांच्या जोरावर संपूर्ण पत्रकारिता विकत घ्यायला निघालेल्यांना इतकंच सांगावे वाटते की,”तुम्ही शेकडो न्यूज चॅनल, पेपर विकत घ्या पण प्रश्न विचारणारी पत्रकारिता कधीच संपवू शकणार नाही”.
– दीपक जाधव
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – 9922201192
ई-मेल – deepak.jadhav23@gmail.com