पुणे, 29 जानेवारी 2021
कोविडच्या दुसऱ्या लाटेत खाजगी हॉस्पिटलकडून शासकीय दरापेक्षा जास्त बिले आकारून रुग्णांची मोठ्याप्रमाणात फसवणूक करण्यात आली. त्याबाबत जन आरोग्य अभियान व कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती यांच्यावतीने पुराव्यानिशी राज्यशासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आला होता.
आरोग्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग-मुंबई येथे खासगी हॉस्पिटलने आकारलेल्या अतिरिक्त बिलांच्या ऑडीटसाठी 462 तक्रारी जन आरोग्य अभियान व कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीमार्फत दाखल करण्यात आल्या आहेत.

या तक्रारींपैकी सुरूवातीला नाशिक जिल्ह्यातील कोविडमुळे पती गमावलेल्या एका महिला तक्रारदाराला 57000 रुपये हॉस्पिटलकडून परतावा मिळाला. त्यानंतर कोल्हापूरमधील वडील गमावलेल्या तक्रारदाराला 18200 रु. परतावा मिळाला आहे. आणि आता साताऱ्यामधील स्वप्निल कोळी या तक्रारदार नातेवाईकास 20000 रु. परतावा हॉस्पिटलकडून मिळाला आहे.
सर्व तक्रारदारांना आवाहन आहे की आपल्या जिल्ह्यातील जन आरोग्य अभियान व कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांसोबत किंवा वैयक्तिकरित्या हॉस्पिटलच्या हद्दीतील संबंधित जबाबादार अधिकाऱ्यांना भेटावे (सिव्हील सर्जन, वैद्यकीय अधिक्षक, तहसीलदार, महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांच्याकडे) आपल्या तक्रार अर्जाचा तपास करावा व ऑडिट प्रक्रीया जलद गतीने होण्याची मागणी करावी.
ऑडिट प्रक्रीयेदरम्यान तुमचे समाधान झाल्याशिवाय किंवा तुमच्या हातात पैसे, चेक आल्याशिवाय खासगी हॉस्पिटल किंवा संबंधित अधिकारी यांना लिखीत पत्र देऊ नये, काही ठिकाणी तक्रारदारांची अशी फसवणूक होत आहे, याची दखल घ्यावी.
डॉ. अभय शुक्ला, हेरंब कुलकर्णी, जयाजी पाईकराव
जन आरोग्य अभियान व कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती