दीपक जाधव
नर्मदेच्या खोऱ्यात संवाद यात्रेसाठी जात असल्याने काही दिवस मी पुण्यात नसेन परत आल्यावर आपण मीटिंग घेऊयात असं एका मित्राला सांगत होतो. त्यावेळी तो बोलून गेला. “अरे, ते नर्मदा बचाव आंदोलन तर संपले ना, मग आता कशासाठी तिकडे चालला आहे.” त्यावर काही न बोलता स्मितहास्य करून मी तिथून निघालो. मात्र आता परत आल्यानंतर मी तिथे का गेलो होतो, हे नक्की सांगावे वाटतेय.
नर्मदा बचाव आंदोलनाच्यावतीने 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2022 अशी संवाद यात्रा नर्मदेच्या खोऱ्यात आयोजित करण्यात आली होती.
पुण्यातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या साधना दधिच, सुहास ताई, नाशिकचे राष्ट्रसेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते वसंत एकबोटे, शिक्षण हक्क सभेचे अध्यक्ष प्रा. रमेश पाटील, मी आणि आमचा सारथी भावेश असे सहाजण एकत्र या यात्रेत सहभागी झालो. प्रा. शरद जावडेकर सर देखील आमच्यासोबत येणार होते मात्र त्यांची तब्बेत ठीक नसल्याने ते येऊ शकले नाहीत.

देशभरातील अनेक चळवळींचे नर्मदा बचाव आंदोलन हे प्रेरणास्थान राहिले आहे. अनेकदा बातम्यांमधून या आंदोलनाविषयी वाचले होते. मात्र प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन जेव्हा ते आंदोलन बघितले, त्याचा इतिहास प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन समजून घेतला. आंदोलनामुळे तिथल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पातळीवर झालेले बदल पाहिले त्यावेळी त्याची खरी भव्यता अनुभवास आली.
आम्ही बुधवारी रात्री नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पोहचलो. गुरूवारपासून ( दि. 15 सप्टेंबर 2022) नर्मदा खोऱ्यातील संवाद यात्रेला सुरुवात झाली.
नंदूरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील पुर्नवसन झालेल्या आदिवासी कुटुंबियांच्या घरी आम्ही पहिला मुक्काम केला. पुनर्वसन केलेल्या नव्या जागेत त्यांचे जुने कौलारू घर, जसे होते तसेच वसविण्यात आले होते. त्यांना पुनर्वसनामध्ये जमिनीच्या बदल्यात जमीन, गावच्या बदल्यात गाव जसेच्या तसे मिळाले आहे. आदिवासी कुटुंबीयांची घरे शेणामातीची, कौलारू असली तरी खूप मोठी असतात. त्यांचे घर किती रुमचे आहे यावरून मोजले जात नाही तर ते किती वास्यांवर (झाडाचे खोड/मोठे उभे लाकूड) उभे आहे यावरून मोजले जाते. इथून तिथून अगदी छोट्या मंगल कार्यालयांएवढी प्रशस्त अशी त्यांची घरे होती. मूळ गावात जेवढे मोठे त्यांचे घर होते तेवढेच मोठे घर त्यांना पुनर्वसनात देण्यात आले आहे. हा मला बसलेला पहिला धक्का आणि आंदोलनाचे खरे यश होते.

यापूर्वी पुनर्वसन झालेल्या काही वसाहती मी पहिल्या आहेत. तिथला कृत्रिमपणा, छोटी-छोटी खुराड्यासारखी घरे आणि इथले नेटके पुनर्वसन याची तुलना नकळतपणे मी करू लागलो होतो.
धरणांमुळे जी नदी काठची गावे पाण्याखाली जाणार होती त्या आदिवासी कुटुंबियांना सरकार पैशांचा काही मोबदला द्यायला तयार होते. मात्र इथल्या आदिवासींच्या जीवनशैलीमध्ये पैशांच्या देवाण-घेवाणीला खूपच कमी स्थान आहे. इथे खूपच कमी गोष्टींसाठी त्यांना पैसे खर्च करावे लागतात. बाकी सर्व कामे ते सामुदायिकपणे पार पाडतात. मूळ गावी राहताना शेतातील काम असो की घर बांधण्याची कामे, ते सर्व एकत्र येऊन समुदायिकपणे पार पाडतात. इथे त्यांना कुणालाही मजुरी द्यावी लागत नाही. फार फार तर कपडे, तेल-मीठ एवढ्यांचीच त्यांना पैशांद्वारे खरेदी करावी लागत असे.
या आदिवासींचे काही तुटपुंजे पैसे देऊन पुनर्वसन केले असते तर त्यांना भयानक अडचणींना सामोरे जावे लागले असते. ‘समजा शहरात राहणारे प्रशासकीय अधिकारी, आमदार-खासदार यांना त्यांचे पगार, मानधन म्हणून जर युरियाचे पोते दिले तर जशी परिस्थिती निर्माण होईल, तसाच प्रकार आदिवासींना जमिनीच्या बदल्यात पैसे देण्याने उदभवणार होती’. मात्र नर्मदा बचाव आंदोलनाच्या रेट्यामुळे हे टळू शकले.

“लढाई, पढाई, साथ-साथ”चा नारा देत इथल्या दुर्गम भागात नर्मदा बचाव आंदोलनाच्यावतीने जीवन शाळा सुरू करण्यात आल्या. संघर्षातून नवनिर्माण हा आंदोलनाचा नारा राहिला.
सरदार सरोवर धरणामुळे महाराष्ट्र, गुजराथ आणि मध्यप्रदेशातील अनेक गावे आणि तिथे राहणारी शेकडो कुटुंबे विस्थापित झाली. त्या कुटुंबांना त्यांचे हक्क मिळवून गेली 37 वर्षे हा लढा सुरू आहे. आपल्या गावातील कुटुंबांचे यशस्वी पुर्नवसन झाले म्हणजे आंदोलन संपले असे नाही तर आपल्या सोबतच्या लढ्यात उतरलेल्या प्रत्येक गावातील सर्व कुटुंबांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत लढा न थांबवण्याचा निर्धार इथल्या सर्वच लोकांमध्ये पाहायला मिळाला.
आंदोलन म्हटले की, सकाळी 11 वाजता धरणे धरणे, निदर्शने करणे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे आणि दुपारी आपापल्या घरी परतणे असे साधारणपणे आपण पाहतो. मात्र आंदोलन, चळवळ काय असते, त्यासाठीचा संघर्ष काय असतो, सर्वस्व देऊन लढत राहणे काय असते हे पहायचे असेल नर्मदेच्या खोऱ्यात नक्की जायला हवे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे निर्माण होणारे गंभीर प्रश्न या आंदोलनाने सर्वप्रथम पुढे आणले. याची दखल केवळ भारताला नाही संपूर्ण जगाला घ्यावी लागली.

प्रवासात आमच्या सोबत असलेल्या साधना ताई दधिच, सुहास ताई यांनी गेली अनेक वर्षे मेधा ताई यांच्या सोबत नर्मदा बचाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी पुणे ते नर्मदा खोरे अशा अनेक फेऱ्या मारल्या आहेत. आंदोलनाच्यावतीने चालवले जात असलेल्या जीवन शाळेत काही दिवस तिथल्या मुलांना शिकवण्याचे काम ही त्यांनी केले आहे. त्यामुळे गाडीमध्ये चाललेल्या गप्पांमधून आंदोलनाविषयी खूप माहिती मिळत होती. आंदोलनातील गावे, तिथले कार्यकर्ते, त्यांचे योगदान, आंदोलनातल घडलेले थरारक प्रसंग, पोलिसांनी केलेले लाठीमार, जल समर्पण आंदोलन अशा अनेक विषयांवर आम्ही नॉन स्टॉप बोलत होतो. नाशिकमधील राष्ट्रसेवादलाचे सक्रिय कार्यकर्ते असलेले वसंत एकबोटे सर, प्रा. रमेश पाटील हे देखील आपले अनुभव मांडत होते. आंदोलनांविषयी प्रश्न विचारत होते. सलग 5 दिवस आमचा हा गप्पांचा सिलसिला सुरू होता.
संवाद यात्रेत जीवनशाळा, गावभेटी, बैठका, कार्यक्रम, मेळावे यांना उपस्थित राहत होतो. अनेक कार्यकर्ते भेटत होते. त्यांच्या मुलाखती घेत होतो.
महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील पुनर्वसन झालेल्या काही वसाहतींना भेटी दिल्या. काही ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे पुनर्वसन झाल्याचे दिसून आले तर काही ठिकाणी धरणग्रस्त लोकांचे प्रश्न अजून ही जैसे थे असल्याचे दिसून आले.

रेहमत भाई, छोगालाल, गौरीशंकर, महेश, चेतन आदी अनेक कार्यकर्त्यांसोबत आमच्या गप्पांच्या मैफिली रंगल्या. भेटलेल्या कार्यकर्त्याची मुलाखत “तुम्ही या आंदोलनाशी कसे जोडले गेलात” या प्रश्नाने करत असू. त्यावेळी तो कार्यकर्ता ही 20-25 वर्षे मागे भूतकाळ जाऊन आमच्या बोटाला धरून आंदोलन उलगडून दाखवू लागत असे. अशा देशभरातील असंख्य कार्यकर्त्यांच्या योगदानातून हे आंदोलन उभे राहिले. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्यासह देशभरातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. बाबा आमटे यांनी तर यासाठी सलग 10 वर्षे नर्मदा खोऱ्यात मुक्काम ठोकला. गेल्या 37 वर्षात देशाच्या पटलावरील चळवळीतील असे एक ही नाव नाही की ज्यांचा या आंदोलनाशी संबंध आला नाही
अनेक पुस्तके वाचून ही जितके हे नर्मदा आंदोलन समजले नसते तितके या 5 दिवसांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, कार्यकर्त्यांच्या मुलाखती, गप्पा यातून समजले.

धार्मिक लोक श्रद्धापूर्वक नर्मदेची परिक्रमा करतात. यानिमित्ताने आमची ही नर्मदेच्या खोऱ्यात झालेल्या चळवळीची परिक्रमा पार पडली. महाराष्ट्र, गुजराथ, मध्यप्रदेशातील नर्मदेच्या काठावरील गावांना भेटी देऊन आंदोलनात अग्रभागी राहिलेल्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता आले. याला केवळ आंदोलन एवढेच म्हणता येणार नाही, हे तर देशाला शेकडो सक्रिय कार्यकर्ते देणारे विद्यापीठ आहे.

अजून खूप काही मांडायचे आहे, ते सविस्तर लिहिनच. तूर्तास एवढंच म्हणेन की, हे आंदोलन समजून घेण्यासाठी माझ्या तरुणपणीच इथं आलो हे मात्र खूप बरे झाले, कारण इथून मिळाली प्रचंड ऊर्जा आता यापुढे वापरता येईल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था भक्कम करायची, राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलचा चेहरा-मोहरा बदलायचे, खाजगी हॉस्पिटलवर नियंत्रण आणण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न साकार करण्यासाठी ती ऊर्जा नक्कीच कामी येईल.
दीपक जाधव
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – 9922201192