हा ध्वज साम्रज्याचा नाही तर स्वातंत्र्याचे प्रतीक असेल : पंडित जवाहरलाल नेहरू

You are currently viewing हा ध्वज साम्रज्याचा नाही तर स्वातंत्र्याचे प्रतीक असेल : पंडित जवाहरलाल नेहरू

आर. एस. खनके

आपल्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी नुकतीच पूर्ण झाली. आपण 76 व्या वर्षात पदार्पण केले. भारत भर प्रत्येकाने आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आपल्या हाताने तिरंगा सन्मानाने मिरवला. काल 15 ऑगस्टच्या रोजीच इंग्रजी दैनिक दि हिंदूचा जुना अंक त्या प्रकाशनाने ट्वीटर वर उपलब्ध करुन दिला होता तो वाचताना 75 वर्षा पूर्वी आपल्या धुरिनांनी संविधान सभेत स्विकारलेल्या राष्ट्रध्वजाचे अंतरंग आणि त्यामागची प्रेरणा वाचायला मिळते.

या संविधान सभेत नेहरूंचे 40 मिनिटांचे भाषण झाले त्याचा वृतांत तत्कालीन मद्रासच्या दि हिंदू या इंग्रजी दैनिकाच्या 23 जुलै रोजीच्या अंकात संपूर्ण पान भरून छापून आले. त्याचा पूर्ण अनुवाद किंवा त्या संपूर्ण लेखावर भाष्य करणे खूप विस्ताराचे होणार असल्याने त्याचा स्वर व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे.

अंक दिनांक 23 जुलै, 1947 चा आहे. तत्पूर्वी 22 जुलै रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रध्वज प्रारूप प्रस्ताव मांडला आणि सर्वमताने संविधान सभेतील सर्व घटक पक्षांनी अर्धा मिनिट उठून या ध्वजाला स्विकृती देवून त्याचा सहर्ष स्विकार केला. कॉंग्रेसने यापूर्वी स्विकारलेले तीन रंग आणि त्यावर अशोक चक्र अशा स्वरूपाचा राष्ट्रध्वज प्रस्तुत करताना नेहरू सभेला सांगतात की ध्वजावरील चक्र म्हणजे या देशाची प्रदीर्घ परंपरा आणि इतिहासाचा वारसा आहे.

गांधीजींचा चरखा आणि त्या चरख्याचे चक्र यात नाही. हा तिरंगा स्वतंत्र भारताच्या राष्ट्रधवजातून जगाला शांती प्रस्थापित करणारा संदेश असेल अशीच या स्वतंत्र भारताची विदेश नीती असेल. गांधीजींचा चरखा किंवा चरख्यातील चक्र स्विकारले नसले तरी त्यांच्या या प्रतिकाचे मूल्य असाधारण आहे आणि त्यबद्दल ही सभा कृतज्ञ असून गांधीजींना धन्यवाद कळविण्याचा ठराव या सभेत पारित करण्यात आला. त्यावेळी ‘महात्मा गांधी की जय’ चा जयघोष करण्यात आला. या उत्साही वातावरणात नेहरूंनी राष्ट्र ध्वज संविधान सभेला सादर केला.

या अशोक चक्र असलेल्या तिरंग्याचा सन्मान करण्याला आणि त्याचा आदर करण्यात मुस्लीम लीग मागे असणार नाही.असे लीग च्या वतीने सभेत जाहीर करण्यात आले.

यावेळी नेहरूंनी दोन ध्वज संविधान सभेत फ़डकवले. त्यात एक खादीचा आणि एक सिल्कचा ध्वज होता. नेहरूंनी ते जपून ठेवण्याची सूचना केल्यानुसार सदर ध्वजांचे राष्ट्रीय संग्रहालयात जतन करण्यासाठी पाठविण्याचा ठराव पारित करण्यात आला.

या भाषणात नेहरूंनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा संदेश स्पष्ट करुन सांगितला. राष्ट्रध्वजावरील चक्र आणि त्यामागची प्रेरणा समजावून सांगितली. यावेळी हा राष्ट्रध्वज आपणास सुपुर्द करण्याचा बहुमान मला मिळाल्याचे सांगून पुढे आपल्या भाषणात नेहरू म्हणतात की, ‘मला आशा आणि विश्वास आहे की, हा ध्वज साम्राज्याचा नसेल, हा ध्वज साम्राज्यवादाचा नसेल, हा ध्वज वसाहतवादाचा नसेल, हा ध्वज कुणावरही वर्चस्व गाजवणारा नसेल, परंतु हा राष्ट्ध्वज एका स्वातंत्र्याचे प्रतीक असेल, हे स्वातंत्र्याचे प्रतीक केवळ आपल्यासाठीच नाही तर जो कुणी त्याकडे बघेल त्या सर्वांच्या स्वातंत्र्याचे ते प्रतीक असेल.’ या वाक्याला टाळ्यांचा कडकडाट झाला.

भारताचा हा ध्वज जगात जिथे कुठे भारतवाशी जातील त्यांच्या सोबत हा शांतीचा आणि बंधुत्वाचा संदेश देईल. भारताचे लोक, राजदूत आणि मंत्री जिथे जातील तिथे आणि साता समुद्रापार भारतीय जहाजांवरून तो जाईल तिकडे लोकांना बंधुत्वाचा आणि स्वातंत्र्याचा संदेश देईल की भारताला जगातल्या सर्व देशांशी मैत्री हवी आहे. आणि जे स्वातंत्र्याच्या अभावात आहेत भारताला त्यांची मदत करायची आहे.

त्यानंतर डॉ राजेंद्र प्रसाद यांनी जुलै, 30 किंवा 31 रोजी संविधान सभेचे सत्र संपणार असल्याचे आणि त्यापुढील 15 ऑगस्टला ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी या सभेतील लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष सत्ता हस्तांतरित करणार असल्याने त्यादिवशी आपण पुन्हा सर्वजन भेटणार असल्याचे सांगितले.

स्वातंत्र्याचे प्रतीक (Symbols of Freedom)
स्वातंत्र्याच्या प्रतीक असलेल्या या राष्ट्रधवजा बाबत बोलताना नेहरू म्हणतात, ‘ आता आणि या क्षणाला आपण स्वातंत्र्याचे प्रतीक साध्य केलेले आहे. आम्हाला जे स्वातंत्र्य मिळवायचे आहे ते एकूणच अखिल मानव जातीसाठी आहे. स्वातंत्र्य काय आहे, त्यासाठी काय संघर्ष करावा लागतो, आणि तो कधी संपेल? तुम्ही जेंव्हा एक पाऊन पुढे ठेवता तेंव्हाच तुमच्या पदरात काही पडते. त्यावेळी आपले एक पऊल पुढे पडत असते. जो पर्यंत शेवटच्या माणसाचे भावविश्व, मानवी भाव-भावना स्वतंत्र होत नाहीत तो पर्यंत या देशात किंबहुना जगात स्वातंत्र्य असु शकत नाही. जो पर्यंत लोकांत कुपोषण आहे, भूक आहे, लोकांना अंगभर वस्त्र नाहीत.

जीवनावश्यक सुविधा नाहीत, महिला, पुरुष, मुले यांना त्यांच्या मानवी भावविश्व विकासाकरिता पोषक वातावरण नाही, संधी नाही, तो पर्यंत हा देश स्वतंत्र आहे असे म्हणता येणार नाही. हे साध्य करणे सहज सोपे नाही पण आम्हाला त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. येणा-या पिढीला हा मार्ग सुकर होईल यासाठी आम्हाला काम करायचे आहे. स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग प्रदिर्घ आहे. त्यावर चालण्याचा मार्गक्रमण करण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे.’
आज आपण स्विकारलेल्या ध्वजा बद्दल अनेक अंगाने वर्णन झालेले आहे. त्यावर सांप्रदायिक अंगाने देखील पाहण्यात आलेले आहे. पाण या ध्वजात तसे काहीही नाही. एका सुंदर राष्ट्राचे प्रतीक सुंदर असावे असा हा ध्वज झालेला आहे. यात आपल्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या मिश्र परंपरांचा समुच्चय आहे. इतिहासाच्या प्रेरणा आणि शिकवण त्यात आहे.त्यात राष्ट्राचे चैतन्या प्रतीत होते. या ध्वजात व्यक्तीगत जीवनाला आणि राष्ट्रीय जीवनाला मूल्य देणा-या, मनाला उभारी देणा-या चांगल्या बाबी यात आहेत.

शांतीचा संदेश देणारा ध्वज म्हणून त्यावर बोलताना नेहरू म्हणतात की भारताला प्रदीर्घ अंतरराष्ट्रीय कालखंड आहे. जागात जे जे चांगले आहे त्याचा भारताने स्विकार केलेला आहे. चांगली बाब स्विकारताना ती आपली नाही म्हणून भारताने त्याला कधीही त्याज्य मानलेले नाही. हे भारताचे समावेशी सामर्थ्य आहे. ते हजारो वर्षापासून चालत आलेले आहे. अशोकाच्या काळात भारत जगातल्या देशांसोबत नाते ठेवून होता तो साम्राज्य विस्तार करण्यासाठी नाही तर शांतीचा संदेश देण्यासाठी होता. त्यावेळी भारतात येणारे लोकही शांतीचा पाठ आणि शिकवण घेण्यासाठी येत असत. त्या काळाची आठवण आपल्या राष्ट्रध्वजात आहे. आशोक चक्र त्याचे प्रतीक आहे. सतत चलित,गतिमान आणि काळासोबत पुढे पुढे चालत जाण्याचे ते एक प्रतीक आहे.

नेहरूंनी विषद केलेला आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य संकल्पनेचा व्यापक अर्थ आणि राष्ट्रध्वजावरील चक्र निवडीमागील अशोक चक्राचे स्वरुप, प्रेरणा आणि भविष्याचा वेध घेणारी भुमिका आणि त्याला संविधान सभेने दिलेली एकमुखी मान्यता याकडे पाहताना त्यांची राष्ट्रीय आणि वैश्विक भावनेची उंची अत्यंत उत्तुंग प्रतीत होते. मात्र आज 75 वर्षा नंतर आपली व्यवस्था आज ज्या अवस्थेत आहे ते पाहता त्या संविधान सभेने स्विकारलेले स्वातंत्र्याचे आणि राष्ट्रध्वजाच्या प्रेरणेचे मूल्य आपल्याला झेपत असल्याचे म्हणने धारिष्ट्याचे ठरेल अशी स्थिती आहे.

देशाला 1947 पूर्वी राष्ट्रध्वज हातात घेण्याची काय किंमत आपल्या पूर्वजांना मोजावी लागली याची ओळख आजच्या पिढीला इतिहास वाचून होइल पण त्याची अनुभूती नसल्याने त्याची दाहकता मात्र कळणार नाही.

द हिंदूचा हा ऐतिहासिक अंक वाचताना सुरुवातीलाच ध्वज फडकवणे हा शब्द आल्याने ध्वजा रोहन आणि ध्वज फडकवणे यातला फरक लक्षात आला. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश वसाहतवादातून मुक्त झालो म्हणून आपला राष्ट्र ध्वज खांबावर चढवत वर नेला जातो म्हणून त्याला Flag Hoisting म्हणतात तर 26 जानेवारीला स्वत:चे संविधान स्विकारून त्याप्रमाणे आपल्या देशाचे प्रजातंत्र प्रत्यक्षात आले त्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपती जो ध्वज फ़डकवतात त्याला flag unfurling म्हणतात. या दोन्ही समारंभाचे स्थळही आपले निरनिराळे आहे. ध्वजारोहन लाल किल्ल्यावर प्रधान मंत्र्यांच्या हस्ते होत असते त्यावेळी ते देशाला संबोधन करत असतात. तर राजपथावर राष्ट्रपती द्वारे ध्वज फ़डकवण्यात येतो. त्यावेळी भारताचे सैन्य सामर्थ्य आणि लोक परंपरेचे दर्शन याची परेड होत असते. याची ओळख या अंकातील “Pandit Javaharlal Nehru Unfurled the new flag of India on the floor of the Constituent Assembly” या वाक्यातील unfurled या शब्दाला समजून घेताना झाली. तात्पर्य मूळ संदर्भ वाचल्याने आपल्या प्रतीकांचा नेमका शोध आणि बोध होतो याची जाणीव झाली. समाज माध्यमावरील विद्वत ज्ञान प्रसारात त्याचे महत्व आणखी रेखांकित झाले.

आर. एस. खनके
(लेखक माध्यम क्षेत्रातील जाणकार आहेत.)
संपर्क : 9527757577

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply