दि. 7 नोव्हेंबर 2022
दीपक जाधव
भारत जोडो यात्रा आज संध्याकाळी देगलूर येथे महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि संपूर्ण भारत जोडो यात्रेचे मी महाराष्ट्रात मनःपूर्वक स्वागत करतो.
तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून या यात्रेला सुरुवात झाली, तेव्हापासून मी या यात्रेवर लक्ष ठेऊन आहे. या यात्रेत राहुल गांधी कोणत्या मुद्द्यांना हात घालत आहेत, ते खरंच या यात्रेबाबत सिरीयस आहेत का, केवळ काँग्रेस पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी हा खटाटोप सुरू नाही ना हे सगळं मी बारकाईने पाहतो आहे. माझ्या सर्व पडताळणीमध्ये राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेचा सच्चेपणा व खरेपणा सिद्ध झाल्याने याला माझा संपूर्ण पाठींबा जाहीर करतो आहे.
देश वाचवण्यासाठी, देशातील द्वेषाचे राजकारण संपवण्यासाठी, रोजगार, आरोग्य, शिक्षण व महागाईच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी ही भारत जोडो यात्रा निघाली आहे.

न्यायसंस्था, निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय सारख्या संस्था आज दिवसेंदिवस अधिक पक्षपाती बनत चालल्या आहेत. केंद्र सरकार जनतेसाठी कमी आणि उद्योगपतींना जास्त काम करते आहे. लोकांना धार्मिक, अस्मितेच्या राजकारणात अडकवून त्यांची तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता कमी करण्यात आली आहे.
एकेकाळी केंद्रातील असो वा राज्यातील सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारा मेनस्ट्रीम मीडिया आता उलट विरोधी पक्षांना जाब विचारतो आहे, त्यांची टिंगल उडवतो आहे.
विरोधी पक्षातील लोकांना साम-दाम-दंड-भेद-भेद यांचा वापर करून एक-एक करून सत्ताधाऱ्यांच्या कळपात सामील करून घेतले जात आहे. जर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ही जर प्रचंड तणावाखाली येऊन घाबरत काम करणार असतील तर सामान्य माणसाने दाद मागायला यायचे कुठे हा प्रश्न उभा टाकला आहे.
गेल्या 8 वर्षात केंद्रातील सत्तेचा केलेला पुरेपूर वापर, त्यांना उद्योगपतींकडून मिळणाऱ्या प्रचंड देणग्या अशा साऱ्या परिस्थितीत 2024 ची लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता आपण बघ्याची भूमिका घेत राहिलो आणि नंतर 2024 च्या बदलाची अपेक्षा करणार असू तर ते व्यर्थ ठरणार आहे.
‘सामाजिक चळवळीतील लोकांनी आपल्या सामाजिक कामांवरच लक्ष द्यायचे, जाहीर राजकीय भूमिका घेणे शक्यतो टाळायचे’ असा एक मतप्रवाह आहे. मला वाटते सद्य परिस्थितीमध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांनी तो विचार बाजूला ठेऊन ठाम राजकीय भूमिका घेणे आवश्यक बनले आहे.
सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांबरोबरच पत्रकार, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, व्यावसायिक, तरुण-तरुणी, विद्यार्थी अशा प्रत्येकाला आपले जाहीरपणे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी ते आपापल्या पातळीवर ते मांडत राहण्याची गरज आहे.
केंद्रातील दोनच नेते सर्व सत्ता हातात घेऊन जर देशाला अराजकाकडे घेऊन निघाले असतील तर हे आम्हांला मान्य नाही आणि आम्ही हे होऊ देणार नाही असे ठामपणे सांगण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे फॅसिझमच्या विरोधात कन्याकुमारीपासून जम्मूच्या दिशेने निघालेल्या भारत जोडोच्या वादळाला माझा पूर्ण पाठींबा मी जाहीर करतो आहे. शेगाव-बुलढाणा येथे मी या यात्रेत प्रत्यक्ष सहभागी ही होणार आहे.
दीपक जाधव
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – 9922201192