पुणे, 7 एप्रिल 2022
आज जागतिक आरोग्य दिन. नुकतेच कोविडचे सर्व निर्बंध मागे घेण्यात आले असून सर्व जनजीवन पूर्वपदावर येत आहे. याच पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी मिळाली आहे. खाजगी हॉस्पिटलने जादा घेतलेल्या बिलांपैकी 10 लाख रुपयांची रक्कम 40 रुग्णांना परत मिळाली आहे. जन आरोग्य अभियान व कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून हे होऊ शकले आहे.
अत्यंत शक्तिशाली लॉबी असलेल्या व आम्ही कुणालाच उत्तरदायी नाही अशा अविर्भावात असणाऱ्या राज्यभरातील खाजगी हॉस्पिटलना यामुळे एक इशारा यातून मिळाला आहे. कोविड काळात खाजगी हॉस्पिटलकडून लूट झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सामाजिक संघटनांचे पाठबळ उभे राहिल्याने हे होऊ शकले आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत खाजगी हॉस्पिटलकडून शासकीय दरापेक्षा जास्त बिले आकारून रुग्णांची मोठ्याप्रमाणात फसवणूक करण्यात आली. त्याबाबत जन आरोग्य अभियान व कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती यांच्यावतीने पुराव्यानिशी राज्यशासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
कोविड काळात राज्यशासनाने परिपत्रक काढून कोविडच्या उपचाराचे दर निश्चित करून दिले होते. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून राज्यातील अनेक खाजगी हॉस्पिटलने रुग्णांकडून जादा बिलांची आकारणी केली. एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून याबाबतच्या लेखी तक्रारी राज्यभरातून गोळा करण्यात आल्या.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पुराव्यानिशी 462 तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यानंतर त्या तक्रारी संबंधित जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन यांच्याकडे पाठवण्यात आल्या. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून जादा आकारलेल्या बिलांची रक्कम परत करण्यात येत आहे.
सुरूवातीच्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील कोविडमुळे पती गमावलेल्या एका महिला तक्रारदाराला 57 हजार रुपये हॉस्पिटलकडून परतावा मिळाला. कोल्हापूरमधील वडील गमावलेल्या तक्रारदाराला 18 हजार 200 रु. परतावा मिळाला आहे. साताऱ्यामधील स्वप्निल कोळी या तक्रारदार नातेवाईकास 20 हजार रु. परतावा हॉस्पिटलकडून मिळाला आहे. त्यापाठोपाठ राज्यभरातील अनेक शहरांमधून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जादा आकारलेले पैसे परत मिळाले आहेत.

जागल्या वेब पोर्टल हे लोकवर्गणीतून चालवले जाते. सार्वजनिक आरोग्य, उच्च शिक्षण-रोजगार हे विषय येथे प्राधान्याने मांडले जातात. आपण जागल्याचे वर्गणीदार (200 रु, 500 रु,1000 रु) होऊन आमच्या पत्रकारितेला आपले पाठबळ द्यावे. ऐच्छिक वार्षिक वर्गणी, देणगी गुगल पे/फोन पे द्वारे 9922201192 या क्रमांकावर भरू शकता.