कोल्हापूर, 22 एप्रिल 2022
रुग्ण हक्कांची सनद म्हणजे काय, रुग्णांना कोणते अधिकार आहेत, खाजगी हॉस्पिटलकडून पिळवणूक झाली तर कुठे तक्रार दाखल करायची, सरकारी हॉस्पिटल सक्षम होण्यासाठी काय करावे लागेल, हॉस्पिटलकडून मिळणाऱ्या सर्व उपचार सुविधांचे दर जाणून घेण्याचा अधिकार आपल्याला कसा आहे यासह अनेक प्रश्नांची उत्तरे सामाजिक कार्यकर्त्यांना आरोग्य हक्क कार्यशाळेत मिळाली.
पूर्वी या आरोग्य हक्कांची माहिती नसल्याने एक हतबलता आली होती, मात्र या कार्यशाळेनंतर ही हतबलता दूर पळाली असून आता आरोग्य हक्कांसाठी आम्ही एकत्र येऊन काम करू अशी भावना कार्यशाळेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
साथी संस्थेच्यावतीने कोल्हापुरातील शेतकरी कामगार पक्षाच्या सभागृहामध्ये संवाद संस्थेच्या सहकार्यातून आरोग्य हक्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साथी संस्थेचे डॉ. अभय शुक्ला, शकुंतला भालेराव, तृप्ती मालती हरी, विनोद शेंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, संवाद संस्थेचे रवी देसाई, योगेश सनदी, जगदीश गुरव, शेकपाचे चिटणीस भाई बाबुराव कदम यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इचलकरंजी येथे कामगार भवनच्या सभागृहात आरोग्य हक्क समितीच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शाहीन शेख, नागेश काटगी, दत्तात्रय मांजरे आदी उपस्थित होते.
सर्व हॉस्पिटलनी रुग्ण हक्काची सनद व तिथे दिल्या जाणाऱ्या उपचार सुविधांचे दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. त्याबाबतचे परिपत्रक व पुस्तके यांचे वाटप कार्यकर्त्यांना करण्यात आले.

महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद स्तरावर हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी मांडण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतची माहिती यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आली. आपापल्या जिल्ह्यांच्या स्तरावर या समित्या स्थापन होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले.
कार्यशाळेचा समारोप करताना पुढील कामाची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी अभय शुक्ला यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा आपापल्या भागातील आरोग्य विषयक प्रश्नांची माहिती गोळा करावी. त्यानंतर संघटित होऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. आरोग्याचे प्रश्न मांडण्यासाठी त्या त्या भागातील स्थानिक वार्ताहर तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करता येऊ शकेल.

कोविड काळात नागरिकांना अनेक भल्याबुऱ्या अनुभवांना सामोरे जावे लागले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना कोविड काळात आलेले हे अनुभव यावेळी मांडले.
कोल्हापूर, इचलकरंजी पाठोपाठ आरोग्य हक्क कार्यशाळा राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पार पडणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये जागृती घडवून आणून आरोग्य हक्काची चळवळ राज्यभर पोहचवण्याचे प्रयत्न यामाध्यमातून केले जात आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
शकू – 9850254679, रवी देसाई – 9422625675, शाहीन शेख – 8459467975