दीपक जाधव
भारत जोडो यात्रेतून – पातूर, जि. अकोला
कन्याकुमारीपासून निघालेली भारत जोडो यात्रा जशी पुढे सरकत आहे तशी ती अधिकाधिक प्रभावी होत चालली आहे. केवळ या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय म्हणून नाही तर यात्रेत घडत असलेल्या संवाद प्रक्रिया आणि विचारमंथनामुळे ती महत्त्वाची बनत आहे.
भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात पोहचली आहे. यात्रा ज्या राज्यात, जिल्ह्यात जाईल तिथल्या सामाजिक-नागरी चळवळीतील ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांशी राहुल गांधी संवाद साधत आहे. भारत जोडो यात्रा सुरू करतानाच ही केवळ काँग्रेस पक्षाची यात्रा नसून देशभरातील सिव्हिल सोसायटीने यात्रेत सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्याला प्रतिसाद देत देशभरातील अनेक सामाजिक संस्था, संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले आहेत. यातल्या एक-एक कार्यकर्ताने आपापल्या क्षेत्रात, भागात मोठे काम उभे केलेले आहे. त्यांच्यासोबत एकत्र राहणे, सोबत चालणे व गप्पा मारणे याची संधी काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांना मिळत आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात तसेच देशभरात काम करणाऱ्या जन आरोग्य अभियानाच्या कार्यकर्त्यांशी राहुल गांधी यांनी बुधवारी संवाद साधला. डॉ. अभय शुक्ला, काजल जैन, विजया पुसुम, आशा शिरसाठ, सोमेश्वर चांदूरकर यांची भेट घेऊन सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांबाबत राहुल गांधी यांनी चर्चा केली. भाजप सत्तेत असलेल्या गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये सरकारी हॉस्पिटलच्या खाजगीकरणाचा डाव आखण्यात आला आहे. सरकारी आरोग्य व्यवस्था अदाणी सारख्या खाजगी उद्योगपतींच्या ताब्यात जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते याची माहिती गांधी यांना देण्यात आली. काजल जैन यांनी महिलांच्या आरोग्याचे तर विजया पुसुम यांनी आशा सेविकांचे प्रश्न मांडले. यावेळी यात्रेत डॉ. सतीश गोगुलवार, शैलेश ढिकळे, विनोद शेंडे, दीपक जाधव यांनी सहभाग घेतला.

चळवळीतील कार्यकर्ते प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असतात. लोकांशी त्यांचा दररोजचा संबंध असतो. ते ज्या प्रश्नांवर काम करत असतात त्याची तीव्रता, त्यावरचे उपाय याची चांगली जाण या कार्यकर्त्यांना असते. त्यामुळे त्यांच्याबरोबरचा संवाद हा निश्चित महत्त्वाचा ठरणार आहे. देशातला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून येणाऱ्या काळात समाजातले प्रश्न नेमकेपणाने सत्तेपुढे मांडले जाऊन ते सोडवण्याचा लढा तीव्र होण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करायला हरकत नाही.
देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा नेता पायी देश पालथा घालत लोकांना भेटतो आहे. त्यांचे प्रश्न समजून घेतो आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. सलग पाच महिने साडे तीन हजार किलोमीटरचे अंतर चालून जाणे ही तितकी सोपी गोष्ट नाही, हे जेव्हा आपण स्वतः दहा किलोमीटर पायी चालतो तेव्हा समजते. असो, भारत जोडो यात्रेमुळे समाज बदलाचे अनेक दिर्घकालीन अनेक चांगले परिणाम दिसून येतील हे नक्की.
- दीपक जाधव
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – 9922201192
ई-मेल – deepak.jadhav23@gmail.com