भारतीय संविधानाला ‘वारसा’ कुणाचा?

You are currently viewing भारतीय संविधानाला ‘वारसा’ कुणाचा?

तुषार रईसा

भारतीय संविधानाला 75वर्षे पूर्ण झाली. संविधानाबाबत लोकांमध्ये अनेक मत-मतांतरे आहेत. त्यातीलच ‘वारशा’च्या मुद्द्यावर केलेला हा उहापोह…

संविधानाबद्दल (अप)प्रचार
संविधानाबद्दल अनेक वर्षांपासून असा प्रचार आहे की, संविधानात ‘भारतीय’ असे काहीच नाही. विविध देशांच्या संविधानातून ‘कॉपी-पेस्ट’ करून भारतीय संविधान बनले आहे. संविधान बनवण्याच्या वेळीही काही लोक आक्षेप घेत होते की, ‘भारतीय संविधानात मनुस्मृतीतील विचार नाहीत.’ वर्षभरापूर्वी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉयही बोलले की, भारतीय संविधानाला ‘वसाहतवादी वारसा’ आहे. म्हणजे संविधान विदेशी विचारांवर आधारित आहे म्हणून ते बदलायला पाहिजे.


भारतीय संविधानाचा मूळ गाभा हा स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्त्री पुरुष समानता हे आहे. संविधानाला ‘वसाहतवादी’ बोलणे म्हणजे ब्रिटीशपूर्व भारतात हे विचार अस्तित्वातच नव्हते. वास्तव काय?


स्वातंत्र्य-समता-बंधुता मूल्ये कुठून आली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, “जर तुम्हाला वाटत असेल की, मी स्वातंत्र्य-समता-बंधुता ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून शिकलो तर ते अगदी चुकीचे आहे. ही मूल्ये मी तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुल्यांकडून शिकलो.”

भारतातील समतेची परंपरा
1500-2000 वर्षांपूर्वी भारतात अशा अनेक परंपरा अस्तित्वात होत्या ज्यांनी माणसाच्या स्वातंत्र्याचा आणि समतेचा आग्रह धरला.
बौद्ध धम्म, जैन संप्रदाय, महानुभाव, लिंगायत आणि वारकरी संप्रदाय, सुफी परंपरा आदी विविध भक्ती संप्रदायांनी विषमतेविरोधात बंड करुन माणसाच्या स्वातंत्र्याचा विचार मांडला.
अवघी एकाचीच वीण | तेथे कैसे भिन्नाभीन
तुकाराम महाराज म्हणतात आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत, मग भेदभाव कशाला?
संविधानाचे कलम 15 सांगते:  “जाती-धर्म-लिंग-प्रांताच्या आधारे भेदभाव बेकायदेशीर आहे.”

आमचे तुकाराम महाराज 350 वर्षांपूर्वी आपल्याला हेच सांगतात,

सकळांसी येथे आहे अधिकार|कलियुगी उद्धारी हरिच्या नामे
ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य, शुद्र चांडाळाही अधिकार| बाळे नारीनर आदिकरोनी वेश्याही
म्हणजे संविधानाचे कलम 15 आणि तुकोबांचा अभंग एकच गोष्ट सांगतात.

समतेसाठी वैचारिक संघर्ष
माणुसपणासाठीचा संघर्ष येथे फार पूर्वीपासून सुरू आहे. त्याकाळी अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या लोकांना विठ्ठल मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती. असे स्वतः चोखोबा सांगतात,

हीन याती माझी देवा, कैसे घडू तुझी सेवा
मज दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्या रिती
म्हणून सर्वांना भक्तीचा अधिकार मिळावा यासाठी संत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींनी चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तीचा खेळ मांडला. याचे वर्णन तुकोबा करतात,
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे..
क्रोध अभिमान केला पावटणी, एक-एका लागतील पायी रे..


भक्तीच्या या खेळामध्ये कोणी उच्च नसतो कोणी नीच नसतो. यात सर्व एकमेकांच्या पाया पडत एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात. ज्यांच्या सावलीचाही पहिले विटाळ मानला जायचा अशा लोकांना भक्तीच्या या खेळाने ‘माऊली’ बनवले. त्याचप्रकारे भारतीय संविधानही प्रत्येक व्यक्तीला ‘भारतीय’ बनवून समान पातळीवर आणते. अशाप्रकारे संत विचारांचा वारसा संविधानात अनेक ठिकाणी आढळतो.

धर्मनिरपेक्षता
काही लोक म्हणतात धर्मनिरपेक्षता हा भारतीय विचार नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माच्या आधारे शासन/आपण कुणासोबतही भेदभाव करणार नाही. शिवचरित्रातील एक प्रसंग आहे- छ. शिवाजी महाराजांकडे 700 पठाणांची तुकडी चाकरी करायला आली. शिवरायांनी त्यांचे निकटवर्तीय गोमाजी नाईक पानसंबळ यांना सल्ला विचारला.
गोमाजी नाईक पानसंबळ म्हणाले – ‘ज्यांस राज्य करावयाचे, त्याने प्रजेच्या धर्माची चौकशी करू नये’
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सल्ला आयुष्यभर पाळला. छ. शिवाजी महाराजांची स्वदस्तूराची आज्ञा आहे, “ज्याचा जो धर्म त्याने तो करावा, त्यात कुणीही बखेडा खडा करू नये”. छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार धर्मनिरपेक्ष होता.
तरीही आपण धर्मनिरपेक्षतेला ‘विदेशी’ म्हणणार का?

वैज्ञानिक दृष्टिकोण
संविधान म्हणते, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मुळात जाणे; आंधळेपणाने विश्वास न ठेवता स्वत:च्या बुद्धीला पटेल तेच घेणे

गौतम बुद्ध म्हणतात – ‘जर तुमच्या बुद्धीला पटत नसेल तर ती गोष्ट मान्य करू नका; जरी ती गोष्टी मी बोललो असलो तरीही.” हाच तर वैज्ञानिक दृष्टिकोण आहे.
आज मात्र या शिकवणीवरच आपण ‘एक लोटा जल’ टाकून दिले आहे.
एक लोटा जल टाकला तर चीनने कब्जा केलेली आपली जमीन मिळेल का? किंवा मणीपूरचा वणवा थांबेल का?

आपल्या मेंदूचे डोळे उघडण्यासाठी तुकोबा म्हणतात,
नका दंतकथा येथे सांगो कोणी | कोरडे ते मानी बोल कोण ? ||
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार | न चलती चार आम्हांपुढे ||
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी | राजहंस दोन्ही वेगळाली ||

संविधानाने सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोण अंगिकारणे म्हणजे तुकोबांच्या अभंगातील राजहंस बनून सत्य-असत्याला वेगळे करणे होय.
सामाजिक न्याय
शेकडो वर्षे शोषण झालेल्यांना सन्मानाने जगता यावं, यासाठी केलेले ‘विषेश’ प्रयत्न म्हणजे सामाजिक न्याय – याचाही इतिहास शेकडो वर्ष जुना आहे.


शिवाजी महाराजांची स्वराज्याची संपूर्ण कल्पनाच सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर आधारित होती. उपेक्षित रामोश्यांना हेरगिरीचे खाते, महार किल्लेदार, मदारी ‘मेहतर’ गादीचा सेवक; दुष्काळात शेतसारा माफी, गरीब शेतकऱ्यांना औत (नांगर), बी-बीयाणे, बैल देणे; ‘शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका’ अशा अनेक आज्ञा – हे तत्कालीन सामाजिक न्यायच होते. शिवाजी महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणांमुळेच सर्वसामान्य रयत त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार झाली.
शिवाजी महाराजांच्या सामाजिक न्यायाचा वारसा पुढे नेला तो राजर्षी शाहू महाराजांनी. त्यांनी दलित-बहुजनांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. 1902 साली मागासवर्गियांसाठी 50% आरक्षणाचा कायदा केला. इंग्रजांनी ‘गुन्हेगार’ अशा शिक्का लावलेल्या फासेपारधी जमातींतून अंगरक्षक व पहारेकरी नेमले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांची सामाजिक न्यायाची मशाल पुढे तेवत ठेवली. बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेल्या अखंड संघर्षातून त्यांची सामाजिक न्यायाबद्दलची मजबूत बांधिलकी दिसून येते.


भारतीय संविधानाचा पाया हा सामाजिक न्यायाचाच असावा असे गांधींना वाटत होते. त्यामुळे संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असलेच पाहिजेत, असा त्यांनी आग्रह धरला.
मध्ययुगापासून ते आधुनिक भारतापर्यंत अनेक महापुरुषांनी सामाजिक न्यायाची मशाल तेवत ठेवलेली असताना ही संकल्पना ब्रिटीशांकडून प्रसवली गेली, असे म्हणायला काही वाव उरतो का?

लोकशाही
अनेकजण म्हणतात, आपल्याला इंग्लंडने लोकशाही दिली. खरंतर लोकशाहीची पाळेमुळे इंग्लंडमध्ये नसून ती भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढा हा जगातील आजवरचे सर्वात मोठे जनआंदोलन आहे. यात 20% जनतेचा सक्रिय सहभाग होता. या लढ्यात गरीब, श्रीमंत, महिला, दलित, सवर्ण, आदिवासी असे समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोक सहभागी झाले होते. ‘हा देश आपला आहे व आपणच आपले भाग्यविधाते आहोत’- ही त्यामागील ‘लोकशाही प्रेरणा’ होती.


अशा भयावह परिस्थितीपासून लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी आज जाणीवपूर्वक जाती-धर्माच्या नावाने तेढ वाढवली जात आहे. ब्रिटीशांची ‘फोडा व राज्य करा’ नीती राबवून आज देश चालवणारे हेच खऱ्या अर्थाने ब्रिटीशांचे ‘वसाहतवादी वारसदार’ आहेत.

भारतीय संविधानाने राजेशाही कायदेशीररित्या रद्द केली आणि लोकांनाच देशाचे ‘राजे’ बनवले. म्हणूनच संविधानाचे सुरुवातीचे तीन अद्भुत शब्द आहेत – ‘आम्ही भारताचे लोक’…
या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताची तुलनाही बरेच काही सांगून जाते. इंग्लंडचे राष्ट्रगीत आहे – ‘गॉड सेव्ह द किंग’. म्हणजे देवा राजाची रक्षा कर. लोकशाही राष्ट्रात राजेशाही टिकून राहावी यासाठी तिथले लोक रोज प्रार्थना करतात. याच्या अगदी विपरित आहे आपल्या भारताचे राष्ट्रगीत – जन गण मन अधिनायक… म्हणजे इथली जनताच या  देशाची अधिनायक आणि भाग्यविधाता आहे.
कोणी कोणास ‘लोकशाही’ शिकवावी?

मतदानाचा अधिकार
भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याने स्वतंत्र झाल्याबरोबर देशातील सर्व जाती-धर्माच्या प्रौढांना मतदानाचा अधिकार दिला. ज्या लोकांचा आज संविधानाला विरोध आहे, त्याच विचारांची लोकं त्याकाळी सर्वांना मतदानाचा अधिकार देण्यास विरोध करत होती. ‘अज्ञानी लोकांना मतदानाचा अधिकार दिल्यास देशाचे वाटोळे होईल’, असे ते म्हणत. मात्र, गांधी-नेहरू-आंबेडकरांना देशातील जनतेवर प्रचंड विश्वास होता. बलिदान देऊन स्वातंत्रलढा लढणारी जनता आपले प्रतिनिधी सुद्धा निवडू शकते, असा त्यांचा ठाम विश्वास होता. भारतीय संविधानामुळे देशात लोकशाही रुजली. याचाच परिणाम म्हणजे आजही अनेक दुर्गम भागात मोजक्या मतदारांसाठी सुद्धा संपूर्ण मतदान केंद्र उभे केले जाते. यामुळे देशातील जनतेचा लोकशाही वरील विश्वास मजबूत झाला. भारतासोबत जगातील अनेक देश स्वतंत्र झाले होते. पुढे चालून कुठे हुकूमशाही आली तर  कुठे यादवी युद्ध झाले. मात्र भारतात आजही लोकशाही कायम आहे, ती फक्त संविधानामुळेच.

संविधानाने विविधतेचा आदर केला
भारतीय संविधानाने येथील विविधतेचा आदर केला.भारतातजात-धर्म-लिंग-प्रांत-चालीरीती-संस्कृती यांच्या आधारावर जवळपास 4600 विविधता आहेत. कोणासोबतही भेदभाव होणार नाही, सर्वांना समान वागवले जाईल – ही हमी भारतीय संविधान देते. म्हणूनच भारत आजपर्यंत एकसंध राहिला.


युरोपमध्ये बहुतांश देशांमध्ये एकाच धर्माचे लोक राहत असून देखील प्रामुख्याने भाषेच्या आधारे ते देश वेगळे आहेत. विविधतेचा आदर केला नाही तर देश एक राहू शकत नाही, हे पाकिस्तान आणि बांगलादेशच्या फाळणीवरून समजून येते. तत्कालिन पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर उर्दू भाषा लादण्याचा प्रयत्न केला. ज्याचा तेथील लोकांनी विरोध केला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. आपला देश आजवर एकसंध राहिला कारण संविधानाने सर्वांना सामावून घेतले.


मुलांच्या शाळा, महिलांचे अधिकार, दलित, आदिवासी, गरीब, शेतकऱ्यांचे अधिकार – स्वस्त कर्जाची सोय, बाजार समित्या, सहकार क्षेत्र, एसटी बस, सरकारी बँका, एलआयसी, विजेची आणि पाण्याची सोय, सरकारी नोकऱ्या…आपल्या आयुष्याशी जोडलेली प्रत्येक गोष्ट संविधानामुळे आपल्याला मिळाली.कारण लोककल्याणाची धोरणे राबवणे भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र, ज्यांना विषमतेवर आधारित देश बनवायचा आहे त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोककल्याणाचा आग्रह धरणारे भारतीय संविधान नको आहे. त्यामुळेच त्यांना संविधान बदलून टाकायचे आहे. विषमतावादी लोकांनी त्याकाळी तुकोबांची गाथा बुडवली होती, आता त्यांना संविधान बुडवायचे आहे.

मनी’स्मृतीचे पाईक
भारतीय संविधानाला विरोध करणारे हे फक्त मनुस्मृतीचेच नाही तर ‘मनी’स्मृतीचेही पाईक आहेत. आज देश खुलेआम कंपन्यांच्या फायद्यासाठी चालवला जात आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता जीएसटी व महागाईच्या ओझ्याखाली चिरडली जात आहे, तर दुसरीकडे कंपन्यांना लाखो कोटींची करमाफी-कर्जमाफी दिली जात आहे. म्हणूनच विद्यमान सरकारच्या 5% श्रीमंत ‘मित्रांकडे’ देशाची 50% संपत्ती एकवटली. अदानीला 45000 एकर जमीन 10 रु. स्क्वेअर ‘फुटाणे’ देऊन टाकली गेली.
मागील 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी आज आहे, महाराष्ट्रात रोज 6 शेतकरी आत्महत्या करतात. स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही न लागलेला अन्नधान्यावरती टॅक्स आज जनता भरत आहे. वाढती गरिबी लपवण्यासाठी सरकारने गरिबी रेषा 60 रुपयावर आणून ठेवली आहे. म्हणजे, रोज 60 रु. कमावणाऱ्या व्यक्तीला आता ‘गरीब’ म्हटले जाणार नाही. अभिनंदन!
“सरकार श्रीमंत-गरीबांमधील आर्थिक दरी कमी करण्यासाठी धोरणे आखेल’ असे सांगणाऱ्या संविधानाची पावलोपावली पायमल्ली केली जात आहे.

निवड आपली
आपल्याला स्वातंत्र्य-समता-बंधुता या त्रिपदीवर आधारीत भारत हवाय की, मनुस्मृती व ‘मनी’स्मृतीच्या दुपायीवर आधारीत भारत हवाय, हा निर्णय येत्या काळात आपल्याला घ्यावा लागेल व त्यासाठी कृतीशील व्हावे लागेल.
सत्य हे माणसाला निर्भय बनवत असते. चला, निर्भय बनून ही परिस्थिती बदलण्यासाठी विचारांचा जागर करूया आणि समाज परिवर्तनाच्या ‘वारी’चे आपणही वारकरी होऊया
काय करु आता धरुनिया भीड | नि:शंक हे तोंड वाजविले ||
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण | सार्थक लाजून नव्हे हित ||

तुषार रईसा
(लोकायत संघटनेचे कार्यकर्ते आहेत)
संपर्क :- 7709508954



जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply