बारामती, दि. 13 जून 2022
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व कुटुंबियांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली जाते. या योजनेचा लवकरच विस्तार करण्यात येणार असून अधिकाधिक रुग्णांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी त्यामध्ये आमूलाग्र बदल केले जाणार आहेत.
महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने दिनांक १२ मे २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे राज्यस्तरीय जन आरोग्य परिषद पार पडली. या बैठकीमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेबाबत राज्यभरातून आलेल्या डॉक्टर, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले विचार मांडले होते.
त्याआधारे पुढील कृती कार्यक्रम ठरवण्यासाठी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र येथे ११ व १२ जून 2022 रोजी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाचा (पांढरे, केशरी व पिवळे आदी सर्व रेशनकार्डधारक) दीड लाख रुपयांचा विमा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये राज्य शासनाने काढला आहे. यानुसार विविध 935 आजार व रोगांवर खाजगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये दीड लाखांपर्यंत मोफत उपचार महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकास घेता येतो. या योजनेबाबत काहीही माहिती हवी असल्यास 155388 या टोल फ्रि क्रमांकावर 24 तास उपलब्ध करून देण्यात आली आहे. 11 व 12 जून 2022 रोजी बारामतीमध्ये या योजनेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून येत्या काळात या योजनेचा आणखी विस्तार राज्य शासनाकडून केला जाणार आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सुधारणा आणि सेवांची उपलब्धता या विषयावर सखोल चर्चा व विचारविनिमय या कार्यशाळेत करण्यात आला. यामध्ये रुग्णांच्या समस्या, प्रशासकीय पातळीवरील हॉस्पिटलचे प्रश्न, आर्थिक तरतूद व त्यासाठी पात्रता, आणि योजनेची संरचना तसेच लोकसहभागातून जाणीव जागृती, देखरेख अशा विविध विषयांवर महत्त्वपूर्ण मसुदे दोन दिवसांच्या कार्यशाळेमध्ये मांडण्यात आले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून सदरील योजनेमध्ये राज्य शासनास द्यावयाच्या सूचना, संरचनेतील आवश्यक बदल, राज्याचे सर्वंकष आरोग्यविषयक धोरण व त्याचबरोबर जनजागृती या विषयावर विस्तृत चर्चा होऊन लवकरच केंद्र व राज्यशासनास मसुदा सादर करण्याचा प्रयत्न आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा देखील या उपक्रमात सहभाग आहे.