पुणे , दिनांक 2 मार्च 2025
कस्तुरबा वसाहत येथे 1 मार्च 2025 रोजी संध्याकाळी मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्यावतीने जागल्या वंचितांचे नाटक हा प्रयोग सादर करण्यात आला. वस्तीतील महिला व लहान मुलांनी स्वतः नाटकांमध्ये सहभागी होऊन याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जागल्याच्यावतीने Theatre of the oppressed (वंचितांचे नाटक) चा सादर करण्यात आलेला हा तिसरा नाट्यप्रयोग आहे. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येत्या वर्षभरात 75 प्रयोग करण्याचा मानस जागल्याच्यावतीने व्यक्त करण्यात आला.

नाटकाच्या सादरीकरणात दीपक जाधव, आशिष तिखे, अपूर्वा तिखे, अर्चना ढोले, विश्वास नाडे, वैष्णवी पाटील यांनी सहभाग घेतला.
संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले, सुदर्शन वडावराव, सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई पुलावळे, सिद्धी निगोट, श्रद्धा आणि अक्षता महापुरे, संगीता चव्हाण अनुपमा कदम, छबूबाई घडसिंग यांनी भाग घेतला. संस्थेचे सविता भातांबरे आणि सुप्रिया शिंदे यांनी आयोजनात मदत केली.
दारूचे दुष्परिणाम व मासिक पाळी बाबतच्या अंधश्रद्धा या विषयावर नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकाच्या संकल्पने प्रमाणे अर्धे नाटक जागल्याच्यावतीने सादर करून थांबवण्यात आले. त्यानंतर उपस्थित महिला, लहान मुले यांनी पुढे येऊन नाटक पूर्ण केले.
पहिल्या नाटकात दारू पिऊन नवरा घरी आल्यानंतर भांडणाला सुरुवात झाल्याचे चित्र दाखवून तिथे ते थांबवण्यात आले. त्यानंतर उपस्थित मुलांना पुढे येऊन दारू पिऊन आलेल्या व्यक्तीच्या बायकोची भूमिका करायला पुढे बोलावले गेले. त्यानंतर महिलांनी पुढे येऊन दारूचे दुष्परिणाम मांडणारे अनेक तारखेत मुद्दे मांडले. त्याचबरोबर लहान मुलांनीही यात सहभाग घेऊन दारूचे नकारात्मक परिणाम सांगितले.

दुसरे नाटक तसे मासिक पाळी सारख्या अवघड विषयावरचे होते. पहिल्यांदा पाळी आलेल्या मुलीला घरातील प्रथेनुसार चार दिवस एका कोपऱ्यात बसवले जाते. तिला या चार दिवसात घरातील कोणत्याही वस्तूला हात लावण्यास मनाई करण्यात येते. या काळात तिची शाळा बंद करण्यात येते. या टप्प्यावर नाटक थांबते. त्यानंतर उपस्थित महिलांनी पुढे येऊन मासिक पाळी बाबतच्या या अंधश्रद्धा कशात चुकीच्या आहेत याबाबत अत्यंत तार्किक आणि महत्त्वाची मांडणी केली.
(वंचितांच्या नाटकाचा प्रयोग आपल्या वस्तीत, सोसायटीत, शाळा कॉलेजमध्ये सादर करायचा असल्यास दीपक जाधव – 9922201192, आशिष तिखे – 8087893008 यांच्याशी संपर्क साधावा)