
दीपक जाधव
महाराष्ट्र टाइम्समध्ये श्रीकृष्ण कोल्हे यांनी आज एक अंगावर काटा आणणारी बातमी दिली आहे. एका 5 वर्षाच्या बाळाला शॉक लागल्याने त्याला त्याचे आई-वडील ससून हॉस्पिटलला घेऊन गेले. बाळाला ऍडमिट करून घेतल्यानंतर दुपारी 3 पासून 6 वाजेपर्यंत बाळावर कुठलेच उपचार करण्यात आले नाहीत. डॉक्टर येतील असे सांगून कोणत्याही उपचारविना बाळाला तसेच ठेवण्यात आले. बाळ मान टाकून देऊ लागले, तिथल्या डॉक्टरांना सांगून ही त्यांनी लक्ष दिले नाही उलट खाजगीमध्ये घेऊन जा असा सल्ला दिला. त्यामुळे अखेर त्यांनी बाळाला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.
खर तर ससूनवर टीका करायची नाही असे ठरवलेले आहे. कारण त्यामुळे लोकांमध्ये ससूनबाबत नकारात्मक प्रतिमा तयार होते आहे, ती टाळायचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे. तिथल्या यंत्रणेशी सहकार्य, संवाद साधायचा असे ठरवले आहे.
पण जेव्हा अशा बातम्या समजतात तेव्हा या मुर्दाड, असंवेदनशील यंत्रणेवर हल्ला चढवण्याशिवाय पर्याय नाही असेच वाटते. यापुढे चांगले काम करणाऱ्या डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहीन. पण कामचुकारपणा करून लोकांचे जीव घेणाऱ्या डॉक्टरांना मात्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सर्व कायदेशीर पर्याय वापरू. अर्ज, तक्रार, निवेदने, कोर्टात याचिका हे सगळं करु.
हा, ससूनवर लक्ष ठेवण्यासाठी खासदार, आमदारांची एक समिती असते. आमचे खासदार गिरीश बापट, प्रकाश जावडेकर, आमदार सुनील कांबळे, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, चेतन तुपे , सुनील टिंगरे, नीलम गोऱ्हे हे काही करणार आहेत का. पुण्याचे लोकप्रतिनिधी म्हणून ससूनकडे लक्ष देणे हे त्यांचे काम आहे हे त्यांना माहीत आहे का?
दुसरे, हाफकीन फेम आरोग्य मंत्री तानाजी सावंत एक दिवसांचा स्टंट करून निघून गेले. इथल्या सुधारणेसाठी पुढे काही पावले त्यांनी उचलली आहेत का?
मुख्य म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना या अंतर्गत येणारी कंत्राटे, ठेके देण्यातून या कामासाठी वेळ मिळेल का?
पुण्याचे खासदार होऊ इच्छित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आपण ही लक्ष द्यायला हरकत नाही. केवळ पुणेच नाही तर राज्यातील सगळी सरकारी हॉस्पिटल चांगली करण्याचे धोरण ठरवणे हे तुमचे कर्तव्य आहे.
बाकी तुम्ही कधी सुधारायचे ते सुधरा, आम्ही मात्र याबाबत वेळोवेळी बोंब मारत राहूच. आरोग्य हा राजकीय मुद्दा बनवून तुम्हांला निवडणुकीत पराभूत करण्याचे हे प्रयत्न करू.
- दीपक जाधव,
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – 9922201192
एक राहिले Mangesh Chivate,
मंगेशजी तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरी नेहमी जात येत असता, वैद्यकीय कक्ष सांभाळता, मुख्यमंत्र्यांचे व्हिडीओ काढता तेव्हा वेळ मिळेल त्यावेळी त्यांना जरा इकडे लक्ष घालायला सांगाल.