पुणे : दि. 20 मे 2022
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भ्रष्टाचार आणि बजबजपुरी माजलेली आहे. एका बाजूला विद्यापीठ प्रशासन पैशाची कमतरता असल्याचे सांगत विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी शुल्क आकारणीचे प्रस्ताव समोर ठेवते, विद्यार्थ्यांची फी तीनपटीने वाढवते आणि दुसर्या बाजूला विद्यापीठाचा निधी खुद्द कुल सचिवांच्या ऐशोआरामासाठी बेकायदेशीरपणे निर्णय घेऊन परस्पर उडवला जातो हे आता राज्य सरकारने केलेल्या चौकशीमध्ये समोर आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी विद्यापीठ फंडातून गेली तीन वर्षे घेतलेली दरमहा ५० हजार रूपयांची वेतनवाढ बेकायदेशीर असल्याचे उच्च शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. डॉ. प्रकाश बच्छाव शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य यांनी याबाबत दिनांक ५/४/२०२२ रोजीच्या जावक क्र. युएनआय / २०१९ / कुलसचिव-वेतनसंरक्षण / साफुपुवि/विशि-१/ अन्वये पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना कळवलेले आहे.
या पत्रात डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याबद्दल “अनुज्ञेय नसलेल्या वेतनाचे लाभ संबंधितांना शासनाकडून अथवा विद्यापीठ निधीतून देय ठरत नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम ८(१) (ख) नुसार कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेली विनंती मान्य करता येणार नाही” असे शासनाने कळविले.

मात्र मागील कुलगुरू नितीन कळमकर यांची डॉ प्रफुल्ल पवार यांच्याशी हातमिळवणी असल्याने डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर कोणतीही कारवाई कुलगुरूंनी केली नव्हती. नवीन कुलगुरू यांनी आता पुणे विद्यापीठामध्ये भ्रष्टाचाराची सफाई करणारे अभियान राबवावे अशी मागणी करत काल आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त प्रभारी कुलगुरु डॉ कारभारी काळे यांची भेट घेतली.
विद्यापीठाच्या १८ लाखाहून अधिक जास्त निधीचा थेट अपहार ही बाब अत्यंत गंभीर बाब असून संबंधित रक्कम कुलसचिवांकडून वसूल करण्यात यावी. तसेच, याप्रकरणी विद्यापीठ निधीचा अपहार केल्याबद्दल योग्य ती दंडात्मक कारवाई व्हावी. तसेच विद्यापीठ निधी अपहारा बद्दल डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी काल आम आदमी पक्षाच्या वतीने नवनियुक्त कुलगुरू डॉ कारभारी काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे, या प्रकरणाला उजेडात आणणारे पत्रकार दीपक जाधव, विद्यानंद नायक, प्राध्यापक सुहास पवार, रोहन रोकडे, आर्चबिशप सिन्हा उपस्थित होते.
नवीन कुलगुरूंना त्यांच्या वाटचालीबद्दल यावेळी आम आदमी पक्षाने शुभेच्छा दिल्या आणि पुणे विद्यापीठात भ्रष्टाचाराच्या सफाईचे अभियान राबवावे अशी मागणी केली. डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर विद्यापीठ प्रशासनाने कारवाई केली नाही तर आम आदमी पक्ष याबाबत तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.