सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी आंदोलनातील एक दिवस

You are currently viewing सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी आंदोलनातील एक दिवस

दीपक जाधव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ…दि. 11 जुलै 2022, सोमवार….सकाळपासूनच पाऊस धो, धो कोसळत होता. तरीही या पावसाची तमा न बाळगता एक-एक करत शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी मुख्य इमारतीजवळ जमा झाले. शुल्कवाढी विरोधातील आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन करण्यामागची भूमिका सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी मांडली. त्यानंतर डफ वाजू लागला, घोषणा सुरू झाल्या, अधून-मधून चळवळीची गीत म्हटले जाऊ लागले.

हे पाहून खूप बरं वाटलं, विद्यापीठाचे विभाग, भिंती, झाडी-झुडपी, बगीचे यामध्ये पुन्हा नवे चैतन्य निर्माण झाल्याचे जाणवले. कोविड नंतर तीन वर्षे विद्यापीठ जवळपास बंद राहिले. त्यानंतर कॅम्पस सुरू झाल्यानंतर होत असलेले हे पहिले मोठे आंदोलन. त्यामुळे याचे महत्त्व जरा अधिकच वाटले.

तशी विद्यापीठाला आंदोलने नवी नाहीत. मी गेली 16 वर्षे विद्यापीठातील शेकडो आंदोलने पाहिली आहेत. त्यातल्या काही आंदोलनात विद्यार्थी म्हणून सहभागी झालोय. काही आंदोलने पत्रकार म्हणून कव्हर केली आहेत. गरज पडली तर माजी विद्यार्थी म्हणून काही आंदोलनात विदयार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा ही राहतोय.

मुलांनी प्रशासनाकडे मागण्या करणे, त्यानंतर प्रशासनाने त्यातल्या थोड्या-बहुत तसेच शक्य त्या मागण्या मंजूर करणे. इतपतच सीमित ही आंदोलन असतात का? तर बिलकुल नाही. ही आंदोलन खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवणारी प्रशिक्षण शिबिरे असतात. सिनिअर विद्यार्थी आपल्या ज्युनिअर मित्र-मैत्रिणींना सोबत घेऊन आंदोलनाची दिशा ठरवतात. या आंदोलनातून ते कितीतरी गोष्टी शिकतात. प्रशासनाला निवेदने पाठवत, त्यांच्याशी चर्चा करत संवाद ठेवायचा. पत्रकारांशी संपर्क करायचा, त्यांना प्रेसनोट करून पाठवायची, सर्वात मुख्य म्हणजे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी गोळा करायचे. (प्रश्न जरी हजारो विद्यार्थ्यांशी संबंधित असला तरी आंदोलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तशी त्यातुलनेत कमीच असते.) त्यामुळे पुढाकार घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा नेहमीच कस लागतो.

आंदोलनात सहभागी होणं हा अनुभव खूप समृद्ध करणारा असतो, मात्र अनेकांना तो अजूनही रिकाम्या लोकांचा उद्योग वाटतो. मी विद्यापीठात नवीन नवीन आलो तेव्हा मलाही एका मित्राने सल्ला दिला होता की, “विद्यापीठात आणि पुणे शहरात सतत बरीच आंदोलन चालतात, तू या आंदोलनांपासून जरा दूरच रहा बरं”

अर्थात मी त्या मित्राचा सल्ला कधीच मानला नाही. एक पत्रकार म्हणून पुण्यातल्या अनेक आंदोलने, चळवळी यांच्याशी माझा संबंध आला. त्यांचे प्रश्न प्राधान्याने मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या पातळीवर केलाच. त्याचबरोबर पुढे जाऊन त्यातल्या काही चळवळींशी मी स्वतःला जोडून ही घेतले.

काल दिवसभर आंदोलनातील मित्र-मैत्रिणींसोबतच थांबलो होतो. प्रशासनातील पदाधिकारी येऊन भेटून गेले. चर्चा सुरू आहे. दिवसभरातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना म्हणजे, विद्यापीठातील सावित्रीबाई फुले प्राध्यापक संघटनेने विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढ कमी करण्याच्या मागणीला पाठींबा दिला आहे. यापूर्वी विभागातील काही प्राध्यापक आंदोलन मागे घ्यावे म्हणून विद्यार्थ्यांवर दबाव टाकायचे, आता मात्र त्यांची संपूर्ण संघटना ठामपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहते आहे हे चित्र खूपच आल्हाददायक आहे.

विद्यार्थी आता सजग आणि जागृत होत आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनातील अधिकारी कोटीने अनावश्यक खर्च करत आहेत, मोठ्याप्रमाणात गैरप्रकार सुरू आहेत. याची चांगली जाणीव विद्यार्थ्यांना झाली आहे. त्यामुळे त्यांची दिशाभूल करणे आता प्रशासनाला शक्य नाही.

लोकायत, काँग्रेस, आम आदमी पार्टी अशा अनेक संस्था संघटना विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय आता पर्याय नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनावर पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेतील एक तरुणी सध्या पुण्यात आली आहे. ती काल विद्यापीठात भेटली. मी तिला विचारले, इतकं न्यूयॉर्कवरून पुण्यात येऊन इथल्या विद्यार्थी आंदोलनांचा अभ्यास करावा असे तुला का वाटले. ती म्हणाली, “भारतात जी आंदोलने होत आहेत, त्याविषयी जाणून घ्यायला अमेरिकेतील लोकांना कायम उत्सुकता वाटते. अमेरिकेतील विद्यार्थी आंदोलने 60-70 च्या दशकातच संपली. त्यामुळे पुणे विद्यापीठासारख्या ठिकाणी जी विद्यार्थी आंदोलने होत आहेत, ती आम्हांला खूप महत्त्वाची वाटत आहेत. त्याचा अभ्यास करणे आम्हांला आवश्यक वाटतो आहे.”

तिच्या या उत्तराने मी स्तब्ध झालो. म्हटलं, अरे आम्हांला तर याची पुसटशी ही जाणीव नाही. आंदोलने, चळवळी हा आपला खूप मोठा ठेवा आहे, तो जपावाच लागणार आहे.

दीपक जाधव,
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – 9922201192
ई-मेल – deepak.jadhav23@gmail.com

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply