मुंबई, दि १६ जुलै 2022
देशातील महागाई मुळात प्रचंड प्रमाणात वाढत असतांना, जीवनावश्यक वस्तूंवर ‘जाचक जीएसटी’ लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात राज्यातील व्यापारी, दुकानदार रस्त्यावर उतरले असून, संघर्ष करीत आहेत. या संघर्षात राज्यातील काँग्रेस त्यांच्या सोबत आहे. या आंदोलनास काँग्रेसचा पाठींबा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे.
देशात सध्या महागाई वाढत आहे, त्यात पुन्हा बेरोजगारी दर वाढत आहे. भाजप सरकारने पेट्रोल -डीझेल एक्साइज कर कित्येक पटीने वाढवले असून, जनतेची लुट चालू आहे. पुन्हा घरगुती गॅस दरवाढ चालूच असून, विज दर देखील राज्यातील भाजप सरकारने वाढवले आहेत. त्यामुळे गरीब – मध्यमवर्गीयांचे आर्थिक बजेट कोलमडते आहे.

केंद्र सरकार परकीय वस्तू, ऊत्पादनांना ‘रेड कार्पेट’ टाकत असून, आयात प्रचंड वाढत आहे व तुलनेत निर्यात कमी होत आहे. बँकांचे कोट्यावधींचे घोटाळे पुढे येत असून, देशाचा पैसा व संपत्ती घेऊन पसार झालेल्यांना केंद्र सरकार अद्यापही पकडू वा आणू शकलेली नाही.
परीणामी, देशाची आर्थिक स्थिती कोलमडत असल्यामुळे अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी केंद्र सरकार आता सामान्यांच्या जीवावर उठले असून, देशात प्रथमच जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी रूपाने ‘झिजीया कर’ लावून, सामान्यांना लुटण्याचे कुकर्म मोदी-शहांचे केंद्र सरकार करत आहे.
जीवनावश्यक अन्नधान्य-वस्तुंवरील ५% दीसणारा जीएसटी अंमलबजावणीत नागरीकांपर्यंत पोहोचतांना ८-१० % पर्यंतची झळ सर्व सामान्यांना पोहोचणार असल्याने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस या तुघलकी जीएसटी आकारणीचा तीव्र निषेध’ करत असल्याचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले आहे.
