नाटक सादरीकरणानंतर महिलांना अश्रू अनावर

You are currently viewing नाटक सादरीकरणानंतर महिलांना अश्रू अनावर

दीपक जाधव

पुणे : शोषितांचे नाटक (Theatre of the oppressed) म्हणजे अभिनयात कुशल लोकांऐवजी सामान्य माणसांनी केलेले नाटक. आमचे प्रश्न आणि त्याची उत्तरे आम्हीच आमच्या नाटकातून मांडू आणि त्याची अंमलबजावणी करू असा संदेश देणारे हे माध्यम. पुण्याच्या इंदिरा वसाहत मध्ये आज याचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला.

इंदिरा-कस्तुरबा संविधान अभ्यास गटाच्या वतीने इंदिरा वसाहत येथे आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सामाजिक सलोखा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नाटक, गाणी आदी सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून ही परिषद घेण्यात आली.

Power of theater या ग्रुपच्यावतीने दारूचे दुष्परिणाम यावर शोषितांचे नाटक (theatre of the oppressed) सादर करण्यात आले. दीपक, आशिष, अपूर्वा, श्रीकांत, आरती व चैतन्य यांच्या टीमने दारूचे दुष्परिणाम मांडणारे निम्मे नाटक सादर करून ते थांबवले. त्यानंतर त्यावरची उत्तरे काय आहेत हे मांडण्यासाठी प्रेक्षकांना आमंत्रित करण्यात आले. यामध्ये वस्तीतील महिला, पुरुष, लहान मुले व मुली यांनी नाटकात सहभागी होऊन आपली मते मांडली. नाटकातील मुद्दे लोकांच्या मनाला भेदत असल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.

शोषितांचे नाटक याबाबत दीपक जाधव यांनी मांडलेली पार्श्वभूमी
आरोग्य चळवळीचे मुद्दे जास्तीत जास्त लोकांपर्यंत अधिक प्रभावी पद्धतीने कसे पोहचवता येईल याबाबत डॉ. अभय यांच्यासोबत सातत्याने चर्चा सुरू असते. सोशल मीडियावर लांबलचक लिहलेले लोक फारसे वाचत नाहीत. मग एक एक मुद्दा घेऊन पोस्टर तयार करूया असे ठरले, त्यानुसार विधानसभा निवडणुकी दरम्यान एक पोस्टर मोहीम आम्ही राबवली. व्हिडीओ जास्त पाहिले जातात म्हणून ते करावेत याच्या ही चर्चा होत असतात.

दरम्यान पिंपरी चिंचवडच्या गांधी नगर वस्तीमध्ये एका संविधान परिषदेसाठी गेलो होतो. *तिथे कृतार्थ, प्रियपाल यांच्या टीमने Theater of the oppressed (शोषितांचे नाटक) सादर केले. वस्तीतील प्रश्नांना घेऊन हे नाटक होते. यातला खरा मुख्य भाग म्हणजे हे नाटक शेवटी प्रेक्षकांनी येऊन पूर्ण करायचे असा होता. त्यामध्ये लोकांच्या प्रश्नांवरची खरी उत्तरे काय आहेत हे ते लोकच स्टेजवर येऊन मांडतात आणि नाटक संपते.

हे नाटक पाहून मी खूप प्रभावित झालो. चळवळीचे मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे एक माध्यम निश्चित प्रभावी ठरू शकेल असे तीव्रतेने वाटले. मग शोध सुरू झाला या माध्यमाची अधिक माहिती मिळवण्याचा. ब्राझिलियन नाटककार ऑगस्टो बोल हा या नाटक प्रकारचा निर्माता. भारतात हिमाचल प्रदेश येथील संभावना इन्स्टिट्यूटमध्ये या प्रकारचे नाटक कसे करावे याबाबतचे वर्कशॉप घेतले जाते.

मुख्य म्हणजे हे नाटक करण्यासाठी तुम्हांला अभियन करता आलाच पाहिजे असे नाही. केवळ तुम्हांला ज्या विषयावर, प्रश्नांवर नाटक करायचे आहे, त्या विषयावरची समज चांगली असेल म्हणजे झाले* कृतार्थ, प्रियपाल या मित्रांनी याबाबतची माहिती मिळवण्यासाठी खूप मदत केली. कधी एकदा हिमाचलला जातो आणि हा नाटक प्रकार मुळातून समजून घेतो असे झाले होते.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात याबाबतचे वर्कशॉप असल्याचे समजले, तातडीने त्यासाठी अर्ज वगैरे करण्याची प्रक्रिया पार पडली. माझा यातला उत्साह व जाणून घेण्याची इच्छा पाहून संयोजकांनी छोटी स्कॉलरशिप देऊन या वर्कशॉपसाठी निवड केली.

विधानसभा निवडणुकीत आरोग्य हा राजकीय मुद्दा बनावा यासाठी जन आरोग्य अभियानाच्या माध्यमातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यानंतर लागलेला निकाल हा खूपच धक्का देणारा होता. हा धक्का पचवून, निवडणुकीचे सर्व विचार बाजूला ठेवून 24 नोव्हेंबर 2024 ला झेलम एक्सप्रेसमध्ये बसलो. दोन रात्र व एक संपूर्ण दिवस असा 36 तासांचा प्रवास करून पठाणकोट स्टेशनवर उतरलो. तिथून बसने पालमपूर (हिमाचल प्रदेश) गाठले. अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेल्या संभावना इन्स्टिट्यूटमध्ये हे वर्कशॉप होते.

केवळ ज्यांना अभियन करता येतो त्यांनीच नाटक करायचे असते हा इलिट एप्रोच इथे तुमच्या डोक्यातून पहिल्यांदा काढून टाकला जातो. अगदी कोणीही नाटक करू शकते. शोषितांचे प्रश्न सोडवण्याची उत्तरे कुणी तज्ज्ञांनी मांडण्यापेक्षा लोकांनीच ती एकत्र येऊन मांडावीत असे हे नाटक सांगते.

हा वर्कशॉप करण्यासाठी केरळ, तेलंगणा, दिल्ली, काश्मीर, पंजाब तसेच महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक अशा विविध ठिकाणांहून मित्र-मैत्रिणी आले होते. एक नवे माध्यम शिकून पुण्याला परतलो आहे. याविषयी वेळोवेळी आणखी लिहीत राहीन. *मुख्य म्हणजे कृतार्थ, प्रियपाल, आशिष, अर्पिता, राहुल, अभिलाषा यांच्या मदतीने येणाऱ्या काळात हे नाटक महाराष्ट्रात सर्वदूर घेऊन जायचे आहे. गावात, वस्त्यांमध्ये, सोसायट्या, चावडीवर, शाळा-कॉलेजमध्ये हे पोहचवायचे आहे.

दीपक जाधव,
संपादक, जागल्या वेब पोर्टल
आरोग्य हक्क कार्यकर्ता, पुणे
संपर्क – 9922201192

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply