तळेगाव दाभाडे, 12 नोव्हेंबर 2022
रूग्ण सेवेकडे व्यवसाय म्हणून न बघता रूग्ण सेवेचे पवित्र कार्य म्हणून बघावे, पैसा कमविणे हा त्याचा उद्देश कधीच नसावा तसेच मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे हे भविष्यातील मोठे मेडिकल हब व्हावे असे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. येथील तळेगाव जनरल हॉस्पिटल आणि काॅन्व्हलसंट होम यांचा संयुक्त उपक्रम म्हणून नव्यानेच सुरू झालेल्या कॅन्सर सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार कृष्णराव भेगडे उपस्थित होते. तसंच माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार दिगंबर भेगडे, आमदार सुनील शेळके, जनरल हॉस्पिटलचे अध्यक्ष गणेश खांडगे,बापूसाहेब भेगडे,रमेश साळवे, वृषाली राजे दाभाडे सरकार, डाॅ कृष्णकांत वाढोकर,डाॅ संजीव कडलास्कर,डाॅ सुचिता नागरे, डाॅ. किरण देशमुख,हेमंत सरदेसाई व परिवार,रूपाली दाभाडे,गणेश काकडे,जनरल हॉस्पिटलचे सर्व पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, रूग्ण सेवा हे व्रत मानून भाऊसाहेब सरदेसाईंनी जनरल हाॅस्पिटलची पायाभरणी केली. आणि माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी हा वारसा समृध्दपणे पेलत या कामाला वैभव मिळवून दिले.मलाही राजकारणात कृष्णराव भेगडे व मदन बाफना यांचे मिळालेले मार्गदर्शन मौलिक होते. आजही तळेगावाच्या अस्मिता असलेल्या चारही मोठ्या संस्था नावारूपाला येण्यास भेगडे साहेबांचे मोठे योगदान आहे असे गौरवोद्गार अजित पवार यांनी काढले.
वैद्यकीय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन हा निकोप आणि सजग असायला हवा. चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार, विहार,विचार,व्यायाम यांची सांगड घालून जगणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा मौलिक सल्ला यावेळी पवारांनी उपस्थितांना दिला.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी मावळ परिसरातील जनतेच्या फायद्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये व्हावी अशी मागणी यावेळी केली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तळेगाव जनरल हाॅस्पिटलचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले. यावेळी बोलताना खांडगे म्हणाले की,कृष्णराव भेगडे साहेबांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांच्या वाटेवर चालताना आनंद होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल हॉस्पीटल हे अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण कसे होईल याकडे विशेष लक्ष देण्याचा मनोदय खांडगे यांनी व्यक्त केला. यावेळी डाॅ प्रतिक सत्यजित वाढोकर, शैलेश शहा, राजेश शहा आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ विनया केसकर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष चंद्रभान खळदे यांनी मानले.