
लेखक निलेश अभंग हे कल्याण येथील व्यावसायिक, लेखक व सामजिक कार्यकर्ते आहे. ते स्वतः जीबीएस आजारातून चार महिने व्हेंटिलेटरवर राहून बरे झाले आहेत. विशेष म्हणजे मुंबईच्या केईएम या सरकारी रुग्णालयाचा या यशात मोठा वाटा आहे. निलेश जीबीएस आजाराबद्दल जनजागृती करण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात करत आहेत.
पुणे व इतर ठिकाणी जीबीएस (Guillain Barre Syndrome) या आजाराचे 127 पेक्षा अधिक रुग्ण सापडल्यामुळे वातावरण तणावाचे आहे. जे रुग्ण व्हेंटिलेटरवर गेलेले नाहीत, फक्त हात किंवा पाय, किंवा हातपाय अधू झाले आहेत, त्यांना फार काळ हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार नाही. त्यांना आयव्हीआयजीचे इंजेक्शन देऊन, आवश्यक इलाज करून दहा-बारा दिवसांत घरी पाठवले जाईल.
त्यानंतर मात्र घरी गेल्यावर आपले जे अवयव अधू असतील तर दुरुस्त करायचे असतील तर त्याला फिजिओथेरपी हा एकमेव उपाय आहे. यामुळे एकुणेक अवयव बरा होऊ शकतो. त्यासाठी रुग्णांना रोज नियमित चांगल्या फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली उपचार घ्यावे लागतील. या काळात रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांना सहकार्य करावे, कारण रुग्ण हा परावलंबी झालेला असणार आहे. त्याची फिजियोच्या दावाखान्यात ने-आण करावी लागणार आहे. मात्र यात रुग्णाने आणि नातेवाईकांनी आळस करू नये, कोणतीही चालढकल करू नये.
कारण आता शरीर अवसानात असते, ताजेताजे असते, स्नायू लवकर प्रतिसाद देतात. मात्र वेळ गेला, चालढकल केली की शरीराचा तो भाग कडक होऊन जातो.
डॉक्टर मंडळी रुग्णालयातून घरी सोडताना घरी फिजिओथेरपी करा, इतकेच म्हणतील, सहज म्हणतील, मात्र त्यांचे हे म्हणणे हलक्यात घेऊ नका.
जर कायमचे अपंगत्व नको असेल तर आताच रुग्णाने आणि नातेवाईकाने वेळ द्यावा, अन्यथा कायमचे अपंगत्व वाट्याला येऊ शकते. अडचण निर्माण व्हायच्या आधीच तीवर इलाज करा. नंतर केलेला इलाज दिलासा देत नाही.

बेडसोर्स टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
तसं तर कोणत्याही बेडवर असलेल्या रुग्णाला (Bedridden) रुग्णाला Bedsores होण्याची शक्यता असते.
बेडसोर्सला मराठीत शय्याव्रण किंवा दाबव्रण म्हणतात. बेडसोर्स ही त्वचा आणि ऊतींची जखम असते. दीर्घकाळ शरीराच्या एकाच भागाला दबाव पडल्याने ही जखम होते. बेडसोर्सला प्रेशर अल्सर आणि डेक्यूबिटस अल्सर अशीही नावे आहेत.
मी पाच महिने बेडवर काढले आहेत, पण मला पाठीला एवढीशी म्हणून जखम झालेली नाही. हे केईएमचा फिजिओ विभाग, माझी आई आणि मामा यांच्यामुळे हे शक्य झाले.
जीबीएसचा रुग्ण बेडवर पडून असल्यास त्यालाही बेडसोर होऊ शकतात. आणि बेडसोर झाला की मुख्य दुखणे बाजूला राहते आणि ह्या जखमा भरण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. ह्यामुळे रुग्णाच्या हालचालींवर खूप नियंत्रण येते. फिजीओथेरपिस्टसना रुग्णांचे नीट व्यायाम घेता येत नाहीत. शिवाय जखमेच्या वेदना त्रासदायक असतात. तर अशा जखमा होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. रुग्णाची बेडवरील जागा कोरडी कशी राहिल, याची काळजी घेतली पाहिजे.

1. रुग्णाची काही वेळाच्या अंतराने कुस बदलली पाहिजे.
2. जीबीएस रुग्णांची कुस रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर्स-फिजियोच्या देखरेखीखाली बदलली पाहिजे. किंबहुना त्यांनी फिजियोकडून कूस कशी बदलायची हे शिकून समजून घेतले पाहिजे, त्यानंतर त्यांच्या देखरेखीखाली सराव केला पाहिजे, नंतरच स्वतंत्रपणे कूस बदलली पाहिजे. कूस बदलणे इतके अवघड का आहे? असे तुम्ही म्हणालच, तर रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्यास त्यांच्या तोंडातून किंवा गळ्यातून ट्यूब घातलेली असते, ती ट्युब व्हेंटिलेटरला जोडलेली असते, ती ट्यूब जर निसटली वा पाईप निघाला तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना शक्यतो फिजियोच्या देखरेखीखालीच रुग्णांची कूस बदलली पाहिजे.
3. शरीराच्या एकाच भागावर दाब पडल्याने ह्या जखमा होतात, म्हणून रुग्णाला कधी पाठीवर झोपवले पाहिजे, कधी डावी कूस, कधी उजवी कूस, कुशीवर ठेवण्याची वेळ रुग्णांच्या ताकदीनुसार-क्षमतेनुसार ठरवली पाहिजे.
4. एकाच ठिकाणी पडून राहिल्यामुळे त्याला शीण आलेला असतो. कूस बदलल्यामुळे रुग्णासोबत काहीतरी ऍक्टिविटी होते, त्यामुळे तो बदल त्याला आनंद देतो.
5. रुग्णाची पाठ कोरडी राहावी म्हणून ती स्वच्छ पुसून त्यावर चांगल्या दर्जाची पावडर लावली पाहिजे.
6. बेडवर एअरबेड अंथरला पाहिजे, त्यामुळे त्वचेवर सारखा ताण राहत नाही. एअरबेड पाठीला मऊ लागतो. रुग्णाला हवेवर तरंगत असल्याचा अनुभव येतो.
– निलेश अभंग, कल्याण
संपर्क – 89766 25695