पुन्हा जागल्याची भूमिका पार पाडण्यास येत आहोत

You are currently viewing पुन्हा जागल्याची भूमिका पार पाडण्यास येत आहोत

पुणे, दिनांक 24 जानेवारी 2025

जागल्या वेबपोर्टलने 26 जानेवारी 2020 ते 15 मे 2023 या साडे तीन वर्षांच्या काळात शिक्षण, रोजगार आणि सार्वजनिक आरोग्य सेवा या विषयांवर महत्त्वपूर्ण वृत्तांकन केले.

जागल्याचे संपादक दीपक जाधव यांनी 2023 मध्ये आरोग्य चळवळीत पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जागल्या वेब पोर्टलचे काम थंडावले होते. साडे तीन वर्षाच्या कारकिर्दीत जागल्याने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे धाडसी पत्रकारिता करणारे हे वेब पोर्टल सुरू राहिले पाहिजे अशी भावना सातत्याने जागल्याच्या मित्र परिवाराकडून व्यक्त होत होती. अखेर त्याला यश आले असून पुन्हा जागल्या आपली भूमिका बजावण्यास सज्ज झाला आहे.

जागल्या वेब पोर्टलची सुरुवात 26 जानेवारी 2020 रोजी कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आली.

नवे व्यवस्थापन मंडळ

जागल्या चालवण्यासाठी नवे व्यवस्थापन मंडळ कार्यान्वित करण्यात आले आहे. एकनाथ जाधव, श्रीकांत मिश्रा, संदीप कांबळे, सतीश पवार, कमलाकर शेटे, संतोष मगर, सुरेश देवढे, सचिन गायकवाड यांचे व्यवस्थापन मंडळ कार्यरत राहील. दीपक जाधव यांनी पुन्हा जागल्याच्या संपादक पदाची जबाबदारी स्वीकारण्यास संमती दिली आहे.  सामाजिक चळवळी, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, सध्या शिक्षण व्यवस्थेत होत असलेले मोठे बदल, विनाअनुदानित कॉलेज-शाळांची सत्य परिस्थिती, रोजगार आदी मुद्द्यांवर जागल्याचा भर असणार आहे. त्याचबरोबर आवश्यक त्या राजकीय, सामाजिक विषयांवरील विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न राहील.

जागल्याची मागील वाटचाल

सुरुवातीच्या टप्प्यात रोजगार या विषयावर जागल्याने लक्ष केंद्रित केले. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, सेट-नेट पात्रताधारक संघर्ष समिती, डीएड बीएड असोसिएशन आदी संघटना आणि त्यांचे प्रश्न जोरकसपणे मांडले. त्यातील अनेक मांडलेले मार्गी लागले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक गैरव्यवहार उजेडात आणण्याचे काम जागल्याने केले. पदनाम गैरव्यवहार, विद्यापीठात प्रवेशासाठी शुल्क, तत्कालीन कुलसचिव यांच्याकडून 50 हजारांचे वाढीव वेतन घेणे, व्यवस्थापन परिषदेचे टेंडर गैरव्यवहार, कमवा व शिका योजनेतील गैरप्रकार, विद्यार्थ्यांचे हॉस्टेल, मेस व कॅन्टीन संदर्भातील प्रश्न जागल्याने मांडले. त्याचा सातत्याने पाठपुरावा देखील केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक गैरव्यवहार जागल्याने उजेडात आणले.

कोविडच्या महासाथीमध्ये जागल्याने सरकारी हॉस्पिटल सक्षम झाली पाहिजेत तसेच खाजगी हॉस्पिटलवर शासनाचे योग्य ते नियंत्रण असले पाहिजे या मुद्द्यांना ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केला. कायद्यातील तरतुदीनुसार सर्व खाजगी हॉस्पिटलनी दरपत्रक लावणे बंधनकारक केले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत जागल्याने लक्ष वेधले. त्यानंतर साथी संस्था, जन आरोग्य अभियान यांच्या माध्यमातून याबाबत राज्यभर मोठी चळवळ उभी राहिली.
तरी पुन्हा एकदा त्याच धडाडीने जागल्याची भूमिका बजावण्यासाठी आम्ही येत आहोत, तरी आपल्या सर्वांचे पाठबळ मिळावे, ही अपेक्षा.

टीम जागल्या, पुणे
संपर्क – 9922201192
Email – mejaglya@gmail.com

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply