महाराष्ट्रातील शहरात, तालुक्यात आणि गावा-गावातही अनेक छोटे-मोठे आका आहेत. धनंजय मुंडे त्यापैकीच एक आका. त्यांनी पाळलेल्या वाल्मिकी कराड आणि टोळीने ज्या पद्धतीचे कौर्य केले ते वृत्तवाहिन्यांवरून काल सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. हे सगळं उजेडात आल्यानंतरही या टोळीचा मोरक्या असलेले धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदावर राहणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब होती.
महाराष्ट्रातील प्रसार माध्यमे, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते या सगळ्यांनी गेले दोन महिने हा विषय लावून धरला, त्यामुळे अखेर आज धनंजय मुंडेंना राजीनामा देणे भाग पडले आहे. या सर्वांबद्दल कृतज्ञता आणि आभार. विशेषत: संतोष देशमुख खून प्रकरणात सर्वाधिक पाठपुरावा करणाऱ्या अंजली दमानिया यांचे विशेष आभार मानू इच्छितो.
अंजली दमानिया या व्यवसायाने पॅथॉलॉजिस्ट असलेल्या एक मुंबईकर महिला. त्या एका सुखवस्तू घरातील आहेत. त्यांचे पती एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. सुखवस्तू घरातील महिलांप्रमाणे चैनीचे आयुष्य जगत स्वतःच्या विश्वात न रमता त्यांनी महाराष्ट्रात आज स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केले आहे.

त्यांनी आतापर्यंत अनेक मंत्र्यांना घरी पाठवले आहे. त्यांचे गैरव्यवहार पुराव्यानिशी उजेडात आणले आहेत. संतोष देशमुख खून प्रकरण घडल्यानंतर प्रत्यक्ष बीडमध्ये जाऊन, तिथे तळ ठोकून या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा त्यांनी केला. धनंजय मुंडे आणि त्याच्या टोळीचे सर्व कारनामे पुराव्यानिशी बाहेर काढण्याचे काम अंजली दमानिया यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खास मित्र व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उजवा हात असल्याने धनंजय मुंडे यांना पूर्ण अभय मिळाले होते. मात्र पाशवी बहुमताने सत्तेवर आलेल्या बेधुंद सरकारला एक महिला सळो की पळो करून सोडू शकते, हे अंजली दमानिया यांनी दाखवून दिले आहे. चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याची उमेद वाढवणारी ही बाब आहे. प्रत्येक गावागावात अशा दमानिया उभे राहण्याची गरज आहे. अंजलीताई, तुम्हाला जागल्याचा सॅल्यूट.
दीपक जाधव
संपादक, जागल्या वेब पोर्टल